किल्ले राजहंसगड उर्फ येळ्ळूरगड

किल्ले राजहंसगड उर्फ येळ्ळूरगड

किल्ले राजहंसगड उर्फ येळ्ळूरगड –

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर या गावी टेकडीवर अतिशय सुंदर असा राजहंसगड उभा आहे. बेळगावपासून किल्ले राजहंसगड साधारण १८-२० कि.मी अंतरावर आहे. वर गडापर्यंत गाडीमार्ग असल्याने एकदम सहजपणे गडावर पोहचता येते. गडाचा उपयोग गोवा आणि कारवारकडे होणाऱ्या व्यापारावर आणि शत्रूवर नजर ठेवण्यासाठी केला जात होता.

बंगलोर महामार्गावरून सहजपणे किल्ला नजरेस पडतो. किल्ल्याची तटबंदी मजबूतपणे आजही उभी आहे. चहूबाजूने तटबंदी आणि बुरूज आहेत. टेकडीवर पोचल्यावर आपण भव्य गोमुखी प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करतो. गडाचा विस्तार तसा मोठा आहे. गडावर शिवालय आहे, पाण्याची टाकी आहेत, सर्व बाजूने तटबंदीवरून चालता येते. धान्य कोठारासारखी वास्तू आहे. स्थानिक असे सांगतात की गडावरून बेळगाव किल्ल्यापर्यंत एक भुयार आहे. गडावरून बेळगाव परिसर दिसतो. चैत्र महिन्यात गडावर यात्रा असते.

किल्ल्याची उभारणी सौंदत्तीचे  रट्ट राजे यांनी इ.स.१२१० – १२५० या कालावधीत केली. गडाचे नूतनीकरण १५व्या शतकाच्या सुरुवातीला आदिलशाही सरदार असद खान लारी याने केले. गडाने  चालुक्य, बहामनी, कदंब, मराठा, पेशवे, मुघल, हैदर – टिपू  आणि ब्रिटिश यांच्या राजवटी पाहिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोल्हापूर बेळगाव परिसरावर जरब बसविण्यासाठी ८ किल्ले मजबूत केले त्यापैकी हा किल्ले राजहंसगड. १.सामानगड, २.महिपालगड, ३.गंधर्वगड, ४.कलानिधीगड, ५.पारगड, ६.वल्लभगड, ७.राजहंसगड, ८.भीमगड

गडावर तीन ऐतिहासिक लढाया झाल्या आहेत.

१. सावनूरचा नवाब विरुद्ध पेशवे
२. टिपू सुलतान विरुद्ध पेशवे
३. भीमगडाचे सैनिक विरुद्ध राजहंसगडाचे सैनिक.

टीम – पुढची मोहीम

Leave a comment