मित्रप्रेम

bhampak-banner

मित्रप्रेम –

आपल्या जवळच्या नात्यातील माणसांनी धक्का दिल्यानंतर आणि ज्यांना आपण आपले मानतो त्यांनी आपल्याशी गद्दारी केल्यानंतर, आपल्याला मित्रांची मित्रप्रेम किंमत कळते. हा अनुभव यायला काही काळ जावा लागतो. आयुष्यातील तारुण्याचा काळ, हा उमेदीचा आणि कर्तुत्वाचा असतो.

लाथ मारीन तिथे पाणी काढीन ! अशी गुर्मी असते. अशा काळात आपल्याला चुकीचे ठरविलेले आणि आपली चूक दाखविलेले आपल्याला आवडत नाही. प्रामाणिकपणाने आपला मित्र आपण चुकत असेल, तर आपल्याला सावध केल्याशिवाय रहात नाही. त्याची ती पवित्र आणि निःस्वार्थी भावना, आपल्याला तारुण्यात कळत नाही. त्यामुळे दुर्दैवाने अनेक चांगले मित्र आपल्यापासून नकळतपणे दुरावतात.

वयाच्या पन्नाशीनंतर तारुण्य ओसरलेले असते, प्रौढावस्था प्राप्त झालेली असते, अनुभवाने आणि धक्के खाऊन आपण शहाणे झालेलो असतो. अशा अवस्थेत सिंहावलोकन करून पाहिले, तर चुकीचा वाटलेला मित्र आज अगदी बरोबर वाटू लागतो आणि नकळत आपण त्या मित्र प्रेमाने भावुक होऊन जातो.

पुन्हा त्या मित्राची तीव्र ओढ लागते. त्याच्याही जीवनातील हाच अनुभव, त्याला आपल्याकडे खेचत असतो. निःस्वार्थी वृत्तीने लहानपणी झालेले मित्र, पन्नाशीनंतर आपलाही स्वार्थ संपल्यामुळे, आपल्याला पुन्हा नव्याने कळून येतात. स्वार्थी दुनियेने तोडलेले लचके आणि त्याच्या वेदना यावर निःस्वार्थी मित्र आणि त्याचे प्रेम हेच रामबाण औषध आहे, हे नव्याने उमगू लागते. पन्नाशीनंतर आपल्याला या मित्रांशिवाय कोणाचाही आधार नाही, हे सत्य अनुभवाने पटते. कुटुंबाच्या आणि नातेवाईकांच्या वाढत्या अपेक्षा व वार्धक्याकडे झुकू लागलेले शरीर यांचा मेळ लागत नाही. त्यामुळे

आपल्या भावनांचा आणि शारीरिक क्षमतेचा कोणीही विचार करत नाही, हे सत्य समोर येते. आपल्यावर ही माणसे खरोखर प्रेम करत आहेत⁉️ का त्यांची ती फक्त गरज आहे⁉️ याचा उलगडा प्रसंगानेच होतो. अशा वयात प्रेमाची भूक तीव्र होते आणि ती पूर्ण करण्याची ताकद फक्त मित्र प्रेमात असते. पैशाने, श्रीमंतीने, प्रतिष्ठेने ही भूक भागत नाही.

माणूसच काय, पण देवाला सुद्धा या प्रेमाची भूक लागलेली आहे. देव सुद्धा मित्र प्रेमाला सर्वोच्च स्थान देऊन गेलेला आहे. भगवान श्रीकृष्ण, सुदामा दरवाजात आला आहे, हे समजताच आपले सर्व ऐश्वर्य आणि वैभव विसरून धावत जाऊन सुदाम्याला मिठी मारून, त्याच्या गळा पडलेला आहे. यातून एकच सिद्ध होते की देवत्व सुद्धा मित्राच्या प्रेमाची बरोबरी करू शकत नाही, म्हणून देव सुद्धा या प्रेमासाठी भुकेलेला आहे.

ऐका महिमा आवडीची l
बोरे खाय भिल्लीनीची ll
थोर प्रेमाचा भुकेला l
हाचि दुष्काळ तयाला ll
पोहे सुदाम देवाची l
फके मारी कोरडीची ll
न म्हणे उच्छिष्ट अथवा थोडे l
तुका म्हणे भक्ती पुढे ll

आपल्याला मित्र असणे आणि त्यासाठी वेळ देणे, वेळ काढणे खूप खूप खूप गरजेचे आहे. आपली भावना व्यक्त करण्याचे, ते एकमेव ठिकाण आहे. आपल्याला कायम आधार देणारा तो एक पक्का खांब आहे. आपला निःस्वार्थी जिव्हाळा आणि प्रेम याची तहान भागविणारा तो एक अखंड निर्मळ खळखळता झरा आहे. ज्याला मित्र नाही तो या जगात खरा भिकारी आहे.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment