कापालिक भाग ३

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग ३ –

रात्रीच्या अंधारात राजधेर गावातून निघालेला कापालिक कडाक्याच्या थंडीतही झपझप पावले टाकीत चालतच होता. त्याला कोणत्याही परिस्थितीत राजधेरपासून दूर जाणे गरजेचे होते. एकतर सकाळी अशी घटना लोकांच्या लक्षात आल्यावर त्याचा बोभाटा होणार याची त्याला खात्री होती आणि अमावास्येच्या आधी त्याला इतर गोष्टीही करायच्या होत्या. सगळीकडे काळाकुट्ट अंधार आणि डोंगरदऱ्यांचा प्रदेश असूनही कापालिकाला मात्र त्याचे काहीही सोयरसुतक नव्हते. तो आपला एखाद्या बागेतून फिरावे इतक्या निर्धास्तपणे पाऊले टाकत होता.(कापालिक भाग ३)

जसजसी रात्र सरत चालली तसतसा पहाटेचा बोचरा वारा कापालिकाच्या अंगाला झोंबू लागला. आकाशातील तारेही अंधुक दिसू लागले. पूर्व दिशेला सोनेरी रंगाची सूर्याची प्रभा फाकू लागली. रात्रभर अविश्रांत चालल्यामुळे त्याला थोडा थकवा जाणवू लागला. त्याने त्याचा वेग काहीसा मंदावला पण तरी सूर्य डोक्यावर येण्याच्या आत त्याला निर्जन पण आराम करण्यायोग्य जागी पोहोचणे गरजेचे होते. परत त्याने स्वतःचा वेग वाढवला. समोर दिसणारा कांचन किल्ल्याचा डोंगर आता अधिकाधिक स्पष्ट होऊ लागला. लवकरात लवकर तिथे पोहचून आराम करणे त्याला आवश्यक झाले होते. त्याने चालण्याचा वेग जास्तच वाढवला आणि आपण परत एकदा लोकवस्तीत येत आहोत याची त्याला जाणीव झाली.

कांचन किल्ल्याच्या वाटेत असलेले खेल्दरी गांव जरी लहान होते तरी लोकांची शेतावर जायची वेळ असल्यामुळे लोकवस्तीतून जाणे त्याला यावेळी फायद्याचे ठरणार नव्हते. काखेतल्या झोळीत असलेले पाटलाच्या सुनेचे शीर अर्धवट जळाले असल्यामुळे त्याला करपट उग्र दर्प सुटला होता. त्या वासाने गावातील कुत्रे त्याला अडथळा करू शकणार होते आणि म्हणून त्याने परत एकदा आपला मार्ग बदलून शक्य तितके गावाला वळसा घालून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या सुदैवाने तो अजून तरी कुणाच्या दृष्टीस पडला नव्हता. उन आता चांगलेच वाढले होते. कापालिक कांचन डोंगराच्या चढणीला लागला. एरवी माणसाला इतक्या उन्हात अशी चढण चढणे खूप कष्टाचे झाले असते, पण कापालिकाच्या वेगात मात्र काहीही फरक पडलेला दिसत नव्हता. त्याच्यासाठी अशा जागा आणि रस्ते नेहमीचेच. पाउण एक तासातच तो डोंगराच्या पठारावर आला.

कांचन किल्ला त्याला दुपारचा काही तास आराम करण्यासाठी अगदी योग्य ठिकाण होते. एकतर तिथे पिण्याच्या पाण्याचे टाके होते आणि आराम करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने तयार झालेली गुहाही होती. त्या निसर्ग निर्मित गुहेची रचना अशी काही झाली होती की तिथे अगदी माध्यानीच्या उन्हात देखील थंडगार आणि मोकळी हवा मनाला आणि शरीराला आल्हाददायक अनुभव देत होती. आतापर्यंत तहान भूक हरपलेला कापालिक गुहेत शिरल्यावर जरासा स्थिरावला. त्याने एकवार संपूर्ण गुहेत आपली नजर फिरवली. त्याला कपारीत कुठेही धुळीचे साम्राज्य दिसले नाही की इतर कचराही दिसला नाही. धूळ नव्हती याचा अर्थ तिथे भरपूर प्रमाणात हवा खेळती होती आणि इतर कचरा नाही याचा अर्थ तिथे लोकवावर अगदीच नगण्य होता किंवा नव्हता म्हटले तरी चालेल. त्याच्या दृष्टीने ती जागा आराम करण्यासाठी अतिशय योग्य होती.

कालीचा जयघोष करत त्याने तिथेच फतकल मारली. खांद्याला अडकवलेली झोळी शेजारीच ठेवली आणि परत एकदा त्याची नजर सभोवार भिरभिरत फिरली. यावेळी मात्र त्याची नजर जराशी शोधक होती. रात्रभराची पायपीट आणि उन्हात डोंगरची चढाई यामुळे त्याला अगदी सडकून भूक लागली. एकंदरीत गुहेचा अंदाज घेता त्याला तिथे खाण्यायोग्य काही मिळणे केवळ अशक्य होते. गुहेत काहीच मिळणार नाही याची खात्री झाल्यावर खाद्य शोधण्यास तो बाहेर पडला. एकेकाळी अगदी हिरवागार असणारा कांचन किल्ला आता पूर्णतः ओसाड झाला होता. किल्ल्याचे कुठल्याही प्रकारचे अवशेष तिथे शिल्लक राहिले नव्हते. कधी काळी या ठिकाणी कुणी रहात असेल असे आता कुणाला सांगूनही पटले नसते. सगळीकडे नुसते दगड नी धोंडे. झाड म्हणून फक्त खुरट्या जंगली वनस्पती आणि पिवळे पडलेले गवत. पूर्वीच्या लोकवस्तीची साक्ष म्हणून फक्त एक पाण्याचे टाके तेवढेच तिथे उरले होते. ज्यात अजूनही पाणी होते.

कापालिकाने शक्य तितके आजूबाजूला फिरून काही सापडते का याचा शोध घेतला पण त्याच्या पदरी फक्त निराशा आली. आज फक्त पाणी पिऊन भूक भागवावी लागणार असा विचार करीत तो पाण्याच्या टाक्यावर आला. टाक्याच्या आजूबाजूला शेवाळे साठल्यामुळे टाक्यातील पाणी संपूर्ण हिरवे पण अगदी स्वच्छ दिसत होते. कापालिकाने गुडघे टेकून आणि हाताची ओंजळ करून पाण्यात हात घातला. वर तळपता सूर्य असूनही टाक्यातील पाणी मात्र चांगलेच थंड होते. कापालिकाच्या चेहऱ्यावर समाधान उमटले. टाक्यातील थंडगार पाणी पोटात जाताच त्याला बरीच तरतरी आली. पाणी पिऊन कापालिक मागे वळणार एवढ्यात त्याला बाजूच्या वाळलेल्या गवतात सळसळ ऐकू आली. आवाजाच्या दिशेने कापालिकाने नजर रोखली. त्याच्यापासून अगदी थोड्याच अंतरावर एक पिवळी जरद धामीण भक्ष शोधत होती. कापालिकाचे डोळे चमकले. कान तीक्ष्ण झाले. चित्त स्थिरावले. हालचाल सावध बनली आणि चेहऱ्यावर काहीसे स्मित झळकले.

“जय काली… तुझ्या नैविद्याची सोय झाली…” त्याने मनातल्या मनात म्हटले. कफनीच्या खिशात हात घालून त्याने कसलीशी उदी बाहेर काढली. ती तळहातावर घेत कसलासा मंत्र म्हटला आणि कालिकेचा जयघोष करत धामीणीच्या दिशेने ती राख हवेत फुंकली. धामीण जागच्या जागी जखडली गेली. ती धामीण जरी वळवळत होती तरी तिला पुढे मात्र जाता येत नव्हते. क्षणाचाही विलंब न लावता अगदी चपळतेने हालचाल करत कापालिकाने हात पुढे करून धामीणीला शेपटाकडून उचलले आणि बाजूच्या दगडावर जोरात आपटले. एकाच फटक्यात तिची वळवळ बंद पडली. तिच्या बेजान वेटोळ्याला गळ्यात घालून कापालिक गुहेत परत आला. झोळीत ठेवलेला कालिकेचा फोटो काढून तो त्याने तिथेच एका दगडाच्या आधाराने मांडून ठेवला. झोळीतून दारूची बाटली काढून त्याचे त्याने त्या फोटोपुढे चौकोनी मंडल केले. त्यावर त्या मेलेल्या धामीणीचे वेटोळे ठेवले. बाटलीतील थोडी दारू उजव्या हातात घेवून ती त्या वेटोळ्याभोवती ३ वेळेस उलट्या बाजूने फिरवली आणि हात जोडले.

“हे माते… तुझ्या भक्ताने, भक्तिभावाने आणलेला हा नैविद्य गोड मानून घे… लवकरच तुला नरमांसाचा नैविद्य अर्पण करून कायमचे प्रसन्न करून घेईल… जय महाकाली…”

प्रार्थना करून झाल्यावर त्याने ते वेटोळे हातात घेतले आणि आधाशासारखे त्याचे लचके तोडायला सुरुवात केली. काही वेळातच त्याने तृप्तीचा ढेकर दिला आणि थोडा आराम करण्यासाठी जमीनीवर अंग टाकले. रात्रभरची पायपीट आणि रिकाम्या पोटात भर पडल्यामुळे काही क्षणातच त्याला गाढ झोप लागली.

क्रमशः कापालिक भाग ३.

मिलिंद जोशी, नाशिक…

कापालिक भाग 2

Leave a comment