इरफान खान हा उच्च प्रतिभेचा अभिनेता!
अभिनयाच्या क्षेत्रात त्यानं आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. ‘राष्ट्रीय पुरस्कारा’पासून ‘पद्मश्री’पर्यंतचा प्रवास इरफान खान च्या अभिनयाची कर्तृत्व क्षमता अधोरेखीत करतो.
इरफान सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. दुर्धर, असाध्य आजारानं तो त्रस्त आहे. न्यूरोएन्डोक्राइन ट्युमर हा तो आजार. एरवी हा आजारही दुर्मिळ मानला जातो. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरु आहेत. तो मृत्यूशय्येवर आहे. आयुष्यातल्या अनिश्चितपणानं हतबल, निराश आहे.
इरफान म्हणतो, ” मी जणू डॉक्टरांच्या प्रयोगाचा एक हिस्साच बनलो आहे. मी सारी शस्त्रे खाली टाकून आयुष्यापुढे शरणागतीच पत्करली आहे. कॅन्सर झाल्याचे कळल्यामुळं आपलं जीवन किती क्षणभंगूर आहे, हे मला पूर्णपणे लक्षात आलं आहे. आता मी चिंता करणं बंद केलं आहे. पुढच्या दोन वर्षांत वा येत्या काही महिन्यांत काय होणार आहे, हेही मला सांगता येणार नाही.”
इरफान आयुष्यातली क्षणभंगुरात अधिक स्पष्ट करताना एक टिपिकल उदाहरण देतो. “मी शांतपणे डोळे मिटून रेल्वेत बसलो आहे. या प्रवासात आनंद आहे, स्वप्नं आहेत, आकांक्षा आहेत. त्या पूर्ण होतील याची खात्री आहे. इतक्यात तिथं ‘टिकट चेकर’ येतो अन् मला खाली उतरायला सांगतो. मी त्याला म्हणतो, मला इथं उतरायचं नाही. पण तो मला पुनःपुन्हा सांगतो, हेच तुझं स्टेशन!
आपल्याला जिथं जायचं आहे, त्याआधीच गाडीतून उतरायला सांगितल्यावर कसं वाटेल? माझी सध्याची अवस्था जणू अशीच झाली आहे.
“जीवनामध्ये अनिश्चितता हीच केवळ निश्चित असते,” हे इरफानचं वाक्यही खूपकाही सांगून जातं.
शेवटी आयुष्य म्हणजे तरी दुसरं काय?
सारा अनिश्चितपणाचाच खेळ ना? पुढं काय, नंतर काय, मग काय उमगलं आहे का कधी कुणाला? उद्या कुणी पाहिला आहे का? अखेर हातात येतो तोच क्षण आपला! तोच क्षण सुंदर करणं, छान जगणं अन् आपल्यातल्या चांगलेपणानं लक्षात राहाणं इतकंच आपल्या हाती!
आपल्याला काय वाटतं बरं?
सुनील शेडगे । नागठाणे ता. सातारा