कापालिक भाग ४

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग ४ –

कांचन किल्ल्यापासून २५ मैलावर असलेल्या मार्कंडेयाच्या डोंगरावरील एका गुहेत एक योगी आपल्या योग समाधीत लीन होता. सावळा वर्ण, मानेवर रुळत असलेले काळेभोर केस, भव्य कपाळावर लावलेला चंदनाचा त्रिपुंड तिलक, कानात कुंडले, गळा, दोन्ही दंड आणि दोन्ही मनगटांवर धारण केलेली रुद्राक्षांची माला, हातावर भस्माचे त्रिपुंड आणि कमरेला भगवे वस्त्र परिधान केलेला योगी तेजपुंज वाटत होता. जवळच दोन भगव्या रंगाच्या झोळ्या ठेवलेल्या होत्या. लहान झोळीत विभूती आणि मोठ्या झोळीत एक भिक्षेचा कटोरा आणि एकदोन वस्तू ठेवलेल्या होत्या. हा योगी समाधीला बसून किती वेळ झाला होता हे मात्र समजणे अवघड होते.(कापालिक भाग ४)

थोड्याच वेळात गुहेत कुणी आल्याची जाणीव योग्याला झाली. एरवी काही झाले तरी न भंगणारी योग्याची समाधी मात्र यावेळेस भंग पावली. योग्याने डोळे उघडले तो समोर हिरव्या रंगाची कफनी, एक दीड वीत पांढरी दाढी, डोक्याला मळकट फडके, हातात भिक्षेचा कटोरा घेतलेला फकीर त्याच्याचकडे पाहून गूढपणे हसताना दिसला. फकिराच्या बरोबर दोन कुत्र्यांनी सुद्धा गुहेत प्रवेश केला होता. बाह्यरूप कसेही असले तरी योग्याने मात्र आपल्या गुरूला तत्काळ ओळखले आणि ताडकन उठून मलंग वेशातील आपल्या गुरूच्या पायावर डोके ठेवले.

“उठ आदिनाथा… आता तुझी तपश्चर्या पूर्ण झाली. आता तुला तुझे विहित कर्तव्य करण्यासाठी बाहेर पडायचे आहे.” गुरुदेव योग्याला हाताने उठवत म्हटले.

“गुरुदेव… जशी आपली आज्ञा…”

“पण एक लक्षात ठेव… लवकरच तुझ्या कार्याची सुरुवात होईल पण ते कार्य तू कसे पूर्ण करतोस यावर तुझे नंतरचे विहितकार्य अवलंबून असेल. यशस्वी भवं…” इतके बोलून गुरुदेवांनी तिथून प्रयाण केले.

आदिनाथ क्षणभर गुरुदेवांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पहात राहिला आणि लगेचच परत भानावर येवून “ॐ गुरुदेव” म्हणत एकदा नमस्कार केला आणि “अलख निरंजन” चा ध्वनी गुहेत घुमला.

आदिनाथाने बाजूला ठेवलेली विभूतीची झोळी उजव्या खांद्याला अडकवली, मोठी झोळी डाव्या खांद्याला अडकवली आणि हातात लोखंडाचा चिमटा घेवून गुहेच्या बाहेर पडला. गुरूदेवांचा आदेश तर मिळालाच होता पण आता त्याला जे कार्य हाती घ्यायचे होते त्यासाठी आईचा आशिर्वादही तितकाच महत्वाचा होता. त्यामुळे गुहेतून बाहेर पडलेल्या आदिनाथाने सप्तशृंगी गडाचा रस्ता धरला. सप्तशृंगी गडावर पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचतच आदिनाथाने सप्तशृंगीच्या नावाचा जयघोष केला. संपूर्ण गाभारा त्याच्या खड्या आवाजातील जयघोषाने निनादला. अठरा हाताचे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली यांचे ते एकत्रित महिषासुर मर्दिनी रूप पाहून आदिनाथाचे डोळे आपोआप मिटले गेले आणि त्याने देवीची स्तुती करायला सुरुवात केली. आदिनाथाचे स्तोत्र पठण झाल्याबरोबर त्याच्या ज्ञानचक्षुसमोर देवीचे ते तेजस्वी रूप साकार झाले.

“आई… माझ्या कार्याची सुरुवात तुझ्या आशिर्वादाने करतो आहे… मला यश दे…” जगदंबेचा आशिर्वाद घेवून आदिनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर आला. तोपर्यंत अंधार चांगलाच पडला होता. मंदिराबाहेरचे दिवेही लागले होते.

आई जगदंबेचे दर्शन घेतल्यानंतर नाथ पंथाचे आद्य उपासक भगवान महादेवाचे दर्शन घेण्यासाठी आदिनाथाची पाऊले महादेव मंदिराकडे वळली. महादेवाचे दर्शन घेतल्यावर सकाळी शिवतीर्थावर स्नान करून पुढच्या प्रवासाला निघण्याचे त्याने ठरवले आणि महादेव मंदिरातच एका बाजूला जमिनीवरच अंग टाकले.

आदिनाथाने डोळे उघडले त्यावेळेस नुकताच पक्षांचा किलबिलाट सुरु व्हायला लागला होता. आदिनाथाने प्रातर्विधी उरकून शिवतीर्थाच्या कुंडात बुडी मारली. अत्यंत थंडगार पाण्याचा स्पर्श अंगाला होताच त्याच्यामध्ये एका नवीन उर्जेचा संचार झाला. अजून सूर्यनारायणाने जरी दर्शन दिले नव्हते तरी रात्रीचा अंधार बऱ्याच प्रमाणात दूर झाला होता. पूर्व दिशेला समोरच मार्कंडेयाचा डोंगर दिसत होता. अनेक तीर्थांचा वास असलेला, अनेक योग्यांच्या सिद्धीचा साक्षी असलेला, त्याची स्वतःची तपोभूमी असलेला मार्कंडेय डोंगर त्याला गुरुसमान वाटला आणि त्याने मनोभावे त्याला नमस्कार केला. परत एकदा त्याने दोन्ही झोळ्या आपल्या खांद्याला अडकवल्या आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली.

क्रमशःकापालिक भाग ४,कापालिक भाग ४.

मिलिंद जोशी, नाशिक…

कापालिक भाग ३

Leave a comment