कर्तव्य आणि कर्तुत्व

By Bhampak Lifestyle Laxman Asbe 4 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

कर्तव्य आणि कर्तुत्व –

कर्तव्याची जाणीव ही जीवनातील माणुसकीची पहिली पायरी आहे. कर्तव्यदक्ष माणसाला माणुसकीसाठी वेगळे काही करावे लागत नाही. कर्तव्याला विसरलेली माणसे माणुसकीचा आव आणत असतात. वास्तविक ती माणुसकीच्या जवळपासही नसतात. इतर प्राण्यांपेक्षा मानव हा वेगळा प्राणी आहे, हे त्याच्या कर्तव्यावरून सिद्ध होत असते.कर्तव्य आणि कर्तुत्व.

कर्तव्याची पुढली पायरी आहे कर्तुत्व !

ज्याला कर्तव्य समजले नाही, त्याच्या हातून कर्तृत्व घडतच नाही. जगातील कोणत्याही पती-पत्नीमध्ये प्रत्येक पत्नीला आपला पती कर्तुत्वान असावा, अशी अपेक्षा असते. कर्तव्यासाठी जबाबदारीची जाणीव असावी लागते आणि कर्तुत्वासाठी अथक, नियोजनपूर्वक प्रयत्न व योग्य दिशा असावी लागते.

आपल्या पतीला त्याच्यात असलेल्या सामर्थ्याची ओळख पत्नी करून देऊ शकते. बाईल वेडा झालेला पुरुष काही काळ स्त्रीला बरा वाटत असला, तरी पुढे तिला तोच पुरुष किळसवाणा वाटतो. जी स्त्री बुद्धिमान आहे, ती त्याला त्यापासून परावृत्त करते आणि त्याला त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देते, हेच तिचे खरे कर्तव्य आहे.

गोस्वामी तुलसीदास विवाहनंतर असेच बाईवेडे झाले होते. त्यांच्या पत्नीने त्यांच्यात असलेल्या सामर्थ्याची जाणीव त्यांना करून दिली आणि ते भविष्यात तुलसी रामायण सारखा अजरामर ग्रंथ लिहू शकले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, यांचे चरित्र पाहिले, तर त्यांच्या जीवनात त्यांच्या अर्धांगिनी वेणूताई, यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जीवनात महत्वाचे निर्णय घेत असताना कर्तुत्ववान पुरुष ज्यावेळी द्विधा मनःस्थितीत येतो, त्यावेळी त्याला योग्य सल्ला देणे अतिशय अवघड असते कारण त्या सल्ल्याची आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी पूर्णपणे सल्ला देणाऱ्यावर असते.

भारत चीन बरोबरच्या युद्धात ज्यावेळेला हरला, त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडून, त्यांना भारताचे संरक्षण मंत्री पद स्वीकारण्यासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ज्यावेळी विचारणा केली, त्यावेळी मी सल्ला घेऊन सांगतो, असे उत्तर यशवंतराव चव्हाण यांनी दिले, त्यावेळी नेहरू चिडले. त्यांना वाटले त्यांचे त्यावेळेची विरोधक मोरारजी देसाई यांचा सल्ला ते घेताहेत की काय  ? यशवंतराव चव्हाण यांनी त्यावेळी वेणूताईंच्या सल्ला घेतला आणि संरक्षण मंत्री पद स्वीकारले. हा प्रकार ज्यावेळी नेहरूंना कळाला, त्यावेळी त्यांना हसू आवरेना.

हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला !

या जगप्रसिद्ध वाक्याच्या तळाशी वेणूताईंचा सल्ला आहे, हे असते स्त्रीचे खरे कर्तव्य. आपल्या कर्तुत्वान पतीला द्विधा अवस्थेतून बाहेर काढणे हाच अर्धांगिनीचा खरा धर्म आहे. वेणूताईंच्या मृत्यूनंतर यशवंतराव चव्हाण यांनी आपली जीवनयात्रा किती दिवसात संपविली ? हे एकदा वाचून पहा , मग आपल्याला पती पत्नीच्या नात्याची उंची समजेल .

आज टीव्हीवरील बातम्या पहात असताना, नेत्यांच्या अर्धांगीनिंना कोणत्या दिव्यातून जावे लागत आहे ? हे पाहिले की यशवंतराव आणि वेणूताई या जोडीची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पवित्र आणि दिशादर्शक असलेल्‍या महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि राजकारण्यांची दिशा कोणत्या मार्गाने चाललेली आहे ? हे पाहिले की मन सुन्न होते.

आपल्या मधून आपल्या वडिलांची संपत्ती, पद, प्रतिष्ठा वजा करून उरते, ते आपले *अस्तित्व* असते आणि स्वतःला वजा करून जे उरते ते आपले *कर्तृत्व* असते. आपल्या मृत्यूनंतर आपली कीर्ती आणि नाव आपल्या कर्तुत्वाने अजरामर करता येत असते. ज्यांना कर्तुत्व समजलेच नाही, त्यांचे नाव मृत्यूनंतर फक्त ग्रामपंचायतच्या दप्तरात नोंदले जाते, चौथ्या पिढी नंतर त्याच्या स्वतःच्या रक्तातील माणसांनाही ते विस्मरणात जाते.

तिनशेसाठ किल्ल्यांचा मालक असलेले, छत्रपती शिवराय चारशे वर्षांनंतरही, आज कर्तव्य आणि कर्तुत्वाच्या रूपाने जिवंत आहेत आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ते जिवंत राहणार.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment