शोधलेली चूक

bhampak-banner

शोधलेली चूक –

आपण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीमध्ये चुका शोधायला लागतो, त्यावेळी आपल्या मनात त्या व्यक्तीच्या बद्दल निश्चित मत्सर निर्माण झालेला असतो किंवा त्या मत्सरातून आपण त्या व्यक्तीवर जळत तरी असतो हे निश्चित समजावे. आपण एखाद्यावर जळतोय हे आपल्याला सहजासहजी समजत नाही कारण आपले काही चुकत नाही ! मी कधीच चुकत नाही ! हा अहंकार अतिशय दृढ असतो.शोधलेली चूक.

मी ही चुकू शकतो, माझीही चूक होऊ शकते, हे समजायला आणि उमजायला मन फार मोठे असावे लागते किंवा स्वतःचे आत्मपरीक्षण नित्यनेमाने करण्याची सवय असावी लागते. आपले मन मोठे आहे की छोटे आहे ? हे स्वतःला समजणे खूप अवघड असते कारण माणूस जगाला तपासत असतो, पण स्वतःला कधीच तपासत नाही. आपल्याला एखाद्या व्यक्तीत चूक दिसणे किंवा सापडणे नैसर्गिक आहे, परंतु आपण स्वतःहून चूक शोधणे अनैसर्गिक आहे आणि ही विकृती आहे. जीवनातील कोणतीही विकृती आपल्या अंतःकरणात निर्माण होणाऱ्या विकारातून तयार होत असते.

धर्मशास्त्रात सांगितलेल्या प्रबळ षड्विकारिपैकी मत्सर हा एक विकार आहे. अंतःकरणात हा विकार तयार झाला की आपण ज्याच्याबद्दल मत्सर निर्माण झालाय, त्याचा द्वेष करू लागतो आणि त्यातूनच त्याला दोषी ठरविण्यासाठी त्याच्यातील चुका शोधून लागतो.

आपल्या अंतःकरणात विकार तयारच होऊ नये यासाठी माणसाने कायम दक्ष असावे कारण मानवाचा दानव हा या विकाराने होत असतो आणि विकाररहित अंतःकरण हा मानवाचा देवत्वापर्यंतचा प्रवास असतो. आपल्याला देव होता आले नाही तरी किमान मानव राहता आले पाहिजे. आपली परीक्षा आपण दररोज घेतली पाहिजे. दिवस सुरू होताच या सहा विकारांची हजेरी घेतली पाहिजे, हे  सर्व विकार गैरहजर असतील, तरच आपल्या हातून काहीतरी चांगले घडणार आहे आणि आपण चांगले वागणार आहोत, असे समजावे.

कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे l आम्हीसी का दिली वांगली रे ll
काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुताने विणली रे l रक्त रेत दुर्गंधी जंतू नरक मुताने भरली रे ll
षड्विकार षड्वैरी मिळोनी ताप त्रयाने विणलेले l नवा ठिकाणी फाटून गेली ती त्वा आम्हासी दिधली रे ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment