नाटक आणि ढोंग | Drama and hypocrisy

bhampak-banner

नाटक आणि ढोंग –

आपण नैसर्गिकरित्या जसे आहोत तसे राहिलो, तर त्याच्या इतके जीवनात सुख आणि समाधान दुसरे कोणते नसते. आपण जसे आहोत त्याच्यापेक्षा वेगळे काहीतरी आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न ज्यावेळेस सुरू होतो, त्यावेळी आपल्या जीवनात ताण तणाव निर्माण होतात. नैसर्गिक असणारी गोष्ट, ताणली तरी त्रास होतो आणि दाबली तरी त्रास होतो. आपण कसे आहोत ? हे फक्त आपल्यालाच माहीत असते. त्यामुळे आपण जसे आहोत तसे न राहणे, हा खरेतर आपल्या स्वतःवरचाच अन्याय असतो आणि याचा आपल्यालाच त्रास होतो.नाटक आणि ढोंग.

आपण काहीतरी वेगळे आहोत, हे दाखविण्याचा केलेला प्रयत्न, हे ढोंग किंवा नाटकच असते. कितीही प्रयत्न केला, तरी ते उघड पडल्याशिवाय राहात नाही. कोणतेही नाटक फार काळ टिकवता येत नाही कारण त्याच्यासाठी केलेला मेकअप नैसर्गिक नसतो आणि जे नैसर्गिक नाही, ते टिकवण्याची धडपड म्हणजेच जीवनातील ताण तणाव असतो.

आज माणसे दारिद्र्याने फार दुःखी नाहीत, परंतु ताण-तणावाने खूप दुःखी, अशांत आणि असमाधानी आहेत. आपण दररोज स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे की माझ्या जीवनात मी कोणते नाटक किंवा ढोंग करतो आहे ? याचा शोध ज्या ज्या ठिकाणी लागेल, त्या त्या ठिकाणी हे नाटक आपण स्वतः संपविले पाहिजे.

समाजाने त्याच्यावर टिंगल करण्यापूर्वी आपल्याला आपले ढोंग संपविता आले पाहिजे. प्रयोग करून पहा, ज्या ठिकाणी आपण ढोंग टाकून देतो आणि मुळ नैसर्गिक अवस्थेत येतो त्या ठिकाणी आपण शांत आणि समाधानी असतो. शांती आणि समाधान या विकत घेण्याच्या गोष्टी नाहीत, तर त्या आपल्या आत्मिक अवस्था आहेत. वरचे नाटकी आणि ढोंगी टरफल काढल्याशिवाय त्या प्रगट होत नाहीत. दुर्दैवाने आपल्याला या टरफलासहीत शांती आणि समाधान हवे असते.

जे आपल्या स्वतःत आहे, ते सोडून आपण त्याला बाहेर शोधत असतो, म्हणून ते आपल्याला कधीच सापडत नाही. आपले मूळ स्वरूप म्हणजेच नैसर्गिक स्वरूप, हे सत्चिदानंद आहे, त्यावर देहाचे टरफल आहे. खरेतर देह म्हणजेच मी ! असे समजणे, हेच जीवनातील सर्वात मोठे नाटक आणि ढोंग आहे. हे नाटक वटविण्यासाठी, त्याच्या सर्व संबंधित सुख दुःखांचा आपल्या शांती आणि समाधानावर परिणाम होतो.

सुंदर नसताना सुंदर दिसण्याचा प्रयत्न करणे, ज्ञानी नसताना ज्ञानी असल्याचा आव आणणे, स्वार्थी असताना निःस्वार्थी असल्याचा अविर्भाव प्रगट करणे, आपण आतून वासनेने बरबटलेले असूनही पवित्र असल्याचा आणि तसे दाखविण्याचा प्रयत्न करणे, थोडक्यात काय तर आपण चांगले नसून, चांगले असल्याचा आव आणणे, ही वरवरची नाटके आहेत. ही सर्वांना समजतात परंतु या नाटकी भूमिकेतून बाहेर येण्याचा प्रयत्न आपला कधीच प्रामाणिक नसतो, त्यामुळे यात आपल्याला म्हणावे तसे यश प्राप्त होत नाही. ही नाटके फार किरकोळ आहेत परंतु मी देह आहे, हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे असलेले नाटक आणि ढोंग आपल्याला मरेपर्यंत संपविता येत नाही.

जोपर्यंत आपले मूळ नैसर्गिक स्वरूप, म्हणजेच सत्चिदानंद अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही, तोपर्यंत जीवनातील हे नाटक संपत नाही आणि हे नाटक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत जीवनामध्ये शाश्वत शांती, सुख, समाधान आणि आनंद यांची प्राप्ती होत नाही. ही अवस्था साधने शिवाय प्राप्त होत नाही, साधना गुरुकृपेने मिळते आणि गुरुकृपा आपल्या जिज्ञासूवृत्ती मुळे आणि पूर्व पुण्याईने प्राप्त होत असते.

जो अंतर्मुख होतो त्याला ही साखळी समजते, बहिर्मुख व्यक्तीला याचा थांगपत्ताही लागणे शक्य नाही.

मी माझे ही आठवण विसरले जयाचे अंतःकरण l पार्था तो संन्यासी जाण निरंतर ll

या जगात संन्याशाइतका सुखी, समाधानी, तृप्त आणि आनंदी दुसरा कोणीच नाही, म्हणूनच सर्व जग संन्याशाच्या पाया पडते. असा संन्यासी होण्यासाठी घर सोडावे लागत नाही, तर मी व माझे अर्थात देह म्हणजे मी, हे नाटक आणि ढोंग सोडावे लागते.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment