कापालिक भाग ७

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग ७ –

सप्तशृंगी गडावरून निघून आदिनाथ त्याच्या प्रवासाला लागला. सप्तशृंगीचा आशिर्वाद मिळवल्यावर चांदवड गावी जाऊन एकदा रेणुका मातेचा आशिर्वाद घ्यावा आणि पुढे निघावे असा विचार करून त्याने कळवणचा रस्ता धरला. कळवण वरूनच त्याला चांदवडला जाता येणार होते. आता पर्यत ऊन चांगलेच तापले होते. सगळीकडे रखरखीत ऊन आणि ओसाड जमीन तेवढी दिसत होती. अधेमधे नाही म्हणायला काही मोठी झाडे होती, पण ती रस्त्याच्या कडेला नसल्यामुळे त्याचा फारसा फायदा नव्हता. आदिनाथ मात्र या गोष्टींचा विचारही करत नव्हता. रस्ता अगदीच निर्जन होता. मनात भगवंताचे नामस्मरण आणि आई रेणुका मातेकडे घेऊन जाणारी वाट हेच काय ते त्याचे सोबती होते. दुपारी बारा साडेबाराच्या सुमारास तो ओतूर गावात पोहोचला. या गावात थोडा विश्राम करून भिक्षा मागावी, आणि पोटातील क्षुधा काही प्रमाणात शांत करून पुढच्या प्रवासाला निघावे असा विचार करून त्याने विश्राम करण्यासाठी मंदिर शोधायला सुरुवात केली. लवकरच त्याला गावातील मारुतीचे मंदिर दिसले. पटपट पाऊले उचलून त्याने मंदिर गाठले. मंदिराचे प्रांगण चांगलेच मोठे होते. प्रांगणात वाळू पसरून ठेवण्यात आली होती. मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडात केले होते. तसा मंदिराचा गाभारा जरी त्यामानाने लहान असला तरी त्यापुढे प्रशस्त ओटा बांधण्यात आला होता. त्याला पत्र्याची शेडही करण्यात आली होती. २०/२५ माणसे आरामात रिंगण करून भजन करू शकतील इतका तो प्रशस्त होता. आदिनाथाने पहिल्याच पायरीला वाकून नमस्कार केला.(कापालिक भाग ७)

“अलख निरंजन…”

दगडामध्ये कोरलेली पाच साडेपाच फुटाची शेंदूर लावलेली वीर हनुमानाची ती मूर्ती प्रसन्न वाटत होती. आदिनाथाने आधी हनुमानाचे दर्शन घेतले आणि मग नाथ संप्रदायातील प्रथेप्रमाणे फक्त पाच घरातून भिक्षा मागून जितके मिळेल त्यात उदरभरण करण्यासाठी तो मंदिराबाहेर पडला.

“अलख निरंजन” एका घरासमोर येऊन त्याने मोठ्याने आरोळी दिली. थोडा वेळ झाला आणि एक १५/१६ वर्षाची सुंदर मुलगी त्याला भिक्षा वाढण्यासाठी दारात येवून उभी राहिली. तपकिरी डोळे, गोरा रंग, एक वेणी आणि चेहऱ्यावर अल्लड हास्य असे तिचे रूप मनाला मोहिनी घालत होते. ऐन दुपारच्या वेळी आपल्या दारात आलेल्या साधूची झोळी रिती जाऊ नये म्हणून तिने वाटीत गव्हाचे पीठ आणले होते.

“हे घ्या बाबा… झोळी करा पुढे…” मंजुळ आवाजात तिने आदिनाथाला म्हटले.

आदिनाथाने झोळी पुढे करत एकवार तिच्याकडे पाहिले आणि त्याला तिच्यावर येणाऱ्या संकटाची चाहूल लागली. तिच्या भोवती गडद राखाडी रंगाचे ढग जमा झाले आहेत असा त्याला भास झाला. मुलीच्या चेहऱ्यावरील हास्य जरी मोहक होते तरी तिच्या मागे उभ्या असलेल्या नियतीचे हास्य मात्र असुरी होते. येणाऱ्या संकटाबद्दल या मुलीला कसे सावध करावे असा त्याला प्रश्न पडला.

“मुली… घरात कुणी मोठे असेल तर त्याला बोलाव… मला काही सांगायचे आहे.” त्याने झोळीत पीठ ओतून घेताघेता म्हटले.

“बाबा… घरात आई आहे पण तिचा विश्वास नाहीये असल्या गोष्टींवर…” मुलीने काहीशा बेफिकीरीने उत्तर दिले. खरं तर तिचाच असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्यातून या बाबाने आईला काही सांगितले तर आपल्यावर आणखी बंधने येतील म्हणून तिने खोटेच सांगितले होते.

तिच्या मनातील भाव आदिनाथाने केंव्हाच ओळखले.

“मुली… एकदा बोलाव त्यांना… त्यांनी नाही ऐकले तर मी निघून जाईल.”

“संगे… कोण आहे गं?” आपली मुलगी कोणा गोसाव्याशी बोलते आहे हे पाहण्यासाठी तिची आई दारात आली. तेवढ्यात आदिनाथाचे वाक्य तिच्या कानी पडले. आदिनाथाच्या चेहऱ्यावरील सात्विक भाव आणि तेज पाहून तिलाही तो काय सांगतो आहे हे ऐकण्याची इच्छा झाली आणि ती पुढे आली.

“काय सांगायचंय बाबा तुला? मीच हिची आई…”

“बाई गं… दोन दिवस तुला सावध राहावं लागेल. येत्या दोन दिवसात तुझ्या मुलीवर मोठं संकट येणार आहे. त्यामुळे हिला बाहेर येवू देऊ नकोस. काही गोष्टी या टाळता येत नसल्या तरी आपण आपली खबरदारी घेतली तर त्याचा फायदाच होतो. अलख निरंजन…” इतके बोलून आदिनाथ माघारी वळला.

“बाबा… कोणतं संकट? त्यासाठी काही उपाय नाही का करता येणार?”

“बाई गं… गुरुदेव दत्तांचे नामस्मरण हाच खूप मोठा उपाय आहे. देव तुझं आणि मुलीचं भलं करो…” इतके बोलून आदिनाथ पुढच्या घरी भिक्षा मागण्यासाठी निघाला. पण त्याचे मन काहीसे विचलित झाले होते. मुलीवर संकट येणार हे तर त्याला समजले होते पण कोणते हे मात्र समजले नव्हते. शेवटी काही दिवस इथेच राहून तिला वाचवण्याचा प्रयत्न करायचा असे त्याने ठरवले. पुढच्या घरीही त्याला पुरेशी भिक्षा मिळाल्यामुळे तो मंदिरात परतला. मंदिराच्या एका कोनाड्यात त्याने आपली झोळी आणि इतर वस्तू ठेवल्या आणि मंदिरातून बाहेर येवून थोड्या अंतरावर त्याने तीन विटांची चूल तयार केली. आजूबाजूला पडलेला पालापाचोळा, वाळलेल्या फांद्या याचे सरपण बनवून मिळालेल्या पिठाच्या होतील तितक्या छोट्या छोट्या चांदक्या बनवल्या. गुरूला, ग्राम देवतेला, मारुतीला, तेथील प्राण्यांना आणि स्वतःसाठी असे त्याचे पाच भागात विभाजन करून मारुतीचा, गुरूचा आणि ग्रामदेवतेचा भाग मारुतीच्या मूर्तीपुढे त्याने आणून ठेवला. त्याच्या भोवती पाणी फिरवून मनोभावे वंदन केले. मग एक भाग तेथील कुत्र्याला देऊन उरलेला भाग स्वतः खाण्यास बसला. खरं तर हा त्याचा नित्यक्रम होता पण आज मात्र त्याचे मन विचलित होत होते. खाण्याकडे त्याचे लक्षच लागत नव्हते. सतत त्याला या भागात काहीतरी अघोरी प्रकार घडत असल्याचे वाटत होते. पोटपूजा झाल्यावर थोडासा विश्राम करून तो मंदिराच्या ओट्यावरच एका बाजूला समाधी लावून बसला. मारुतीच्या दर्शनाला आलेले लोकं आदिनाथाच्या चेहऱ्यावर असलेले तेज पाहून त्यालाही नमस्कार करून जात होते. आदिनाथाने जरी डोळे मिटले होते तरी त्याला त्या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट दिसत होत्या.

दुपार झाली तसा कापालिक बाहेर पडला. आता परत त्याला माचीवरील सोनारवाडीमधून जावे लागणार होते. लोकवस्तीचा संपर्क टळावा म्हणून त्याने आडबाजूचा मार्ग धरला. तसे हा मार्ग काहीसा धोकादायक होता पण कापालिकाला मात्र त्याचे फारसे काही वाटत नव्हते. काही वेळातच तो माचीवर आला. इथून तीन मार्ग वेगवेगळ्या ठिकाणी जात होते. एक मार्ग म्हणजे इखार्याचा मार्ग, रात्रीच्या वेळेस याच मार्गाने तो आलेला होता. दुसरा मार्ग माचीवरून खाली हट्टी गावात जात होता आणि तिसरा मार्ग जात होता उत्तरेच्या बाजूने ओतूर गावाकडे. हट्टी गावं हे खूपच लहान होते. त्यामानाने ओतूर मात्र मोठे होते. त्यामुळे त्याने ओतुरचा मार्ग धरला. तसेही ओतूर गावं धोडप किल्ल्यापासून बऱ्याच लांब असल्यामुळे त्या गावात जरी लोकांनी त्याला पाहिले असते तरी त्याचा त्याला खास काही फरक पडणार नव्हता. संध्याकाळ पर्यंत कापालिक ओतूर गावात हजर झाला. त्याचा मुख्य उद्देश फक्त कालिकेचा बळी शोधणे हेच असल्यामुळे त्याने प्रत्येक देवळात जाऊन पाहण्याचे ठरवले. याचे मुख्य कारण म्हणजे संध्याकाळच्या वेळेस गावातील बरेच लोकं मंदिरात दर्शनासाठी जात आणि इथेच त्याला त्याचा नरबळी मिळणार होता.

कापालिक मारुती मंदिराजवळ आला आणि तिथेच त्याला समाधी धारण केलेला आदिनाथ दिसला. त्याला पाहिल्याबरोबर कापालिकाच्या मनात चर्र झाले. आदिनाथाच्या चेहऱ्यावरील तेजच तो खूप पोहोचलेला आहे हे समजण्यासाठी पुरेसे होते. त्यामुळे त्यापासून जितके दूर जाता येईल तितके दूर जावे म्हणून कापालिक वळला आणि त्याची धडक संगीताला बसली. संगीता आईने पुष्कळ बजावून देखील फक्त देवळात जाऊन येते म्हणून तिच्या मैत्रिणीबरोबर बाहेर पडली होती. कापालिकाची नजर संगीतावर पडली मात्र आणि त्याला त्याचा बळी सापडला. त्याच्या डोळ्यात आसुरी तेज चमकायला लागले आणि मग इतर कुठेही वेळ न दवडता त्याने पुन्हा धोडप किल्ल्याचा मार्ग धरला.

हे सगळे समाधीत असलेला आदिनाथ बंद डोळ्यांनी पहात होता पण त्याने आपली समाधी मात्र सोडली नाही. कापालिक यानंतर काय करणार आहे हे त्याला पाहायचे होते आणि त्यासाठी त्याला समाधीतच राहणे भाग होते.

क्रमशःकापालिक भाग ७,कापालिक भाग ७.कापालिक भाग ७.

मिलिंद जोशी, नाशिक…

कापालिक भाग ६

Leave a comment