मोठेपणा

By Bhampak Articles Entertainment Laxman Asbe 2 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

मोठेपणा –

प्रत्येक व्यक्तीला आपल्या मोठेपणाची हौस असते, म्हणून प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आपला मोठेपणा व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. जगाने आपल्याला मोठे म्हणावे याच्यासाठीच दिवसातील कितीतरी ऊर्जा आपण खर्च करत असतो. हा मोठेपणा चा प्रवास खरेतर सुख आणि समाधान याच्या विरुद्ध असतो.

आपण लहान आहोत, तोपर्यंत मोठे होण्याची प्रत्येकाची इच्छा असते. लहानाचे मोठे होता येते, परंतु मोठे झाल्यानंतर लहान होणे, खूप अवघड असते.

परिस्थितीचे, ज्ञानाचे, अर्थव्यवस्थेचे, आरोग्याचे आणि माणुसकीचे लहानपण खूप वेदनादायी असते कारण ते खरे दारिद्र्य असते. त्यामुळे या क्षेत्रातील मोठेपणा प्रत्येक व्यक्तीला हवा असतो.

आपल्या स्वकष्टाने आणि प्रारब्धाने आपण या क्षेत्रात मोठे झालो, तरी ते मोठेपण सांभाळताना होणारी दमछाक आपल्या जीवनातील शांती आणि समाधान याचे समूळ उच्चाटन करते, म्हणून या क्षेत्रात मोठे झालेल्या व्यक्तीने अहंकारी वृत्तीचे लहानपण आणि नम्रतेचे मोठेपण स्वीकारावे लागते.

नम्र झाला भुता l त्याने कोंडिले अनंता ll
हेच शूरत्वाचे अंग l हरी आणिला श्रीरंग ll

मोठेपणा साठी केलेली धडपड, ही आपल्याला वृत्तीमध्ये नम्रता नसेल, तर त्रासदायकच ठरते.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा ll
ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार ll
जया अंगी मोठेपण l तया यातना कठीण ll
तुका म्हणे जाण l व्हावे लहानाहुनी लहान ll

या अभंगातील व्हावे लहानाहुनी लहान, हे चरण आपल्या सुख, शांती आणि समाधानाचे मूळ आहे.मोठेपणा.

डॉ. आसबे ल. म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment