फकिरा | Fakira Book

By Bhampak Book Review Sunil Shedage 2 Min Read
फकिरा | Fakira Book

फकिरा | Fakira Book –

प्रतिभेची जादू, लेखणीची किमया काय असू शकते याचं समर्थ उदाहरण म्हणजे अण्णाभाऊ साठे. केवळ दीड दिवसच शाळेची पायरी चढलेले, गावापासून मुंबईला पायी चालत गेलेले, नंतरच्या काळात चक्क विमानाने रशियास पोचलेले, साहित्यरत्न, लोकशाहिर या पदव्या मिळविलेले अण्णाभाऊ म्हणजे मराठी साहित्यातलं मानाचं पान.फकिरा.

अण्णाभाऊ सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव (ता. वाळवा) इथले. घरी अठरा विश्वे दारिद्रय. याच अण्णाभाऊंवर टपाल तिकीट काढण्यात आलं. मुंबईतल्या एका पुलाला त्यांचं नाव देण्यात आलं. पुणे विद्यापीठात त्यांच्या नावानं अध्यासन केंद्र सुरु करण्यात आलं. शासनानं त्यांच्या नावानं विकास महामंडळाचीही स्थापना केली.

अण्णाभाऊंनी अापली प्रतिभा अन् लेखणीच्या सामर्थ्यावर विपुल लेखन केलं. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वैविध्यपूर्ण साहित्य प्रकारांत आपल्या लेखनशैलीचा ठसा उमटविला.

‘फकिरा’ ही अण्णाभाऊंची अत्यंत लोकप्रिय कादंबरी. ती 1959 मध्ये प्रकाशित झाली. पुढं 1961 मध्ये तिला शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार लाभला. या कादंबरीवर ‘वारणेचा वाघ’ नावाचा सिनेमाही आला. तोदेखील विशेष गाजला. अतिशय ओघवती अन् प्रभावी भाषा, चित्रदर्शी शैली, गतिमान नाट्यमयता ‘फकिरा’चं वैशिष्ट्य. उल्लेखनीय म्हणजे जगातील 27 भाषांमध्ये ती अनुवादित झाली.

प्रस्तावानेतच अण्णाभाऊ सांगतात – ही कादंबरी केवळ माझ्या प्रतिभेने निर्माण केली नाही. जे पाहिले, अनुभवले, ऐकले तेच मी लिहिले आहे. त्यातून हा ‘फकिरा’ निर्माण झाला आहे. कादंबरीचा कालखंड इंग्रजी राजवटीतला. इंग्रजांकडून होणारा अन्याय, उपेक्षित समाजाची  हालापेष्टा, त्याच्या विरोधात बंड करणारा ‘फकिरा’ हा नायक. पुढं   गावकर्‍यांच्या जीवाचा धोका ओळखून आत्मसमर्पण करणारा अन् हसत फासावर जाणारा उमदा दिलदार लढवय्या हे त्याचं संस्मरणीय रुप. त्याची वाचनीयता आजही कायम आहे, हे नक्की!

पुस्तकाचं नाव। फकिरा
लेखक। अण्णाभाऊ साठे
प्रकाशन। सुरेश एजन्सी
पृष्ठसंख्या। 150
किंमत। 200 /- रुपये

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment