लिखाण | Writing

bhampak-banner

लिखाण –

लेखणीची ताकद, ही तलवारीपेक्षा जास्त आहे. इतिहासातील अनेक घटनांवरून हे सिद्ध झालेले आहे. आपल्या डोक्यामध्ये येणारे विचार, प्रत्येक व्यक्तीला वाणीतून किंवा देहबोलीतून व्यक्त करता येतीलच असे नाही, अशा व्यक्तींसाठी, *लिखाण* व्यक्त होण्यासाठी अतिशय चांगले माध्यम ठरते.

आपल्या मानसिक अवस्थेनुसार. आपल्या मनात विचार येत आणि जात असतात. जे विचार खोलवर रुजलेले असतात, त्याचे पुन्हा स्मरण होऊ शकते, परंतु काही विचार येतात आणि जातात, ते रुजलेले नसतात, असे मनात आलेले विचार पुन्हा आठवायचे ठरविले, तर ते आठवत नाहीत, हे न आठवणे, हा सुद्धा एक प्रकारचा तोटाच असतो.

आपल्या मनात येणारे विचार, हा एक समृद्ध ठेवा असतो. त्यातून अनेकांचे कल्याण होत असते, अनेकांना दिशा मिळत असते. माणसाच्या देहाला मृत्यू आहे, परंतु त्याचे विचार अमर आहेत. माणसाचे अमरत्व, हे त्याच्या अमर विचारातून आणि त्यातून सिद्ध झालेल्या समाज उपयोगी कर्तृत्वातून सिद्ध होत असते. त्यामुळे मनात आलेले विचार शब्दबद्ध करणे, हेसुद्धा आपले संचित कर्म ठरू शकते.

जीवनाचा भरवसा नाही, ते पुढच्या क्षणाला संपणार आहे, हे असे गृहीत धरले, तर आपण काय घेऊन चाललो आहे*⁉️ आणि काय ठेवून चाललो आहे ⁉️ याचा हिशोब करणे गरजेचे आहे. जाताना सत्कर्माने व परोपकाराने मिळवलेले पुण्य आणि आशीर्वाद असावेत, हे ठरविता आणि करता येते, एवढेच आपल्या हातात आहे.

जाताना आपल्याबरोबर तळतळाट आणि पाप नसावे, हे जर आपल्या बरोबर असेल, तर जिवंत असताना नीट जगता येत नाही आणि मरताना नीट भरता येत नाही. आपण ठेवून जातोय, ते चिरंजीव आसावे, म्हणजेच त्याला मरण नसावे. अशा स्वरूपाचे फक्त आपले विचारच असू शकतात, म्हणून मनात येणारा प्रत्येक विचार शब्दबद्ध करण्याची सवय असावी.

आपले विचार कोणाचे चोरलेले अथवा कॉपी केलेले नसतात, ते आपल्या अंतरातून आणि बुद्धीतून तयार होत असतात, त्यामुळे आपल्या जीवनातील खरी कमाई हीच असते, जी अमर असते, म्हणून ही लिहून आणि जतन करून ठेवली पाहिजे.

आद्य गुरु शंकराचार्य, विश्व माऊली ज्ञानदेव, जगद्गुरू तुकोबाराय, मोहम्मद पैगंबर, स्वामी विवेकानंद या महात्म्यांची वये पाहिली, तर ती अतिशय थोडी आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या जीवनातील जे विचार आहेत, त्यांना शब्दबद्ध केल्यामुळे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांना अमरत्व प्राप्त झालेले आहे, ही लिखाणाची खरी ताकद आहे.  अमरत्वा बरोबरच लेखणी, तलवारीपेक्षा जास्त पराक्रम करू शकते.

याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे सुभेदार मल्हाराव होळकर आणि सुभेदार मालेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर राघोबादादांनी ज्यावेळी त्यांचे संस्थान कब्जात घेण्यासाठी ससैन्य उज्जैन पर्यंत धडक मारली होती, त्यावेळी पुण्यश्लोक अहिल्या मातेने लिहिलेले एक अजरामर पत्र तलवारीपेक्षा  भारी ठरलेले आहे. विस्तारभयास्तव सर्व पत्र लिहिता येत नाही, परंतु त्यातले मुद्दे किती परिणामकारक आहेत पहा.

मी बाई माणूस आहे म्हणून मला कमी लेखून आक्रमण करण्याचा प्रयत्न कराल, शिप्रा नदी ओलांडाल, तर मी तलवार आणि भाला घेऊन उभी आहे, युद्ध अटळ आहे. युद्धात मी हरले किंवा जिंकले तर एक लढवय्यी म्हणून माझा लौकिक होईल आणि बाई विरुद्ध लढून तुम्ही हरला किंवा जिंकला तरी तुमची अपकीर्ती व बदनामीच होईल. मी हरले किंवा जिंकले तरी दोन्ही बाजूनी विजय माझाच होणार आहे.

शब्द वेगळे असतील, परंतु हा सर्व त्या पत्रातील लिखाणाचा आशय आहे. पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या

लेखणीची ही ताकद तलवारीला पुरून उरली आणि राघोबादादांना सैन्य उज्जैन मध्ये ठेवून, नाटक करून एकट्याला भेटायला यायला भाग पाडले. सैन्याचा खर्च त्याने मागितला, तोही अहिल्या मातेने खंबीरपणे नाकारला, यावरही तो काहीही करू शकला नाही. पुण्यश्लोक अहिल्या माता लढण्यामध्ये खूप धाडशी आणि तरबेज होत्या, त्यापेक्षाही लिखाणामध्ये अतिशय धूर्त होत्या. त्यांच्या हातातील तलवार रणांगणावर जेथे तळपली, ती ज्यांनी पाहिली, ते आज कोणी हयात नाहीत, परंतु त्यांनी जे पत्र लिहिले, ते लिखाण आजही आहे आणि ते खऱ्या दृष्टीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचे अमरत्व आहे, म्हणून डोक्यात येणारा प्रत्येक विचार शब्दबद्ध होणे गरजेचे आहे. या जगात घडून गेलेल्या प्रत्येक ऐतिहासिक क्रांतीच्या तळाशी एक समृद्ध विचार आहे, फक्त तो शब्दबद्ध करण्याचे भाग्य सर्वांना लाभत नाही.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment