आमचा बाप आन् आम्ही –
डॉ. नरेंद्र जाधव यांचे आयुष्य म्हणजे बदलाची, असीम शौर्याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे, यामधून आपल्या देशातील लाखो- करोडो लोकांना नवे, सुखसमाधानाचे जीवन जगण्यासाठी लढा देण्याचे स्फुरण मिळेल याची मला खात्री आहे.” हे शब्द आहेत देशाचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आमचा बाप आन् आम्ही पुस्तकाविषयीचे!
‘आमचा बाप आन् आम्ही’ या उच्चांकी, विक्रमी खपाच्या पुस्तकाविषयीचे हे शब्द. या पुस्तकाचा खप तरी किती असावा? तब्बल दोनशे आवृत्त्या. जगातल्या वीस भाषांत त्याचे अनुवाद झाले. इतकी अमाप वाचकप्रियता अभावानंच एखाद्या पुस्तकाच्या वाट्याला आली असेल.
डाॅ. नरेंद्र जाधव म्हणजे नामवंत अर्थतज्ज्ञ. रिझर्व्ह बँकेचे आर्थिक सल्लागार तसेच नियोजन मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू ही पदंही त्यांनी भूषविली आहेत. कालपटलावर दृष्टी असलेला समाजशास्त्रज्ञ, विख्यात शिक्षणतज्ञ, प्रेरणादायी विचारवंत, या सर्वांहून महत्त्वाचं म्हणजे ‘आमचा बाप आन्आम्ही’ या अात्यंतिक प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक. या पुस्तकाची अर्णणपत्रिकाच मुळी विलक्षण बोलकी अाहे. आंधळ्या’ राहीआजीच्या ‘दूर’दृष्टीस,
‘अशिक्षित’ दादांच्या बौद्धिक प्रगल्भतेस, आणि आई ‘सोना’बाईच्या वाट्याला आलेल्या गरिबीच्या चटक्यांस.
या पुस्तकांच्या आरंभीच्या काळातल्या मुखपृष्ठावर अभिनेते निळू फुले यांचं लक्षवेधक आशय प्रकट करणारं वाक्य आहे. ‘साने गुरुजी यांनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डाॅ. नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप!’
पुस्तकात एका दलित कुटुंबातून, दारिद्रयातून पुढं आलेल्या मुलांची संघर्षगाथा आहे. त्याचा नायक हा त्यांचा बाप आहे. हा बाप सामान्यातील असामान्य आहे. प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणारा आहे. त्यांची मने घडविणारा आहे. मुलांतील क्षमता, सामर्थ्य ओळखणारा आहे. आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन मोठ्या झालेल्या अन् समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची ही उद्बोधक आणि रोमहर्षक यशोकहाणी आहे. ती वाचावी, लक्षात ठेवावी अशीच आहे.
पुस्तकाचं नाव। आमचा बाप आन्आम्ही.
लेखक। डाॅ. नरेंद्र जाधव.
प्रकाशन। ग्रंथाली प्रकाशन.
पृष्ठसंख्या। 290.
सुनील शेडगे, नागठाणे जि. सातारा