कापालिक भाग १०

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग १० –

सकाळ झाली तेव्हा संगीताच्या घरात एकदम गोंधळ उडाला होता. शेजाऱ्यांची घरासमोर एकच गर्दी लोटली होती. संगीताच्या आईने सकाळी उठल्या बरोबर पाहिले तो घराचे दार सताड उघडे असलेले तिला दिसले. घरात संगीताचा कुठेच पत्ता नव्हता. काही लोकांच्या मते संगीता कुणा प्रियकराचा हात धरून पळून गेली होती तर काहींच्या मते तीचे घरातून अपहरण करण्यात आले. काही जण म्हणत होते की आईबापाशी भांडण करून संगीताने घर सोडले होते. अनेकांची अनेक मते. सगळीकडे तपास केल्यानंतरही तिचा पत्ता न लागल्याने तिच्या आईवडिलांनी गावातील पोलीसस्टेशन गाठले.(कापालिक भाग १०)

आतापर्यंत ओतूर गावातील पोलीस स्टेशनला मुख्यालयाकडून एखाद्या केसमध्ये बाबाचे / बुवाचे नाव असेल तर चांदवड पोलीस ठाण्याच्या सब. इन्स्पेक्टर आहीरेंना रिपोर्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच तो तपास त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची ऑर्डरही नुकतीच फॅक्सद्वारे त्यांना प्राप्त झाली होती. त्याबद्दलच पोलिसांमध्ये चर्चा चालू असताना १०/१२ जणांचा घोळका पोलीसस्टेशन मध्ये घुसला.

“साहेब… साहेब… माझ्या पोरीला वाचवा हो…” संगीताच्या आईने दिसेल त्याला हात जोडून विनंती करायला सुरुवात केली. शेवटी तिथल्या एका हवलदाराने त्यांना खुर्चीवर बसवले आणि त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत चौकशीला सुरुवात केली.

“बाई.. आधी शांत व्हा… पाणी प्या… आणि नीट सांगा… काय झाले?”

“साहेब… माझी पोरगी हो… घरातून नाहीशी झाली. सकाळी दार सताड उघडे होते पण ती मात्र घरात नव्हती.” पाण्याचा एक घोट घेवून संगीताच्या आईने सांगितले.

“बरे.. घरातील काही वस्तू गेल्या आहेत का?”

“नाही हो… इतर कोणत्याच गोष्टीला हातही लागलेला नाही. माझ्या पोरीचे कपडेही जागच्या जागी आहेत. म्हणजे ती पळून गेली नाही हे नक्की.”

“बरे… मला सांगा… रात्री कुणी घरात आले होते का?”

“नाही… कुणीच नाही…”

“सकाळी दार उघडल्याचा आवाज आला का?”

“आम्ही सगळे झोपेत होतो त्यामुळे आम्हाला कुणालाच त्याबद्दल माहिती नाही.”

“बरे घरात आणखी कोण कोण असतं?”

“मी, माझा लहान मुलगा विसू, संगीता आणि संगीताचे बाबा असे चौघेच असतो.”

“बरे… तुमचा कुणावर काही संशय? येत्या एकदोन दिवसात तीच्या वागण्यात काही बदल किंवा एखादी विशेष घटना जी त्यावेळेस विशेष वाटली नाही पण आता ती विशेष वाटेल अशी?”

“नाही तसा कुणावर संशय नाही पण…. हो… काल एक बाबा आमच्याकडे भिक्षा मागायला आला होता. त्याने एकदा माझ्या पोरीकडे पाहिले आणि मला बोलावून सांगितले कि येत्या दोन दिवसात तिच्यावर संकट येणार आहे.” संगीताच्या आईला एकदम आदिनाथाचे स्मरण होऊन तिने ती घटना पोलिसांना सांगितली.

“ए… हे तू मला का नाही सांगितले कालच?” संगीताचे वडील बायकोवर ओरडलेच.

“शांत व्हा..!!!” एका हावलदाराने संगीताच्या वडिलांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण केसमध्ये बाबाचा उल्लेख आल्याने पोलीस सजग झाले. त्वरित त्यांनी चांदवडच्या आहिरेंना फोन केला. कारण तशाच ऑर्डरचा फॅक्स त्यांना आला होता.

“हेल्लो चांदवड पोलीस स्टेशन” पलीकडून आवाज आला.

“हेल्लो मी ओतूर पोलीसस्टेशन मधून हावलदार जाधव बोलतोय… मला आहिरेसाहेबांशी बोलायचे आहे.”

“बोला हावलदार… मी सब. इन्स्पेक्टर आहिरेचं बोलतो आहे.”

“साहेब एक केस आली आहे. पोरगी घरातून नाहीशी झाल्याची. त्याच्या चौकशीत बुवाचे नाव समोर आले आहे. त्यामुळे तुम्हाला फोन केला.”

“ठीक आहे… लगेच निघतो मी इथून… तुम्ही त्यांची रीतसर फिर्याद नोंदवून घ्या. मी पोहोचतोच..”

जवळपास दीड तासात इन्स्पेक्टर आहिरे ओतूर पोलीस स्टेशनला पोहोचले. तो पर्यंत हावलदाराने संगीताच्या कुटुंबियांना घरी पाठवले होते आणि थोड्या वेळात आम्ही तुमच्या घरी येऊ,पण शक्यतो कोणत्या गोष्टी हलवू नका अशी सूचना केली होती.

हावलदाराकडून जुजबी माहिती घेऊन आहिरे संगीताच्या घरी पोहोचले. संगीताच्या आईचे अश्रू अजूनही थांबले नव्हते. पोलिसांना पाहताच ती धावतच दारात आली.

“साहेब… लागला का काही तपास?”

“अहो बाई… लागेल… तुम्ही काळजी करू नका. आम्ही आलोत ना आता…” अगदी आश्वासक आवाजात त्यांनी संगीताच्या आईला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“बरं आता परत पहिल्यापासून मला सांगा बरं… काय काय घडलं ते… आणि हो तुम्हाला कुणी बाबाने सांगितलं होतं तिच्यावर संकट येणार आहे म्हणून? खरंय का हे?” आहिरेंनी आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला.

संगीताच्या आईने घडलेली सगळी हकीकत परत एकदा सांगून टाकली.

“बरं… मला सांगा… कसा होता तो बाबा ज्याने तुम्हाला संगीतावर संकट येणार आहे असे सांगितले? म्हणजे त्याचा पेहराव किंवा उठून दिसतील अशा काही खुणा?”

“तो एक नाथ जोगी होता साहेब… खूप तेज होतं त्याच्या चेहऱ्यावर” संगीताच्या आईने आहिरेंना जरी आदिनाथाबद्दल सांगितले तरी तो असे काही करेल असे तिला बिलकुल वाटत नव्हते.

तेवढ्यात तिथे बघणाऱ्यांपैकी एक जण उत्तरला… “आयला… त्यो जोगी तर हिडंच हाय… मारतीच्या देवळात बशेल हाय कालपास्नं”

“काय सांगतोस? हावलदार… चला… पाहूच कोण आहे तो जोगडा… चल रे बस गाडीत आणि चाल मंदिरात…” त्या पोराचा हात धरत आणि त्याला गाडीत बसवत आहिरे निघाले.

आहिरे आणि त्यांची टिम मंदिरात पोहोचले तेंव्हा आदिनाथ त्यांना समाधीतच बसलेला दिसला. गाडीतून खाली उतरताच आहिरेंनी संगीताच्या आईला विचारले.

“काहो बाई… हाच जोगी काल आला होता का तुमच्या कडे?”

“हो साहेब… यानेच सावध केले होते मला.” तिने आदिनाथाकडे इशारा करत सांगितले. आहिरे लगेचच मंदिराच्या ओट्याजवळ आले.

“बाबा… ओ… बाबा… उठा… तुम्हाला काही विचारायचे आहे…” कोणताही बाबा / बुवा दिसला कि आहीरेंच्या तळपायाची आग मस्तकात जायची. हे लोकं देवाच्या नावाखाली भोंदूगिरी करून सामान्य लोकांना फसवतात हेच त्यांनी त्यांच्याकडे आजवर आलेल्या केसेस वरून पाहिले होते. पण तरीही लगेच आदिनाथाला एकेरी संबोधणे त्यांना योग्य वाटले नाही. पण आदिनाथाकडून काहीच हालचाल न झाल्याने आहिरे भडकले.

“सावंत… खेचा त्याला खाली… साला नाटकं करतो… ए गोसावड्या… चल उठ!” सगळ्या गावादेखत हा गोसावडा आपला अपमान करतो म्हणजे काय? चरफडत त्यांनी हावलदार सावंतला हुकुम सोडला.

आहीरेंच्या बोलण्याचा अवकाश आणि सावंत पायऱ्या चढून ओट्यावर आला. पुढे सरसावून त्याने आदिनाथाला हालवण्यासाठी हात लावला मात्र आणि तो दोन फुट लांब जाऊन पडला. अगदी अनपेक्षितपणे तो फेकला गेल्यामुळे त्याच्या कमरेला चांगलाच मार बसला होता आणि त्या झटक्याने तो चांगलाच कळवळला. काय घडले, कसे घडले हे मात्र कुणालाच कळेना. एखादे भूत पहावे तसे सावंतने भेदरून आदिनाथाकडे पाहिले. आदिनाथाचा चेहरा मात्र पहिल्या सारखाच निर्विकार होता. हे सगळे पाहून आहिरे जाम भडकले.

“साला… हरामखोर… तीनपाट टोटके करतोस? तू असा नाही ऐकायचा, तुला आमचा पोलिसी खाक्याच दाखवतो. थोरात… चौदावं रत्न दाखवा त्याला.” आहिरेंनी हावलदार थोरातला फर्मान सोडले. साहेबांची आज्ञा त्याला पाळावीच लागणार होती. पण त्याने सावंतची झालेली हालत देखील पाहिली होती त्यामुळे तो जरा घाबरतच पायऱ्या चढला. सावंतने डायरेक्ट हात लावला म्हणून त्याची अशी स्थिती झाली असे समजून थोरातने आपल्या हातातील दंडुका त्याच्या अंगाला टोचून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्या काठीचा स्पर्श होताच त्याचीही तीच स्थिती झाली जी सावंतची झाली होती.

क्रमशः कापालिक भाग १०,कापालिक भाग १०.

मिलिंद जोशी, नाशिक…

कापालिक भाग ९

Leave a comment