कापालिक भाग ५

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग ५ –

चांदवड पोलीस चौकीत सब. इन्स्पेक्टर आहिरे काल घडलेल्या घटनेचाच विचार करत बसले होते. तसं पाहिलं तर नोंदवली गेलेली केस फक्त चितेच्या विटंबनेची होती पण ती राजदेर गावाच्या पाटलाच्या संबंधित असल्यामुळे त्याचे महत्व काहीसे वाढले होते. तसे ही केस एखाद्या नवीन गुन्ह्याची सुरवात असण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती आणि म्हणूनच त्याचा विचार करणे आहीरेंना गरजेचे वाटत होते. इतक्यात केबिनचा दरवाजा उघडून कळवणला पोस्टिंग असलेले सब. इन्स्पेक्टर कदम आत आले. कदम त्यांच्या कसल्याशा केसच्या संदर्भातच चांदवडला आले होते. प्राथमिक हाय हलो झाले आणि तितक्यात हवलदार सावंत हातात एक रिपोर्ट घेवून आत आला.(कापालिक भाग ५)

“साहेब… कालचा पीएम रिपोर्ट आला आहे.”

“अस्सं… आण इकडे. पाहु तरी काही धागा मिळतोय का ते…” आहिरे रिपोर्ट हातात घेवून त्यातील एकेक गोष्ट काजळीपूर्वक वाचू लागले. संपूर्ण रिपोर्ट वाचून झाल्यावर वैतागाने तो त्यांनी टेबलावर आपटला.

“च्यायला ह्येच्या… साला यातून काही मिळेल वाटत होते पण तेही नाही.”

“अरे इतकं काय झालंय वैतागायला? कोणती केस आहे?” सब. इन्स्पेक्टर कदमांनी आहीरेंना प्रश्न केला.

“काही नाही रे… काल राजदेर गावात एका चितेची विटंबना करण्यात आली. कुणीतरी रात्रीच्या वेळेस जळती चिता उधळून त्या प्रेताचे फक्त मुंडके कापून नेले…” आहिरेंनी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला.

“काय सांगतोस?… च्यायला… अरे ४ दिवसांपूर्वी अशीच एक केस माझ्याही ठाण्यात नोंदवली गेली आहे. खेडगावच्या स्मशानातही अशीच जळती चिता उधळून त्या प्रेताचे मुंडके कापून नेल्याची घटना घडली आहे.”

“काय? सेम केस? म्हणजे हे प्रकरण आता फक्त एका तालुक्यापुरते मर्यादित नाहीये तर.” आहीरेंच्या चेहऱ्यावर आता चिंता साफ दिसायला लागली.

“मला काय वाटतेय आहिरे, हे दोन्ही गुन्हे बहुतेक एकाच व्यक्तीने केले असावेत आणि यामागे नक्कीच काहीतरी जादूटोणा यासारखा प्रकार असावा. यावर वेळीच आवर घातला नाही तर पुढे याचा परिणाम काय होईल हे आज सांगणे मुश्कील आहे.” कदमांनी बोलायला सुरुवात केली.

“बहुतेक याचा तपास आता संयुक्तपणे करावा लागणार. तसे मी आजच त्याबद्दल वरिष्ठांना कळवतो. बरं मला तुझ्या केसबद्दल अजून काही माहिती सांग.”

आहीरेंना रिपोर्ट मधून जरी काही धागा मिळाला नव्हता तरी आता त्यांना एक दिशा सापडली होती पण अजून ती स्पष्ट झाली नव्हती. आवश्यक ती सगळी माहिती कदमांना देऊन ते सावंतकडे वळले.

“सावंत… उद्या आपल्या परिसरातील सगळे जोगडे, तांत्रिक, मांत्रिक, म्हसनजोगी, बाबा, बुवा असतील त्यांना चौकीत हजर करा. आणि परिसरात कुठे काही पूजा हवन आहे का याचाही तपास करायला आपल्या लोकांना सांगा. गायकवाड तू राजदेरमध्ये जावून अजून काही हाती लागते का ते पहा… जोगडा फक्त हातात सापडू दे, सोलून काढतो साल्याला. हरामखोर… भोळ्या भाबड्या लोकांना फसवून त्यांच्या पोरीबाळीची, आया बहिणींची अब्रू लुटायची, पैसा लुटायचा आणि वर धर्माच्या नावाने बोंब ठोकायची. नुस्ता सुळसुळाट झालाय अशा बुवांचा.” आहीरेंच्या कपाळाच्या शिरा आता तट्ट फुगल्या. लगेचच सगळ्यांना सूचना देऊन त्यांनी कामाला लावले आणि तातडीने नाशिक ग्रामीण पोलीस स्टेशन हेड ऑफिसला फोन लावला. आता वेळ दवडून चालणार नव्हते. काही झाले तरी याच्या मुळाशी पोहोचायचेच असे त्यांनी मनोमन पक्केच केले. सब. इन्स्पेक्टर कदमांनी सुद्धा याचा पुरता छडा लावायचे ठरवले आणि आहीरेंचा निरोप घेवून बाहेर पडले.

काहीतरी लक्षात आल्याने आहिरेंनी टेबलवरील बेल वाजवली तसा हवलदार थोरात आता आला.

“थोरात… दोन माणसांना बरोबर घे आणि राजदेर किल्ला, इंद्राई किल्ला आणि आसपासच्या गुहा, कपारी चेक कर. काही आढळले तर तत्काळ मला वर्दी दे… निघ लगेच…” आणि थोरात लगेचच बरोबर अजून दोन जण घेवून बाहेर पडला.

क्रमशःकापालिक भाग ५,कापालिक भाग ५,कापालिक भाग ५.

मिलिंद जोशी, नाशिक…

कापालिक भाग ४

Leave a comment