रिकाम्या वेळेचे नियोजन

bhampak post

रिकाम्या वेळेचे नियोजन –

सतत क्रियाशील आणि उद्योगी असणाऱ्या माणसाला थांबून राहणे खूप अवघड असते. शरीर आणि मन यांचा समन्वय असला, तर कोणतेही काम पूर्ण एकाग्रतेने आणि क्षमतेने होते. आज शरीर बळजबरीने थांबावावे लागत आहे, पण मन थांबत नाही, त्यामुळे शांत आणि स्वस्थ राहणे अशक्य होत आहे.रिकाम्या वेळेचे नियोजन.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ज्यावेळी तुरुंगात होते, त्यावेळी त्यांनी आपल्या मनाला चिंतनात, लिखाणात आणि वाचनात गुंतविले. माणसाला आयुष्य थोडे आहे, त्यातही जागेपणीचा काळ आणखी थोडा आहे, तो वेळ सत्कारणी लागला पाहिजे.

सुख पाहता जवा पाडे l दुःख पर्वताएवढे ll
धरी धरी आठवण l मानी संतांचे वचन ll
नेले रात्रीने ते अर्ध l बालपण जरा व्याध ll

रिकामे डोके आणि रिकामा वेळ सैतानाचे घर असते. आपल्या मनाला तसेच शरीराला योग्य ठिकाणी गुंतवले नाही, तर ते स्वैर होते आणि कोणताही स्वैराचार हा घातकच असतो. आपल्या अंतःकरणातील सद्भावना आणि सद्विचार हेच आपल्या सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असतात. तसेच आपल्या अंतःकरणातील दुर्विचार आणि कुभावना आपल्या नकारात्मक ऊर्जेचे स्रोत ठरतात.

बळजबरीने थांबायची वेळ आली, तर सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे द्वंद्व सुरू होते. आपण ज्यांच्या संगतीत असतो, त्या विचारांचा विजय होतो. त्यामुळे आपल्या जीवनातील निष्क्रिय काळ हा पुढच्या भविष्यातील कृतीचा पाया असतो. निष्क्रिय काळात ग्रंथाची संगत झाली, तर भविष्यात आयुष्यभर पुरेल एवढी सकारात्मक ऊर्जा आपल्या अंतःकरणात निर्माण होते, म्हणून पूर्वी प्रत्येक घरात, गावात आणि मंदिरात ग्रंथ वाचन होत होते.

ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण l गीते वेदी मन पूर्ण l अनन्य होता या शरण l खचित टळे जन्म-मरण ll

आज आपल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये भविष्यात आयुष्यभर पुरेल एवढी सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे, असा या लॉकडाऊनकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा.

वाचेल जो कोणी l जनी त्यासी लोटांगणी ll
ज्ञान होय अज्ञानासी l ऐसा वर या टीकेसी ll

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment