दुःखाचे फळ | Fruit of Sorrow

bhampak-banner

दुःखाचे फळ | Fruit of Sorrow –

जीवनात दुःख आले नाही किंवा येणार नाही, असा जगात एकही माणूस सापडणार नाही. याचा अर्थ दुःख ही जीवनातील अटळ गोष्ट आहे. दुःखाचे फळ आपल्या मानसिकतेनुसार आणि आपण त्याला सामोरे कसे जातोय⁉️ याच्यावर अवलंबून असते.

दुःख जीवनात आल्यानंतर वाईट वाटणे, रडणे, संताप व्यक्त करणे अशा अनेक प्रकारे आपला त्याला प्रतिसाद असतो. वाईट वाटले तर नैराश्य येते, आपण रडत बसलो किंवा दुःखाला गोंजारत बसलो तर आपल्या दुःखाची वेदना कमी होण्याच्या ऐवजी वाढत जाते. आपण दुःखावर संतापलो, तर आपल्यामध्ये क्रोध निर्माण होतो आणि तो क्रोध आपल्यापासून माणसे तोडतो आणि दुःखात मिळणारा आधार आपण गमावून बसतो.

या सर्व प्रकारात दुःखाला आपण नकारात्मकतेने घेतलेले असते, त्यामुळे या प्रत्येक प्रकारात आपले नुकसानच होते. काही माणसे आपले दुःख सतत इतरांना सांगत बसतात. त्यातून आपल्याला सहानुभूती मिळावी, हीच अपेक्षा असते.

आपले दुःख ऐकण्यात कोणालाही रस नसतो, आपले दुःख सांगण्याने आपण त्याचाही मूड खराब करत असतो किंवा त्याची करमणूक करत असतो. त्याला आपल्या दुःखात काहीही देणेघेणे नसते. दुःखाला सकारात्मकतेने घेता आले पाहिजे, दुःखावर रडत पडत नाही तर सुखाने मात करता आली पाहिजे.

तुका म्हणे सुखे l तया हरतील दुःखे ll
रुळे तळील पायरी l संत पाय देती वरी ll

विश्ववंदनीय जगद्गुरू तुकोबाराय आपल्या जीवनातील दुःखावर सुखाने मात करण्याचा उपाय अनुभवाने सांगतात, की मी संतांच्या चरणाजवळ गेल्यामुळे मला माझ्या जीवनातील दुःखावर सुखाने मात करता आली. जीवनातील दुःख काही व्यक्तींनी वरदान समजले. आपल्या जीवनातील दुःख जर वरदानामध्ये बदलायचे असेल, तर दुःखाचे फळ, हे वैराग्य असायला हवे. जीवनामध्ये जेवढे मोठे दुःख येईल, तेवढे वैराग्य मोठे होते आणि वैराग्य जेवढे मोठे असेल तेवढे आपले जीवन उंच होत जाते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनातील वैराग्य, हे त्यांना राजमातेपासून निर्मलगंगाजल पुण्यश्लोक अहिल्यामाता या उंचीपर्यंत घेऊन गेले. त्यांच्या जीवनातील वैराग्य, हे ऐन तारुण्यात आलेल्या वैधव्यामुळे आले. खंडेराव होळकरांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या जीवनात सर्वोच्च दुःख आले. सर्वोच्च दुःखाचा परिणाम सर्वोच्च वैराग्यात झाला आणि सर्वोच्च वैराग्याने त्या पुण्यश्लोक ठरल्या.

राष्ट्रमाता, हिंदवी स्वराज्यमाता माँसाहेब जिजाऊ यांचे वडील आणि भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशी देवगिरीच्या किल्ल्यावर मारले गेले. या असीम दुःखाने माँसाहेब जिजाऊंच्या जीवनात जे वैराग्य आले, त्या वैराग्याने आपले संपूर्ण जीवन त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी अर्पण केले.

कौटुंबिक सुखाचा त्याग या वैराग्यानेच त्यांना शक्य झाला. माँसाहेब जिजाऊ आणि पुण्यश्लोक आहिल्यादेवी या दोन महान मातांनी आपल्या जीवनातील सर्वोच्च दुःखाला सकारात्मकतेने घेतले आणि त्या इतिहास प्रसिद्ध झाल्या. मानव म्हणून जन्माला येऊन त्या देवत्वापर्यंत पोहोचल्या. दुःखाचा परिणाम नकारात्मकतेने घेतला, तर त्यातून वेदना आणि क्रोध निर्माण होतो. त्याचा परिणाम मानवाचा दानव होतो. दुःखाचा परिणाम सकारात्मकतेने घेतला, तर त्यातून वैराग्य निर्माण होते आणि वैराग्यातूनच मानवाचा देव होतो. देवत्व येण्यासाठी त्याग हीच एकमेव अट आहे आणि त्याग वैराग्याशिवाय अशक्य आहे.

जीवनात येणारे कोणतेही छोटे मोठे दुःख, हे जर अटळ असेल, तर आपल्याला त्याचे रूपांतर वरदानात करता येऊ शकते, फक्त आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि प्रतिक्रिया आपल्याला सकारात्मक करता आली पाहिजे.

कास घालुनि बळकट l झालो कळिकाळावरी नीट l केली पाट वाट भवसिंधुवरूनी ll
यारे यारे लहानथोर l याती भलती नारी नर l करावा विचार l नलगे चिंता कोणाशी ll

दुःखावर मात करण्यासाठी अशी मानसिकता बनली, तर आपले जीवन शूरत्वाने सफल झाले असे सिद्ध होते.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment