कापालिक भाग ६ –
कापालिकाला जेव्हा जाग आली त्यावेळेस गुहेत सगळीकडे अंधार पसरला होता. एकतर तसा सगळाच भाग अगदीच निर्जन आणि त्यात रातकिड्यांच्या आवाज त्यामुळे त्याची भयानकता अजूनच वाढली होती. मध्येच येणारी बिबट्याची एखादी डरकाळी भल्याभल्यांना घाबरवायला पुरेशी होती. एकतर अगदीच कमी वस्तीचे गांव असल्यामुळे आणि जंगली जनावरांच्या भीतीमुळे रात्री आठ पर्यंत सगळीकडे सामसूम होई. त्यामुळेच आता कापालिकाला कुणी पाहणे शक्यच नव्हते. जंगली श्वापदांची सुद्धा त्याला जराही भीती वाटत नव्हती. बाहेर मांडून ठेवलेला कालिकेचा फोटो आणि दारूची बाटली झोळीत टाकल्यावर त्याने चालायला सुरुवात केली. आता पुढचा पल्ला तसा जास्त लांबीचा नव्हता. जास्तीत जास्त १२/१५ किलोमीटर असेल पण सगळा दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरातून असल्यामुळे त्यात वेळ जास्त जाणार होता. त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये धोडप किल्ल्यावर उजाडायच्या आता पहोचणे गरजेचे होते. जितके अंधारात तो किल्ल्यावर पोहोचेल तितके त्याच्यासाठी चांगले असणार होते.(कापालिक भाग ६)
तो ज्या वेळेस किल्ल्याच्या माचीवर आला त्यावेळेस रात्रीचे साडेतीन वाजले होते. आता त्याला जरा सावधपणे जावे लागणार होते कारण पुढचा मार्ग सोनारवाडी नावाच्या छोट्या वस्तीतून जात होता. तो थोडा पुढे जातो न जातो तोच वस्तीवरील एक कुत्रे मोठ्याने भुंकू लागले. त्याच्या अचानक भुंकण्याने कापालिक काहीसा संतापला पण नंतर त्याने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवून झोळीत हात घालून एक छोटे हाडूक बाहेर काढले आणि ते अभिमांत्रित करून त्या कुत्र्यापुढे टाकले. त्यासरशी कुत्र्याचा आवाज एकदम बंद झाला. आता पुन्हा एकदा कापालिकाने गड चढायला सुरुवात केली. काही वेळातच कापालिक गडावर आला. पडका वाडा आणी तलाव ओलांडून तो शेवटच्या गुहेत शिरला. गुहेमध्ये देवीची मूर्ती बसवलेली होती. कापालिकाने मूर्तीपासून थोड्याच अंतरावर हाताचा दाब दिला मात्र आणि थोडासा आवाज करत एका बाजूने खाली जाण्यासाठी पायऱ्या तयार झाल्या. गुहेत मिट्ट काळोख असूनही कापालिकाला त्याच्या सिद्धीच्या जोरावर सगळे अगदी स्पष्ट दिसत होते. जवळपास १०० एक पायऱ्या उतरल्यावर समोर एक भव्य दालन लागले. हीच ती कापालिकाची तप करण्याची जागा होती. त्या दालनाला हवा खेळती राहावी यासाठी दोन झरोके तयार केले गेले होते. त्यातूनच हवेबरोबरच सकाळच्या वेळेस प्रकाश सुद्धा आत येत होता. तळघराच्या समोरच एक १२/१३ फुटाची कलिकेची मूर्ती उभी करण्यात आलेली होती. रात्रीच्या वेळेस प्रकाशासाठी मशाली लावलेल्या होत्या पण सध्या त्या वापरात असतील याचे कोणतेच चिन्ह तिथे दिसत नव्हते. त्या गुहेतच अजूनही काही गुहा कोरलेल्या दिसत होत्या. बहुतेक याचे मुख्य उद्दिष्ट किल्ल्यावर शत्रूने चढाई केली तर काही या मार्गाने पळायला किंवा मागून येवून हल्ला करायला सोपे जावे हेच असावे. या गुहेला अजून एक असाच गुप्त मार्ग होता जो सोनारवाडीच्या जवळील मारुती मंदिरात उघडत होता. तळघरातील सगळ्या वातावरणात एक कुबट, कोंडट आणि जरासा उग्र वास दरवळला होता. अजून उजाडायला सुरुवात झालेली नव्हती. कापालिकाने देवीपुढे फतकल मारली आणि तिथे ठेवलेल्या एका दिव्याची ज्योत पेटवली. रात्रीच्या किर्र अंधारात त्या छोट्याशा दिव्याचा पिवळसर प्रकाश सगळीकडे पसरला.
आता ती मूर्ती अगदी स्पष्ट दिसत होती. देवीच्या मूर्तीचे ते रूप त्या दिव्याच्या प्रकाशात जास्तच भयावह दिसू लागले. मूर्तीकाराने मूर्ती इतकी तन्मयतेने बनवली होती की सगळ्या गोष्टी अगदी खर्या असल्याप्रमाणे भासत होत्या. मूर्तीच्या डोळ्यांच्या जागी कवड्यांचा वापर खुबीने करण्यात आला होता. कालिकेच्या तोंडातून बाहेर आलेल्या जिभेला कसलासा जंगली झाडांच्या सालापासून तयार केलेल्या रंगाचा लेप लावण्यात आला होता त्यामुळे त्याचा तांबडा रंग अजूनही कुठेच कमी झालेला दिसत नव्हता. मूर्ती जरी दगडाची होती तरी मूर्तीच्या हातातील शास्त्रे मात्र धातूंची असल्यामुळे त्या मूर्तीला जिंवंतपण प्राप्त झाले होते. देवीच्या गळ्यातील कवट्याची माळ खऱ्या कवट्यांचा वापर करून बनवली गेली होती. देवीच्या एका हातातील नरमुंड हे दगडाचे असले तरी त्यावर जंगली रंगमिश्रित मेणाचा वापर केल्यामुळे अगदी हुबेहूब आणि नुकतेच कापून आणल्यासारखे भासत होते. असे हे रूप पिवळसर प्रकाशात तर जास्तच भेसूर वाटत होते. सामान्य माणसाने जर कधी हे रूप पाहिले असते तर नक्कीच त्याच्या तोंडातून भीतीने एखादी किंकाळी फुटली असती.
देवीच्या पुढे एक मोठी पंचकोनी चांदणी पिठाचा वापर करून काढण्यात आली होती. त्यातील मध्यावर एक साबरी मंत्र पिठानेच लिहिण्यात आला होता. त्याच्या चार कोनात चार अर्धवट जळालेले शीर ठेवण्यात आलेले होते आणि त्याचाच उग्र वास सर्व दालनात पसरला होता. कापालिकाने झोळीत हात घातला आणि बरोबर आणलेले पाटलाच्या सुनेचे शीर उरलेल्या पाचव्या कोनात साबरी मंत्राचा वापर करून ठेवले. कोनाच्या बाजूला एक मोठ्या आकाराचे खड्ग धार लावून ठेवण्यात आले होते. त्यावर पुनः एकदा कापालिकाने दृष्टी टाकली आणि विकट हास्य केले.
कालिकेच्या पुजेची सगळी तयारी तर झाली होती. तिथेच जवळच काही दगडी कटोरे एका रांगेत मांडून ठेवले होते. त्यात अनुक्रमे हळद, कुंकू, गुलाल, काळी हळद, आघाडा, दारू हळदीच्या काही वाळलेल्या मुळ्या, गव्हाचे पीठ, चितेतील राख अशा गोष्टी भरून ठेवलेल्या होत्या. त्याच्या पुढे दोन मोठ्या आकाराचे धातूचे भांडे ठेवण्यात आले होते त्यातील एका भांड्यात प्राण्याचे रक्त आणि दुसऱ्यात दारू भरून ठेवण्यात आली होती. आता फक्त गरज होती ती एखाद्या १५/१६ वर्षाच्या कुमारिकेची. कारण तिचा बळी दिल्याशिवाय कालिका प्रसन्न होणार नव्हती आणि कापालिकाचे इप्सित साध्य होणार नव्हते.
दिवस उजाडायला लागला तसा त्याने कालिकेच्या नावाचा मोठ्याने गजर केला. त्याचा आवाज त्या दालनात निनादत घुमला. दिवसा त्याला बाहेर पडता येणार नव्हते त्यामुळे मग त्याने दिवसभर इतर साधना आणि काहीसा आराम करून परत अंधार पडल्यावरच या किल्ल्यातून बाहेर पडायचे त्याने ठरवले.
क्रमशःकापालिक भाग ६,कापालिक भाग ६,कापालिक भाग ६.
मिलिंद जोशी, नाशिक…