कापालिक भाग 2

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग 2 –

राजधेर गावात एकच हाहाकार उडाला होता. प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच विषय होता आणि तो म्हणजे आदल्या रात्री झालेली पाटलाच्या सुनेच्या चितेची विटंबना. सकाळी जेव्हा पाटलाच्या घरचे लोकं चितेच्या अस्थि घेण्यासाठी स्मशानात गेले तेंव्हा त्यांना झालेला प्रकार समजला होता. चितेतील काही लाकडे इतस्ततः विखुरली गेली होती. शीर नसलेला देह अर्धवट जळालेल्या अवस्थेत तिथेचं चितेवर पडला होता. आधी सगळ्यांना हे एखाद्या जनावराचे काम वाटले. कारण बऱ्याच वेळेस जंगली जनावरे मांसाच्या वासाने अशी गोष्ट करतात हे सगळे जाणून होते. पण हा प्रकार मात्र वेगळाच भासत होता. तशा घटनेत जनावरांच्या पायाच्या खुणाही सगळीकडे दिसतात. इथे मात्र प्रेताचे शीरच तेवढे गायब झाले होते. सकाळपासून गावकऱ्यांनी गावाच्या चारी दिशेला बराच तपास केल्यानंतरही काहीच हाती लागले नव्हते. सगळेच जण रिकाम्या हाताने परत आले होते. यामागे नक्कीच काहीतरी विपरीत हेतू असल्याचे आता सगळ्यांचे एकमत झाले.(कापालिक भाग 2)

“म्या काय म्हन्तो पाटील… ह्ये कायतरी येगळंच काम हाय बगा… कायतरी लैच वंगाळ… मला वाटून ऱ्हायलं, तालुक्याला पोलीस चौकीला सांगावा धाडावा… काय म्हंता?” जवळच उभा असलेला शिरपू नाना म्हणाला आणि इतरांनी त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

“मला बी त्येच वाटू ऱ्हायलं… ह्ये काम जनावराचं न्हवं…” वयानं पाटलाच्याच बरोबरीचा असलेला बंडू तात्या म्हणाला. पाटलाचे मन आणि अनुभव देखील त्याला हेच सांगू लागले. लगोलग त्यानं आपल्या पोराला आवाज दिला.

“संपत… ये संपत…” पाटलाचा आवाज ऐकताच संपत लगबगीने त्याच्या समोर हजर झाला.

“आरं समद्यांचं मत हाय की ह्ये कायतरी येगळंच प्रकरन हाय. आसं कर चांदवडच्या पोलीस चौकीला वर्दी दे… आता पोलीसच याचा सोक्समोक्स लावतीन…” काळजीच्या सुरात पाटलानं पोराला सांगितलं मात्र अन संपतनं चांदवड पोलीस स्टेशनला फोन लावला.

“ये पोरांहो… कशाला बी हात लावू नगा रं… आता पोलीसच पंचनामा करतीन.” अर्धवट जळलेल्या चितेची लाकडे नीट करण्यासाठी निघालेल्या पोरांना उद्देशून पाटील म्हणाले. खरं तर आपल्या सुनेचं प्रेत असं बीभत्स स्वरुपात पाहणं पाटलाला जास्तच हेलावून सोडत होतं, पण कोणताही पुरावा नष्ट होऊ नये म्हणून त्यांनी कुणालाच तिकडे जाऊ दिले नाही. संपतचा चेहरा तर रागानं लाल झाला होता. काही लोकं ज्याने हे कृत्य केले असेल त्याला शिव्यांची लाखोली वहात होते. तर काही नुसतेच बघे, चितेभोवती उभे राहून वेगवेगळे तर्क लढवण्यात दंग होते. तसेही खेडेगावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती असल्यामुळे कामावर जायला थोडा उशीर झाला तरी त्यांना काहीच फरक पडणार नव्हता.

थोड्याच वेळात मातीचा धुराळा उडवत पोलीस जीप घटनास्थळी दाखल झाली. सब. इन्स्पेक्टर आहिरे, बरोबर ३ हावलदार आणि फोटोग्राफरला घेऊन जीपमधून खाली उतरले. चितेवर अर्धवट जळालेल्या अवस्थेत शीर नसलेला देह तसाच पडलेला होता. चितेची काही लाकडे अजुनही थोड्याफार प्रमाणात धुमसत होती.

“सावंत… आधी पंचनामा करून बॉडी ताब्यात घ्या आणि पीएमला पाठवायची तयारी करा.” सब. इन्स्पेक्टर आहिरेंनी एका हावलदाराला सूचना केली. पोलिसांचा फोटोग्राफर वेगवेगळ्या अँगलमधून घटनास्थळाचे फोटो घेत होता. इतर हावलदारही काही धागा मिळतो का याची बारीक तपासणी करू लागले. सगळ्यांना कामाला लावून आहिरेंनी आपला मोर्चा डोक्याला हात लावून झाडाला टेकलेल्या पाटलाकडे वळवला.

“मयत बाई तुमची कोण?”

“सून व्हती सायेब…” काहीसे सावरून बसत आणि भावनांना आवर घालत पाटील बोलले.

“तुम्हीच फोन केला होता?”

“न्हाई… माह्या पोरानं फोन केल्ता तुम्हास्नी”

“बरं… हे तुमच्या कधी लक्षात आलं?” विस्कटलेल्या चितेकडे मानेनेच खुण करून आहिरेंनी पुढचा प्रश्न केला.

“ते आमी समदे राख आणायला हिड आल्तो तवां…”

“बरं… कशामुळे मृत्यू झाला होता तुमच्या सुनेचा?”

