किल्ले ऐहोळे –
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंड तालुक्यातील ऐहोळे या प्राचीन नगरीत मेगुती टेकडीवर एक किल्ला आहे. ऐहोळे नगरी मलप्रभा नदीच्या काठावर वसलेली आहे. चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामीपासून ३५ कि.मी. अंतरावर ऐहोळे आहे. प्रामुख्याने मेगुती टेकडीवर असलेल्या किल्ल्यामध्ये जैन मंदिर होते. टेकडीवर तटबंदी आहे, बुरूज आहे, पायरी मार्ग आहे. मंदिराची उत्कृष्ट रचना आपले मन मोहुन टाकते. बदामी – पट्टदकलु – ऐहोळे ही शिल्पकलेचे अतिउत्कृष्ट नजारे असलेली ऐतिहासिक ठिकाणे. किल्ले ऐहोळे मधील दुर्गमंदिर म्हणजे कला अविष्कारच म्हणावा लागेल.
ऐहोळे नगरीच्या स्थापनेची सुरवात गुप्त राजांच्या काळात ५ व्या शतकात झाली पण तिला संपूर्ण आकार हा चालुक्यांच्या काळात मिळाला. ऐहोळेमध्ये सर्वाधिक हिंदू मंदिरे आणि काही प्रमाणात जैन, बुद्ध मंदिरे आहेत. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे या नगरीला पौराणिक महत्त्व आहे. रामायणातील पुरावे पहायला मिळतात. भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुरामाने क्षत्रियांचा वध केल्यानंतर कुर्हाड येथेच धुवून भूमीला लाल केले. किल्ल्याचे बांधकाम जवळपास ११ व्या आणि १२ व्या शतकात चालुक्य राजाच्या काळात झाले. ऐहोळे हे नाव इंग्रजांनी पाडले पूर्वी ह्याला अय्याहोळे किंवा आर्यपूर म्हणून ओळखले जात होते.
चालुक्यांनंतर किल्ल्याने राष्ट्रकूट, विजयनगर साम्राज्याची राजवट पाहिली. विजयनगर साम्राज्याचा बहामनी सत्तेने पराभव केल्यानंतर इ.स.१५६५ मध्ये किल्ला विजापूरच्या आदिलशाहीच्या ताब्यात गेला. आदिलशाही सरदारांच्या वास्तव्याने एका शिवमंदिराचे नाव लाडखान मंदिर असे पडले. १७ व्या शतकाच्या शेवटी हा परिसर मुघलांच्या ताब्यात आला नंतर मराठ्यांनी राज्य केले नंतर हैदर अली- टिपूकडे होता. शेवटी १९ व्या शतकात इंग्रजांच्या ताब्यात आला.
टीम – पुढची मोहीम