तारूण्य आणि विवेक

By Team Bhampak Articles Laxman Asbe Lifestyle 2 Min Read

तारूण्य आणि विवेक –

तारूण्यात उत्साह प्रचंड असतो, सळसळते चैतन्य असते , भिडायची धमक असते , पण विवेक असतोच असे नाही .
विवेकाविना तारूण्य म्हणजे अती वेगाने धावणाऱ्या गाडीचे स्टेअरिंग अंधळ्याच्या हातात देण्यासारखे आहे. अशा गाडीला अपघात ठरलेलाच असतो. तसे तर विवेकाविना जीवन अंधळेच असते, पण त्यात तारूण्यात धोका जास्त असतो. विवेकासहीत तारूण्य कधीच वाट चुकत नाही आणि आपला जीवनप्रवास दैदिप्यमान घडविल्याशिवाय रहात नाही.

ध्येय निश्चित असेल तर दिशा निश्चित होते, दिशा ठरली की वेग ठरविता येतो , पण कोणत्याही ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही निर्धोक नसतो , त्यातही ध्येय जेवढे उंच तेवढे धोके मोठे असतात. अशा धोकादायक प्रवासात विवेकरूपी डोळे सताड उघडे असावे लागतात.
हा विवेक सर्वच क्षेत्रात उपयुक्त असतो आणि हा अनुभवातून येणाऱ्या ज्ञानातून मिळत असतो . अनुभवासाठी कृती गरजेची असते म्हणून हा क्रियाशील/Creative माणसाचा प्रांत आहे , निष्क्रिय माणसाने याचा विचारसुध्दा करू नये .

विवेक म्हणजे चांगले काय ? आणि वाईट काय ? हे योग्य वेळी ठरविता येणे , ही साधी सोपी व्याख्या आहे ही समजली की पुढे
सत्य काय ? आणि असत्य काय ? हे ठरविता येते आणि हे समजले की नित्य काय ? व अनित्य काय ? हे ठरविता येते , ही विवेकाची पूर्णता आहे . भरकटलेले तारूण्य हे नेहमी विवेकाच्या अभावानेच भरकटत असते .

मला एवढे समजत नाही का ? मी आता लहान आहे का ? हे प्रश्न कोणत्याही वयात बालीशच असतात कारण हे प्रश्न कोणीतरी आपल्याला उपदेश करत असतो, त्याचवेळी पडतात आणि उपदेशाची गरज नेहमी लहानानांच असते मग ते वयाने किंवा ज्ञानाने किंवा अन्य कशानेतरी लहानच असतात . वयाने वाढलेली माणसे अनुभवाने , ज्ञानाने आपण लहान आहोत हे सहजासहजी मान्य करत नाहीत म्हणून ती भरकटत जातात . जे तारूण्य विवेकाच्या हातात आहे त्याचे सोने झाल्याशिवाय रहात नाही आणि विवेकाविना तारूण्य भरकटून
त्याची माती झाल्याशिवाय रहात नाही.

डॉ . आसबे ल.म.

Leave a comment