नारी एक महाशक्ती –
जगातील कोणतीही शक्ती, ही नेहमी अदृश्य आणि अव्यक्त असते, परंतु तिचा परिणाम, हा दृश्य आणि व्यक्त असतो. नारी ही एक अशीच महाशक्ती आहे, व्यक्ती म्हणून ती दिसत असते पण शक्ती म्हणून ती अपरिचित असते. तिची शक्ती आणि तिचा परिणाम व्यक्त होण्यासाठी काही नियोजन करावे लागते, तरच तिची महानता व्यक्त होत असते.
राजे लखोजी जाधव यांनी आपल्या मुलीला ज्याप्रमाणे घडविले आणि वाढविले त्यातून मुलगी म्हणून माॅंसाहेब जिजाऊ आजही अतुल्य आहेत. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा हिच्यात ती महाशक्ती अनुभवली आणि भारताची पंतप्रधान होण्याची कुवत आपल्या मुलीत आहे, हे सिद्ध करून दाखविले.
राजे शहाजी, महात्मा ज्योतिबा फुले, यशवंतरावजी चव्हाण यांनी त्यांच्या पत्नीमध्ये ती महाशक्ती अनुभवली आणि त्या शक्तीला पूरक वातावरण तयार करून, त्या पद्धतीची वागणूक दिली, म्हणून माॅंसाहेब जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्री आणि वेणूताई या स्त्रिया पत्नी म्हणून ऐतिहासिक महाशक्ती ठरल्या. कल्पना करा यांनी जर आपल्या पत्नींना फक्त मजेचे आणि विनोदाचे माध्यम समजले असते, तर काय झाले असते ?
सुभेदार मल्हारराव होळकर यांनी आपली सून पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिच्यामध्ये ती महाशक्ती पाहिली. सासरा म्हणून आपल्या सूनेसाठी त्यांनी जे केले, त्याला इतिहासात तोड नाही. आपल्या संस्थानाचा महसुलाचा आणि अर्थव्यवस्थेचा पूर्ण अधिकार देणारे, ते इतिहासातील एकमेव सासरे आहेत.
छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या सुना महाराणी येसूबाई आणि वीर भद्रकाली ताराराणी यांना राजकारण आणि युद्ध कला शिकवली. आपल्या सासर्याचे हे योगदान त्या दोघींनीही त्याग आणि शौर्य या रुपाने प्रकट करून, आपण महाशक्ती आहोत, हे सिद्ध करून दाखविले. छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या आई माँसाहेब जिजाऊमध्ये ही महाशक्ती अनुभवली. या महाशक्तीची पूजा म्हणून आपले संपूर्ण जीवनच या अलौकिक पुत्राने आपल्या आईच्या चरणावर अर्पण केले आणि आईमध्ये ही महाशक्ती नित्य विराजित आहे, हे सिद्ध करून दाखविले.
आपली स्वतःची बहीण हीसुद्धा आपल्यासाठी चैतन्याचा, उत्साहाचा आणि आत्मविश्वासाचा झरा बनू शकते, हे ज्या भावाला आपली बहीण महाशक्ती आहे, याचा अनुभव येतो, त्यालाच कळते. आपल्या जीवनात पवित्र नात्याने जोडलेली एखादी मैत्रीण आपल्या आयुष्यभराची मनमोकळे करण्याची एक हक्काची जागा ठरू शकते. शुद्धतेच्या आणि पावित्र्याच्या कुंपणात असलेली ही मैत्री, आपल्याला आपल्या मैत्रिणीत असलेल्या महाशक्तीचा अनुभव दिल्याशिवाय रहात नाही.
प्रत्येक स्त्रीत ही महाशक्ती स्थित असते, फक्त पुरुष म्हणून आपणच ज्या नात्याने तिच्याशी जोडलेलो असतो, त्या नात्याची ती जबाबदारी असते, की त्या महाशक्तीला प्रकट होण्यासाठी पूरक वातावरण तयार करावे . प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रिचा हात असतो, तर प्रत्येक यशस्वी स्त्रिच्या मागे एका पुरूषांची खंबीर साथ असते , हे पुरूष म्हणून कधीच विसरू नका .
पोटी मुलगी असेल राजे लखोजी, पंडित जवाहरलाल नेहरू बना. आपल्या पत्नीसाठी राजे शहाजी, महात्मा ज्योतिबा आणि यशवंतरावजी चव्हाण बना. आपल्या सूनेसाठी सुभेदार मल्हारराव होळकर आणि छत्रपती शिवाजी राजे बना. आपल्या आईसाठी तिचा लौकिक आपल्या पुत्रधर्माने हिमालयाच्या उंचीचा बनविण्यासाठी पुत्र राजे शिवाजी बना. आपल्या बहिणीसाठी आपले अंतःकरण नेहमी विशाल ठेवा. आपल्या मैत्रिणीसाठी आचरणामध्ये पवित्र, शुद्ध प्रभू रामचंद्र रहा.
स्त्री म्हणून, मुलगी म्हणून भारतात जन्माला येणे, हे हजारो जन्माचे पुण्य आहे कारण जगात फक्त भारतात स्त्रीची पूजा केली जाते.
मातृ देवो भव l
हा उपनिषदांनी सांगितलेला पहिला जिवंत देव आहे.नारी एक महाशक्ती.
या देवी सर्वभूतेषु शक्ती रुपेन संस्थितः l नमस्तमै नमस्तमै नमस्तमै नमो नमः l
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.