“त्ये… हार्टचा प्राब्लेम व्हता… चांगली हसत व्हती दुपारपोतूर… पन कायनु काय झालं अन छातीवर हात ठिवून खाली बसली ती पुनः उठलीच नाई…. आम्ही समदेचं व्हतो… लगोलग डाक्टरला बोलीवलं… पन त्येचा काय उपेग नाय झाला बगा…” पाटलानं डोळ्यातील पाणी खांद्यावरील उपरण्याला टिपत उत्तर दिलं.

“बरं… लोकं म्हणत होते की ती गर्भारशी होती… मग त्यामुळेच तर तुम्ही….” पाटलाच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईने पहात आहिरेंनी गुगली टाकला.

“अरारारा… असं वंगाळ काम न्हाय व्हायाचं आमच्याकडनं… गावचं पाटील आमी. सारं गावं बघतया आमच्याकडं…” आख्या गावादेखत आहिरेंनी विचारलेल्या प्रश्नाने पाटील उखडलेच.

“बरं… बरं… डॉक्टरचा रिपोर्ट देता का जरा…”

संपतने लगेच एका घरगड्याला डॉक्टरांनी दिलेले डेथ सर्टिफिकेट आणण्यासाठी घरी पिटाळले. १० मिनिटातच आहिरेंच्या हातात डॉक्टरांनी दिलेले मृत्यूचे प्रमाणपत्र होते. त्यावर एक ओझरती नजर टाकून त्यांनी संपतकडे आपला मोर्चा वळवला.

“तुमचं लग्न कधी झालं?”

“साडेतीन वर्ष झालीत साहेब…”

“अस्सं… तुमचे आपसातील संबंध कसे होते?”

“कसे म्हणजे? काय म्हणायचंय तुम्हाला? मी मारलं माझ्या बायकोला?” एकतर पाटलाचा पोरगा आणि अशा घटनेमुळे संतापलेला… संपत चवताळला.

“हे पहा मिस्टर… आम्ही आमचं काम करतो आहोत. त्यामुळे आम्ही विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या.” संपतचा आवाज चढलेला पाहताच आहिरेंनीही आपला आवाज चढवला.

“अहो पण साहेब… कुणीतरी माझ्या बायकोच्या चितेची विटंबना केली आहे याबद्दल आम्ही तक्रार नोंदवली आहे. आणि तुम्ही मात्र आमचे संबंध कसे होते हे विचारताय?” काहीशा नरमाईच्या सुरात संपत उत्तरला…

“हे पहा… आम्हाला सगळ्या बाजूंचा विचार करावा लागतो त्यामुळे असे काही प्राथमिक प्रश्न आम्हाला भावना बाजूला ठेवून विचारावेच लागतात.” आहिरेही थोडे नरमाईत आले.

“बरं.. तुमचा कुणावर काही संशय? म्हणजे एखादा तांत्रिक, मांत्रिक वगैरे?”

“नाही साहेब… आमच्या गावात असा कुणीच माणूस नाही. एकतर शंबरएक घराचं लहानसं गाव. त्यामुळे प्रत्येकाला आम्ही नावानिशी ओळखतो. नाही म्हणायला डोंगरावरच्या मठात एक भगत राहायचा पण काही दिवसापूर्वीच तो मेला. इथंच सगळ्यांनी मिळून त्याला अग्नी दिला. आता नवीन कुणी बुवा बाबा आला असेल तिथे तर माहिती नाही.”

“बरं… आता आम्ही बॉडी ताब्यात घेतो आहोत. उद्या दुपारपर्यंत ती तुम्हाला पोस्टमार्टेम करून परत मिळेल.” आहीरेंनी सांगून टाकले आणि तपास करत असलेल्या सावंतकडे आपला मोर्चा वळवला.

“त्याची गरज काय आहे साहेब? इथे कोणताही खून झालेला नाहीये. मग पोस्टमार्टेम कशासाठी?” संपत पुरता वैतागला आणि काही अंतर सब. इन्स्पेक्टर आहीरेंच्या बरोबरीने चालत त्याने आहीरेंना प्रश्न केला.

“त्याचे काय आहे नां… त्यातून आम्हाला तपासाची दिशा मिळते.” आहिरेंनी समजावणीच्या सुरात सांगितले. खरं तर इतर वेळी आहिरेंनी पोलिसी खाक्या वापरला असता पण हे प्रकरण जरा नाजूक होतं. त्यातून पाटील म्हणजे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती. आणि म्हणूनच जितके शांतपणाने घेता येईल तितके घ्यावे हाच एक विचार करून त्यांनी नरमाईचे धोरण स्वीकारले. इतर काही जुजबी माहिती गोळा केल्यानंतर त्यांनी हावलदार सावंतला बाजूला घेतलं.

“सावंत… काय वाटतंय तुला? काय असावा हा प्रकार?”

“साहेब… मला तर हा मंत्र तंत्राचा प्रकार वाटतो आहे. कारण बॉडीच्या मानेवर धारदार शस्त्राचा वार करून मुंडके कापून नेले आहे. त्यामुळे हे प्रकरण वाटते तितके सोपे नाहीये.” अनुभवी हावलदार सावंतने आपले मत सांगितले.

“हं… मलाही तसंचं वाटतंय. म्हणजे आता याचा तिढा सोडवता सोडवता डोक्याला मुंग्या येणार तर…” काहीश्या काळजीच्या सुरात आहिरे तोंडातल्या तोंडात पुटपुटले आणि जीप मध्ये जाऊन बसले.

क्रमशः कापालिक भाग 2 –

मिलिंद जोशी, नाशिक…

कापालिक भाग १

Leave a comment