कापालिक भाग ८

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग ८ –

ओतूर गावातून निघालेला कापालिक तडक किल्ल्यावर आला. तो पर्यंत परत अंधार पडला होता. किल्ल्यावरील सोनारवाडी सुद्धा शांत झाली होती. कापालिक तडक किल्ल्यावरील शेवटच्या गुहेखालील तळघरात आला. त्याने लावलेला दिवा अजूनही मंदपणे तेवत होता. आता त्याचे फक्त एकच उद्दिष्ट होते आणि ते म्हणजे कसेही करून पायथ्याच्या गावातील त्या तरुणीला गडावर आणायचे. बरे तिला संमोहित करून आणायचे तर तिच्या घरातून ती बाहेर पडणार नव्हती आणि जरी काही कारणाने ती घराबाहेर पडली तरी ते लोकांच्या लक्षात यायला वेळ लागला नसता. खूप विचार केल्यानंतर शेवटी त्याने त्याच्या अघोरी शक्तीची मदत घेण्याचा विचार मनामध्ये पक्का केला. खरं तर त्याला त्याशिवाय काही गत्यंतरही नव्हते आणि त्यासाठी त्याला रात्रीच्या दुसऱ्या प्रहरापर्यंत थांबणे गरजेचे होते.(कापालिक भाग ८)

जसा रात्रीचा दुसरा प्रहर सुरु झाला तसे कापालिकाने अघोरी पुजेची तयारी सुरु केली. जवळच ठेवलेल्या झोळीमध्ये काही त्याच्या दृष्टीने महत्वाच्या वस्तू टाकल्या. बरोबर आपला चिमटा घेतला आणि गडावरून खाली माचीवर येवून सरळ इखाराच्या बाजूला निघाला. या ठिकाणाचा पूर्वी स्मशानासारखा वापर केला जायचा त्यामुळे त्याला पायथ्याच्या गावातील स्मशानात जाण्याची गरज वाटली नाही. ज्या ठिकाणी तो पोहोचला त्या ठिकाणी त्याला अनेक समाध्या आणि कबरींचे अवशेष दिसत होते. मध्ये मध्ये काही खुरटी झुडपेही असल्यामुळे त्या जागेच्या भयानकते मध्ये आणखीनच वाढ झाली होती. त्यात आमावस्या जवळ आल्यामुळे चंद्रप्रकाश सुद्धा अगदीच जेमतेम होता. मोडकळीस आलेल्या कबरींचे पांढऱ्या रंगातील अवशेष मात्र त्यातही उठून दिसत होते. रात्रीच्या वेळेस या भागात कुणीही फिरकत नव्हते कारण अनेकांच्या मते या ठिकाणी अनेक सैनिकांची भुते फिरत असत. अनेकांनी या ठिकाणी अनेक प्रकारचे चित्रविचित्र आवाजही ऐकले होते. पूर्वी किल्ल्यावर मृत्यू झालेल्या बाळंतीण बायका सुद्धा इथे हिंडतात असेही काही लोकं म्हणत. आणि कापालिकाला तर अशाच जागेची आवश्यकता होती.

त्यातल्या त्यात थोडीशी सपाट जागा शोधून त्याने ती हातानेच साफ केली. तिथेच एका कबरीजवळ पडलेला जरासा लांबट असा एक सव्वा फुटाचा दगड आणला आणि त्या जागेवर ठेवला. आता त्याने झोळीत आणलेल्या वस्तू एकेक करून बाहेर काढायला सुरुवात केली. सर्वात प्रथम त्याने दोन बाटल्या बाहेर काढल्या. त्यातील एका बाटलीत कोंबड्याचे रक्त आणि दुसऱ्या बाटलीत दारू भरलेली होती. त्यानंतर त्याने एक डबी बाहेर काढली. त्यात कावळ्याचे डोके आणि घुबडाचे डोळे यांना एकत्र जाळून तयार केलेल्या राखेत वटवाघळाचे रक्त मिसळून तयार केलेली पेस्ट होती. नंतर त्याने माणसाच्या हाताची दोन हाडे बाहेर काढली. त्यानंतर एका पुडीत गुलाल, कुंकू, काळी हळद आणि लव्हाळा वनस्पतीची वाळलेली पाने आणि काही रिकाम्या कटोऱ्या बाहेर काढल्या. त्यानंतर कालिकेच्या नावाचा जयजयकार करून स्वतः भोवती आणि त्या दगडाभोवती लोखंडाच्या चिमट्याने एक वर्तुळ काढले. नंतर आणखी एक वर्तुळ त्याच्या वर्तुळाच्या बाहेर काढले आणि पुडीतील काळी हळदीची पूड हाती घेऊन साबरी मंत्र म्हणायला सुरुवात केली. मंत्र पूर्ण होताच त्याने ती पूड आखलेल्या दोन्ही वर्तुळांवर टाकली आणि पुन्हा एकदा कालिकेच्या नावाचा गजर केला. आता त्याने दोन्ही बाटल्या हातात घेतल्या आणि एका रिकाम्या कटोऱ्यात दारू आणि रक्त एकत्र करून त्याचा सडा त्या दगडाच्या पुढे शिंपडला व उरलेल्या मिश्रणाने त्या दगडाला अंघोळ घातली. त्यानंतर त्या दगडाच्या वरच्या भागाला कुंकवाचा वापर करून डोळे, नाक तोंड काढले आणि त्यावर गुलाल आणि काळ्या हळदीचा अभिषेक केला. त्यापुढे माणसाच्या हाताची दोन हाडे क्रॉस करून ठेवली व त्यानंतर अभिमंत्रित केलेली लव्हाळ्याची पाने त्या दगडावर वाहून कालिकेचे आवाहन चालू केले. आवाहन मंत्र पूर्ण झाल्यावर त्याने बरोबर आणलेल्या डबीतील पेस्ट मधोमध कपाळाला उभ्या गंधासारखी लावून त्याचा दोन्ही डोळ्यांना आणि कानाला स्पर्श केला.

आता त्याला त्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या ज्या एरवी माणसाला दिसत नाहीत. प्रत्येक कबरीच्या वर आणि इतरही बाजूला त्याला एकेक धुरकट आकृती दिसत होती. ती सगळी तिथे गाडल्या गेलेल्या किंवा मुक्ती न मिळालेल्या व्यक्तींची वासनाशरीरे होती. त्यातील बरीच वासनाशरीरे अगदी शांत आणि स्थितप्रज्ञ दिसत होती. काही मध्येच खालीवर होत होते आणि थोड्या थोड्या वेळाने किंचाळत होते. काही वासनाशरीराचे हुंदके त्याला स्पष्ट ऐकू येत होते. कापालिक प्रत्येक वासनाशरीराकडे कडे अगदी लक्षपूर्वक पहात आणि ऐकत होता. कारण त्याला असे एखादे वासनाशरीर पाहिजे होते ज्याच्याकडून त्याला पाहिजे तसे काम करून घेता येईल. जी वासनाशरीरे अगदी शांत होती त्यांनी त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छांवर नियंत्रण मिळवले होते त्यामुळे त्यांना कह्यात करणे अवघड होते. हे पहात असताना त्याला असे एक वासनाशरीर दिसले जे इतरांपेक्षा खूपच जोरात खालीवर होत होते आणि ज्याचा रडण्याचा स्वर सुद्धा इतरांपेक्षा मोठा होता. कापालिकाने परत एकदा हातात काळी हळद घेतली आणि मग त्यावर साबरी मंत्राचा उच्चार करून ती त्या वासना शरीराच्या दिशेने फुंकली.

आता त्या वासनाशरीराची तडफड पहिल्यापेक्षा कैक जास्त पटीने वाढली आणि ते कापालिकाच्या दिशेने धावून आले. पण कापालिकाने स्वतः भोवती आखलेल्या वर्तुळात त्याला प्रवेश करता येईना. तेवढ्यात परत एकदा कापालिकाने साबरी मंत्राचा उच्चार करून आपल्या हातातील चिमटा त्या वासना शरीराला मारला आणि ते मोठ्याने कळवळले. त्यानंतर त्याला दुसऱ्या छोट्या वर्तुळात कैद करून कापालिकाने विकट हास्य केले. आता मात्र त्या वासनाशरीराच्या धुरकट चेहऱ्यावरील भाव सारखे बदलत होते. कधी संतापाने ते ओरडत होते तर कधी वेदनेने विव्हळत होते.

“कापालिका… मला का असे बांधले आहेस?” ते वासनाशरीर संतापाने कापालिकावर ओरडले.

“हडळे… चूप… आता तू माझ्या ताब्यात आहेस. जे काय विचारायचे ते मी विचारणार आणि मीच सांगणार”

“काय विचारणार आहेस मला? याचे परिणाम खूप वाईट होतील.”

“ते मी पाहून घेईल. आधी माझे काम कर मग मी तुला मोकळी करीन.” वासनाशरीराच्या कोणत्याही धमकीची पर्वा न करता कापालिकाने आज्ञा केली.

“कोणते काम? आणि मी नाही केले तर?”

“तर? तर तुझे यापेक्षाही जास्त हाल करेल.” विकट हास्य करत कापालिक उत्तरला.

कापालिकाच्या हसण्याचा भयंकर संताप येवून त्या वासनाशरीराने आपली सगळी शक्ती एकवटून कापालिकावर धावायचा प्रयत्न केला पण आपण पूर्णपणे बांधले गेलो आहोत हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. आता त्याने सांगितलेले काम करण्यावाचून काहीच गत्यंतर नव्हते.

“ठीक आहे… काय करायचे आहे मी?”

“जास्त काही नाही. फक्त एका तरुणीच्या शरीरात प्रवेश करून तिला इथे या ठिकाणी घेवून यायचे आहे. आजच्या आज. जर तू हे काम व्यवस्थितपणे पूर्ण केले तर मी तुला कोणत्याही शरीरात प्रवेश करण्याची शक्ती देईल आणि तुला तुझ्या इच्छा पूर्ण करून घेता येतील. पण जर माझ्याशी कपट करण्याचा विचारही मनात आणला तर मात्र त्याची खूप भयंकर शिक्षा तुला भोगावी लागेल. बोल आहेस तयार?”

आता मात्र या कापालिकाची मदत केली तर आपल्या सुद्धा इच्छा आपल्याला पूर्ण करून घेता येऊ शकतील हा विचार करून त्या वासनाशरीराने त्याला होकार दिला.

“पण ज्या तरुणीच्या शरीरात मला प्रवेश करायचा आहे ती कुठे आहे? आणि अजून माझ्यात ती शक्ती सुद्धा नाहीये.”

“त्याची काळजी तू करू नको. ती शक्ती मी तुला माझ्या मंत्राच्या सामर्थ्यावर देऊ शकतो.” इतके बोलून त्याने परत एकदा हातात काळी हळद घेतली आणि मंत्रोच्चार करून ती त्या वासनाशरीराच्या दिशेने फुंकली. त्याबरोबर ते शरीर मोकळे झाले. तसेच त्याला आता त्याच्यात नवीन शक्तीचा संचार झाल्याचेही जाणवू लागले. आता कापालिकाने हातात गुलाल घेतला आणि त्यावर मंत्र उच्चारून तो त्या वासनाशरीराच्या समोर फुंकला. त्यासरशी तेवढ्या भागात एक ढग तयार झाला आणि त्यात हळूहळू एक चित्र तयार होऊ लागले. त्या चित्रात संगीताचा चेहरा स्पष्ट दिसू लागला. आता वासनाशरीराने सुद्धा सातमजली हास्य केले आणि त्याच्या धूसर चेहऱ्याने स्त्रीचा आकार धारण केला. क्षणार्थात ती हडळ तिथून नाहीशी झाली आणि काहीशा दूरवर असलेल्या ओतूर गावातील संगीताच्या घरासमोर प्रकट झाली.

क्रमशः कापालिक भाग ८,कापालिक भाग ८.

मिलिंद जोशी, नाशिक…

कापालिक भाग ७

Leave a comment