कैद | Feel free

bhampak-banner

कैद –

आपल्याला आपल्या मनाप्रमाणे मनमोकळेपणाने जगता येत नसेल, तर आपण एक प्रकारचा तुरुंगवासच भोगत असतो. आज याला शक्यतो कोणी अपवाद नाही. जीवनातील मनमोकळेपणा ही सर्वात मोठी दौलत आहे. कर्तव्य आणि जबाबदारी या दोन मोठ्या शब्दांमुळे आणि जाणिवांमुळे आपला मनमोकळेपणा आपण मारून टाकलेला आहे.कैद.

आठवून पहा ज्यावेळी आपण आपल्या मनाप्रमाणे वागत असतो, त्यावेळी आपण खरे आनंदी आणि सुखी असतो. दुर्दैवाने आपल्याला बऱ्याच वेळेला या गोष्टीला फाटा द्यावा लागतो. क्षेत्र कोणतेही असू द्यात, मनमोकळेपणाने जगणे आणि मनाप्रमाणे वागणे यासाठी आपल्या अंगात ती कला असावी लागते.

पद, प्रतिष्ठा याच्यामुळे त्या पदाला आणि प्रतिष्ठेला साजेल आणि शोभेल असे वागणे, म्हणजे एक प्रकारचे बंधन असते. अगदी सोप्या शब्दात सांगायचे म्हटले तरी ती एक प्रकारची बेडीच असते. संत तुकाराम महाराजांनी या अवस्थेचे वर्णन खूप सुंदर केलेले आहे.

चंदनाचा सुळ सोनियाची बेडी l
सुख नेदी उर फोडी ll
तुका म्हणे नरकी घाली अभिमान l
जरी होय ज्ञान गर्व ताठा ll

अशा अनेक प्रकारच्या सोन्याच्या बेड्या हातात, पायात, मनात अडकवून आपले जीवन आपण एक तुरुंगवास करून टाकलेला आहे. कधीतरी आपण याचा विचार करायला हवा. दिवसाची सुरुवात ठरविल्याप्रमाणे नाही झाली किंवा नाही करता आली, तरी मनाप्रमाणे करता आली पाहिजे.

जीवनात ठरविलेल्या गोष्टी शक्यतो होत नाहीत, पण मनाप्रमाणे जगण्याला याचे बंधन असू नये. निसर्गातील मोकळे पशुपक्षी सर्वात आनंदी दिसतात, त्याचे एकच कारण आहे , त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण ते मन मोकळेपणाने जगत असतात. आपल्यालाही त्याच निसर्गात देवाने जन्म दिलेला आहे.

बुद्धी, वाणी, भावना अशा अनेक गुणांनी आपल्याला त्याने वरदहस्ताने बनविलेले आहे. आपला मनमोकळेपणा आपण विकून टाकलेला आहे किंवा बंधनात, तुरुंगात डांबून टाकलेला आहे, त्यात देवाचा दोष नाही. आयुष्य फार थोडे आहे, शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला या तुरुंगातून मोकळे होता आले पाहिजे, तरच मनुष्य म्हणून जन्माला येऊन जगण्याचा आनंद लुटला असे म्हणता येईल, अन्यथा जन्माला येऊन स्वतःला कैद करून घेतले असेच होईल.

दुर्लभो मनुष्यो देहो  l
देही नां क्षणभंगूरः l
तत्रापी दुर्लभं मन्ये वैकुंठ प्रियदर्शनं ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment