कापालिक भाग ९ –
या सगळ्या गोष्टी फक्त एकजण पहात होता… आदिनाथ… जरी लोकांना तो समाधीत लीन आहे असे वरकरणी दिसत होते तरी त्याचे सगळे लक्ष कापालिकाच्या कृतींवर होते. कापालिकाने पाठवलेली हडळ आता संगीताच्या दारासमोर उभे असलेली सुद्धा त्याने पाहिली होती परंतु त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसून आलेले नव्हते. सध्या तो फक्त कापालिक कोणत्या गोष्टी करतो आहे आणि त्याची शक्ती किती आहे याचाच अंदाज घेत होता. आदिनाथाने ठरवले असते तर तिथल्या तिथेच या सगळ्या गोष्टी त्याने थांबवल्या असत्या पण असे केल्याने कापालिकाला त्याला पकडून देता आले नसते त्यामुळे त्याचा अंतरात्मा त्याला फक्त पाहण्याचीच अनुमती देत होता.(कापालिक भाग ९)
हडळीने एकदा घरातील परिस्थितीचा अंदाज घेतला. तशी मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे सगळीकडे सामसूम झाली होती. दार आतून लावलेले होते पण हडळीला त्याची काहीएक काळजी नव्हती. भिंतीच्या बाहेरूनच हडळीने धुरात पाहिलेला चेहरा कुठे दिसतो आहे का याचा तपास केला आणि एका खोलीत तिला संगीता पलंगावर झोपलेली आढळून आली. क्षणार्धात हडळ भिंतीच्या आरपार जावून संगीताच्या पलंगाजवळ पोहोचली. जर कुणी त्यावेळेस तिथे आले असते तर त्या हडळीचे ते बिभत्स रूप पाहून तिथेच घेरी येवून पडले असते. हडळीचा चेहरा एकदम दुधासारखा पांढरा फटक होता. नाकाच्या जागी फक्त दोन भोके होती. डोळे होते पण त्यात बुबुळे दिसत नव्हती. केस खूपच लांबसडक होते पण तेही पूर्णपणे पांढरे आणि अस्ताव्यस्त विस्कटलेले होते. संगीता मात्र अगदी शांत झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावरील मासूम भाव तिच्या सौदर्यात भरच घालत होते. हडळीने तिच्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरले. एरवी कोणीही हसताना चांगलेच वाटते पण हडळीच्या चेहऱ्यावरील हास्य मात्र तिच्या भेसूरपणात आणखीनच भर घालत होते. हडळ एकटक संगीताकडे पहात होती आणि तेवढ्यात संगीताची झोप चाळवली गेली. तिने डोळे उघडले मात्र आणि तिच्या तोंडून अस्पष्ट किंकाळी बाहेर पडण्याआधीच तिची शुद्ध हरपली.
इतके दिवस हडळीला शरीर मिळाले नसल्यामुळे ती कुणाला दिसत नव्हती. तिचे ओरडणे, किंचाळणे, हुंदके देणे कुणाला ऐकू सुद्धा जात नव्हते पण आज तिला तात्पुरते असले तरी शरीर प्राप्त झाले होते आणि त्यामुळे एरवी कुणालाही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ न शकणारे वासनाशरीर आता लोकांना स्वतःचे अस्तित्व दाखवून देणार होते. आपल्याला पाहून एक मुलगी घेरी येवून पडते ही भावनाच तिला असुरी आनंद देऊन गेली होती. कापालिकाच्या या छोटाशा कामाने आपल्याला आता बऱ्याच गोष्टी करता येतील याचाही आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसू लागल्यामुळे तिचा चेहरा आता जास्तच भीतीदायक दिसू लागला. पण कापालिकाने तिला लगेच बोलावले असल्यामुळे तिने लगेचच संगीताच्या शरीरात प्रवेश केला.
हडळीने प्रवेश केल्यामुळे जेव्हा संगीताने डोळे उघडले त्यावेळेस तिच्या डोळ्यातील बुबुळे ही निम्म्याने लहान झालेली होती. तिच्या चेहऱ्यावरील गोऱ्या रंगाची जागा पांढऱ्या रंगाने घेतली होती. तिच्या कपाळावरील नसा तट्ट फुगून वर आल्या होत्या आणि त्या गडद हिरव्या रंगाच्या दिसू लागल्या होत्या. झोपेतून उठल्यामुळे तिचे काळेभोर केस जरासे राठ आणि विस्कटलेले दिसत होते. तिच्या चेहऱ्यावरील ते उठून दिसणारे खळाळते हास्य आता विकट बनले होते. तिचे हे रूप तिनेच आरशात पाहिले असते तर ती स्वतः घाबरून बेशुद्ध पडली असती.
संगीताने आता तडक घराचे दार उघडले आणि ती कुठेही इकडे तिकडे न पाहता धोडपच्या दिशेने निघाली. तिच्या चालण्यातील वेग हळूहळू खूपच वाढला आणि आता ते पळण्यात रुपांतरीत झाले.
हे सगळे आदिनाथ बसल्या जागेवरून पहात होता. एकदा त्याचे मन संगीताच्या या अशा परिस्थितीमुळे व्याकूळ देखील झाले. तिला या परिस्थितीतून बाहेर काढावे असाही एक विचार त्याच्या मनात येवून गेला पण त्याचे उद्दिष्ट याच्या मुळाशी जाऊन त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याचे होते त्यामुळे त्याला आपल्या मनातील विचारावर नियंत्रण ठेवावे लागले.
अगदी काही वेळातच संगीता धोडप किल्ल्याच्या माचीवर पोहोचली जिथे कापालिक आपली साधना करत बसला होता. इतरांना जरी ती संगीता दिसली असती तरी कापालिकाला मात्र संगीताच्या शरीरात असलेली हडळ दिसत होती. हडळीने आपले काम चोख बजावलेले पाहून कापालिकाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद पसरला.
“हडळे… तू तुझं काम चांगलं बजावलं आहे. आता तू माझी गुलाम झाली आहेत त्यामुळे ज्या ज्या वेळेस मला गरज असेल त्या त्या वेळेस मी तुला अशी एखादी कामगिरी सोपवणार आहे आणि त्याबदल्यात तुला मी लोकांच्या शरीरात प्रवेश करून तुझ्या अपुऱ्या रहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याची सिद्धी देतो आहे. पण लक्षात ठेव… माझ्याशी जर कपट करशील तर मात्र तुला फार भयानक यातना द्यायला मी बिलकुल मागेपुढे पाहणार नाही. कारण तू नाही तर मी दुसऱ्या कुणाकडूनही माझे काम करून घेऊ शकतो. पण तुला शक्ती मात्र मीच देऊ शकतो हे लक्षात ठेव…”
“कापालिका… मी बिलकुल तुझ्याशी कपट करणार नाही. कारण आज तू मला ही सिद्धी देऊन माझ्यावर उपकार केले आहेत. आता मला काय आज्ञा आहे?” एरवी मंजुळ असलेला संगीताच्या आवाजात एकदम बदल होऊन तो घोगरा बनला होता.
“अजून तुझे काम संपलेले नाही. दोन दिवसांनी आमावस्या आहे. त्या दिवशी मी हिचा बळी देणार आहे. तो पर्यंत हिने काही करू नये म्हणून तुला हिच्या शरीरातच राहावे लागणार आहे. पण ते इथे नाही तर किल्ल्यावरील तळघरात.”
“ठीक आहे… चल तर मग… मी तुझ्या मागोमाग येते.”
कापालिकाने आता त्याने मांडलेल्या पुजेची सांगता केली आणि आपल्या सगळ्या वस्तू बरोबर घेवून तो चालू लागला. संगीताच्या शरीराचा हडळीने ताबा घेतलेला असल्यामुळे तीही कापालिकाच्या मागोमाग चालू लागली.
क्रमशः कापालिक भाग ९,कापालिक भाग ९.
मिलिंद जोशी, नाशिक.