किल्ले तोरगल –
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यात मलप्रभा नदीच्या तीरावर तोरगल हा मजबूत भुईकोट उभा आहे. किल्ले तोरगल बेळगावपासून ८५ कि.मी अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा किल्ला आहे. साधारण २००-२५० एकरावर किल्ल्याचा विस्तार आहे.
किल्ल्याला लहान – मोठी ६ प्रवेशद्वारं आहेत. किल्ल्याची तटबंदी चहुबाजुने मजबूत आहे. असंख्य बुरूज आहेत. किल्ल्यातच गाव वसलेले आहे. किल्ल्याला खंदक आहे आणि नदीचे पाणी वळवून खंदकात टाकले जात असे. किल्ल्यात भव्य वाडा म्हणजे गढी आहे. चालुक्यकालीन शिवमंदिरांचा समूह आहे. आदिशाहीच्या काळातील मस्जिद आहे.
किल्ल्याची उभारणी इ.स. ११ व्या शतकात भूतंकुश राजाने केली. याच सुमारास त्यांनी शिवमंदिराचे बांधकामपण केले. पुढे आदिलशहाने पाळेगारांचे बंड मोडून काढण्यासाठी इ.स. १६६२ मध्ये चाल करून रायचूर, तोरगल हा परिसर ताब्यात घेतला. इ.स. १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहीमेत जीवाजी शिंदे, अप्पाजी सुरी हुबळीकर, मालोजी भोसले यांच्यासोबत सैन्य रवाना करून हा सर्व परिसर ताब्यात घेतला. जीवाजी शिंदे यांनी येथे आपला तळ ठोकला. देसाई मराठ्यांना येवून मिळाले आणि आपली सत्ता मजबूत झाली. महाराजांच्या मृत्यूनंतर किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. नंतर इ.स. १६९० मध्ये राजाराम महाराजांच्या काळात नरसोजीराव शिंदे यांनी हा किल्ला जिंकून घेतला व शिंदेंची सत्ता अबाधित राखली. इ.स. १९४९ पर्यंत शिंदेंची सत्ता होती. करवीरकर राणी जिजाबाई या ह्याच शिंदे घराण्यातील होत्या. असा हा इतिहास वारसासंपन्न किल्ले तोरगल.असा हा इतिहास वारसासंपन्न किल्ले तोरगल.
– टीम पुढची मोहीम