विश्वास

By Bhampak Lifestyle Laxman Asbe 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

विश्वास –

मानवी जीवनामध्ये विश्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या जीवनातील निर्भयता, ही विश्वासावर अवलंबून असते. आपला कोणावरच विश्वास नसेल, तर आपल्या मनातील भीती कशानेही जात नाही.

आपण गाडीत बसलो तर ड्रायव्हरवर विश्वास ठेवावा लागतो. केस कापायला बसलो तर धारदार शस्त्र हातात असलेल्या केस कापणाऱ्या माणसावर विश्वास ठेवावा लागतो. आपल्या जीवनातील कोणताही पैलू हा विश्वासा शिवाय निर्भय राहूच शकत नाही. थोडक्यात आपले जीवन विश्वासाशिवाय तग धरू शकत नाही. आपल्या जीवनात कोणताही संबंध आणि नाते हे विश्वासावर टिकून असते. जेथे संशय निर्माण होतो, तेथे विश्वासाचा अंत होत असतो. आपल्या जीवनात संशय आणि विश्वास यांच्या जागा निश्चित करून घ्याव्या लागतात.

संशय माणसाला सावध करतो आणि विश्वास माणसाला निर्भय करतो, परंतु विश्वासामुळे कधीकधी बेसावधपणा निर्माण होतो. अशा बेसावध अवस्थेत आपला विश्वासघात निश्चित होत असतो. अखंड सावधान असून विश्वास ठेवणारी माणसे जीवनात यशस्वी होतात. एखाद्यावर विश्वास ठेवण्यासाठी त्याची पूर्ण ओळख आपल्याला होणे गरजेचे असते. एका भेटीत माणसाला अंतर्बाह्य ओळख होणे कठीण असते आणि जोपर्यंत पूर्ण ओळख होत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवणे मूर्खपणाचे ठरते.

पती पत्नीचे नाते आणि वैवाहिक जीवन, हे विश्वासावरच अवलंबून असते. आपल्या जीवनसाथी विषयी संशय निर्माण झाला की जीवन नरक बनले म्हणून समजावे. आयुष्यभर ज्याला साथ द्यायची आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनात कोणताही संशय राहता कामा नये. पती-पत्नीमध्ये संशय निर्माण झाला की त्या क्षणाला त्या संशयाचे तात्काळ निरसन करायला हवे अन्यथा लपवून आणि दाबून ठेवलेली शंका किंवा संशय अतिशय उग्र स्वरूप धारण करते. आवाक्याच्या बाहेर गेलेला संशय, संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय रहात नाही.

आपल्या जीवनामध्ये दोघांचेही पूर्ण समर्पण असेल, तर त्याग आपोआप केला जातो. ज्या दाम्‍पत्‍यामध्ये त्याग करण्याची वृत्ती असते त्यात सहन करणे आणि माफ करणे आपोआप होत असते. याचा परिणाम समोरच्या व्यक्तीला जसे आहे तसे स्वीकारले जाते. सुखी वैवाहिक जीवनाचा हा खरा गुरुमंत्र आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असणे, हा निसर्गाचा नियम आहे.

संसारिक जीवनातील अनुकूलता, ही आपल्या सहनशीलतेतून आणि क्षमेतून निर्माण होत असते. सहन करणे आणि माफ करणे या दोन गोष्टी विसरल्या की प्रतिकूलता निर्माण होते. आपल्या जीवनसाथी बद्दल आपल्याला सहन करता आले पाहिजे आणि चुकले तर माफही करता आले पाहिजे, तरच विश्वास निर्माण होतो आणि तो टिकतो.

मोबाईल मुळे आज जेवढी कुटुंबे उध्वस्त होत आहेत, तेवढी व्यसनानेही होत नाहीत. या सर्व तरुण पिढीतील घटस्पोटामागील कारण हा फक्त संशय आहे आणि विश्वासाचा अभाव आहे.

विश्वासाला नैतिकतेचे कुंपण आपोआप तयार होत असते. स्वैराचारी व्यक्तीला हे कुंपण बंधन वाटते. पती-पत्नीमध्ये एकमेकावर विश्वास असला, तर संसारात येणाऱ्या कितीही मोठ्या संकटाचे काहीच वाटत नाही आणि एकमेकाबद्दल संशय असला तर एक वेळचे स्मितहास्यसुद्धा संसाराला आग लावल्या शिवाय रहात नाही.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment