कापालिक भाग ११

कापालिक भाग १,2,३,४,५,६,७,८,९,१०,११

कापालिक भाग ११ –

हे सगळे पाहून लोकांची कुजबुज मात्र वाढली. आदिनाथ पूर्वीप्रमाणेच स्थितप्रज्ञ होता. काही लोकांनी त्याला आहे तिथूनच नमस्कार घातला. तसेही चमत्कार दिसला की लगेच नमस्कार करण्याची लोकांची वृत्ती यावेळीही दिसल्याने आहिरे वैतागले. पण आता याला उठवायचे कसे याचा त्यांना विचार पडला. काही जण आहीरेंना त्याला शरण जाण्यासाठी सांगू लागले तर काही जण साक्षात मारुतीरायाच नाथबाबाचं रूप घेवून इथे बसला आहे असे म्हणू लागले. आहीरेंही मनातून थोडे चरकलेचं होते. जो व्यक्ती लाकडाच्या काठीतूनही झटका देऊ शकतो तो नक्कीच कुणीतरी पोहोचलेला असणार याची त्यांना खात्री पटली.(कापालिक भाग ११)

“बाबा… माझ्या पोरीला वाचवा…” संगीताच्या आईने पळत जाऊनच आदिनाथाचे पाय पकडले. पण आश्चर्य म्हणजे तिला कोणताही झटका बसला नाही. तिच्या हातांचा आदिनाथाच्या पायाला स्पर्श झाला मात्र आणि त्याने डोळे उघडले.

“माई… हे काय करतेस? पाय धरायचे तर मारुतीरायाचे धर, गुरुदेव दत्तांचे धर… उठ!!! काळजी करू नको. त्यांनी ठरवले तर तिचे कुणीही काहीच वाकडे करू शकणार नाही. त्यासाठीच मला त्यांनी इथे थांबायचा आदेश दिला असावा.” संगीताच्या आईला उठवत तिला समजावण्याचा त्याने प्रयत्न केला.  नंतर सब. इन्स्पेक्टर आहीरेंकडे वळून त्याने सुरुवात केली.

“इन्स्पेक्टर… मी तुमचीच वाट पहात होतो. तुमच्या हावलदारांची अशी गत फक्त यासाठी करावी लागली कारण तुम्हाला हे समजणे महत्वाचे होते की प्रत्येक ठिकाणी तुमचा खाक्या किंवा तुमची शस्त्रे उपयोगी पडणार नाहीत. आणि या घटनेत तर नाहीच नाही.”

“तुम्हाला माहित होतं मी इथे येतो आहे म्हणून?” आहिरेंनी काहीशा आश्चर्याने विचारले.

“होय… गुरूच्या कृपेने मी त्या सगळ्या गोष्टीही पाहू शकतो ज्या एरवी तुम्ही पाहू शकत नाहीत.” आदिनाथाने उत्तर दिले.

“मग बाबा… तुमच्यात जर इतकी पावर आहे तर तुम्हीच या बाईच्या मुलीला का नाही वाचवलं?” आहिरेंनी परत प्रश्न केला.

“कारण मला त्याला पकडून द्यायचं आहे सर्व पुराव्यासह आणि त्या मुलीचे ग्रहमानही तसे होते.”

“म्हणजे तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे ते?”

“हो… माहिती आहे… सध्या ती किल्ल्यावरील तळघरात आहे आणि परवाच्या अमावास्येला तिला बळी देण्याचा त्याचा विचार आहे.” आहिरे एकेक प्रश्न विचारात होते आणि आदिनाथ अगदी शांतपणे त्याची उत्तरे देत होता.

“काय सांगता? कोण आहे तो हरामखोर? आता चामडी सोलतो साल्याची.” परत एकदा आहिरेंचा राग अनावर झाला.

“इतकं सोपं नाहीये ते इन्स्पेक्टर. तो खूप पोहोचलेला कापालिक आहे. अनेक सिद्धी त्याने प्राप्त करून घेतल्या आहेत त्यामुळे तुम्ही त्याचे काहीही वाईट करू शकणार नाहीत. त्यासाठी मलाच प्रयत्न करावे लागणार आहेत.”

“वाईट करू शकणार नाही म्हणजे?”

“म्हणजे??? आपण सगळेच आता तिकडेच जाणार आहोत. त्यावेळेस समजेलच तुम्हाला… आणि हो, तिथे किल्ल्यावर तुम्हाला जे काही दिसेल त्याने विचलित होऊ नका आणि माझ्या नजरेच्या टप्प्यातून बाजूलाही जाऊ नका. कारण माझ्याही काही मर्यादा आहेत.”

नंतर त्याने संगीताच्या आईकडे वळून म्हटले…

“माई… तुला सुद्धा आमच्या बरोबर यावे लागेल. कारण त्या मुलीला तुझ्या आधाराची गरज पडणार आहे…” इतके बोलून आदिनाथाने आपले आसन सोडले. मंदिरात जाऊन कोनाड्यात ठेवलेल्या आपल्या झोळ्या आणि चिमटा घेतला आणि तो मंदिराच्या पायऱ्या उतरू लागला. त्याच्या बरोबर संगीताचे आईवडील, सब. इन्स्पेक्टर आहिरे आणि त्यांच्या बरोबर आलेले हवलदार असा सगळा लवाजमा किल्ल्याकडे निघाला. हावलदार थोरात आणि हावलदार सावंत यांना जरी आदिनाथापासून कसलीच भीती नव्हती तरी दोघे आदिनाथापासून चार हाताचे अंतर ठेवूनच चालत होते. न जाणो चुकून आपला हात या बाबाला लागायचा आणि झटका खावा लागायचा. दोघेही काळजी घेत होते. पण इतर हावलदारांची गतही काही याहून निराळी नव्हती.

कापालिकाने गावातील मंदिरात आदिनाथाला आधीच पाहिले असल्यामुळे आणि तो त्याच्या कार्यात विघ्न आणू शकतो हे देखील त्याला माहिती असल्यामुळे त्याने आदिनाथावर लक्ष ठेवायचे ठरवले. जो पर्यंत त्याचे उद्दिष्ट सफल होत नाही तोपर्यंत कोणताही धोका पत्करणे त्याला परवडणारे नव्हते. संगीतासह तळघरात आल्या बरोबर त्याने मंत्र सामर्थ्याने हडळीच्या आत्म्याला संगीताच्या शरीरात बंदिस्त करून टाकले. कारण जोपर्यंत हडळ संगीताच्या शरीरात असणार होती तोपर्यंत ती त्याच्या ताब्यात राहणार होती. ही गोष्ट हडळीला मात्र बिलकुल पसंत पडली नाही.

“कापालिका… मला असे का बांधले आहेस? मी तुला सहकार्य करणार हे वचन दिले आहे ना?”

“हो… पण माझा तुझ्यावर अजून पूर्ण विश्वास बसलेला नाही. दोन दिवसांनी माझा हेतू सफल झाला कि मग मी तुला कोणत्याच गोष्टीला अडवणार नाही. तोपर्यंत चूप बस…” कापालिक हडळीच्या अंगावर काहीसा खेकसलाच.

कापालिकापुढे बोलून काहीच उपयोग होणार नाही हे लक्षात आल्याने तिला गप्प बसणे भागच होते. ती जरी गप्प बसली तरी शांत मात्र झाली नाही. किंचाळणे, हुंदके देणे, धाप लागणे यासारख्या गोष्टी ती संगीताच्या शरीरात असून देखील करत होती. मध्येच ती जमिनीपासून चार फुट वरती जात होती मध्येच परत खाली येत होती. कापालिकाला सुद्धा तिची ती स्थिती माहिती असल्यामुळे तो त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत होता. आता त्याने आदिनाथ काय करतो आहे हे पाहण्यासाठी पूजा मांडायला घेतली.

कालिकेच्या मूर्तीसमोर पण मुख्य पूजेपासून थोड्या दूर अंतरावर त्याने एक खापराचे मध्यम आकाराचे भांडे ठेवून त्यात काठोकाठ प्राण्याचे रक्त भरले. त्याच्या पुढे एक चांदणीचा आकार तयार करून त्यात वेगवेगळी अक्षरे लिहिली आणि त्यापुढे बसून तो मंत्र म्हणण्यात गुंग झाला.

थोडा वेळ होतो न होतो तोच आता त्या भांड्यातील रक्ताचा रंग हळूहळू बदलू लागला आणि त्यात ओतूर गावातील मारुतीचे मंदिर आणि मंदिराच्या ओट्यावर ध्यानस्थ बसलेला आदिनाथ त्याला स्पष्ट दिसू लागले. हळूहळू ते जवळ येते आहे असा भास झाला आणि त्यानंतर त्याला त्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः उभे राहून पाहतो आहोत असे वाटू लागले. त्याचे लक्ष फक्त आणि फक्त आदिनाथावर होते. थोडा वेळ हे दृश्य दिसते न दिसते तोच त्याला तिथे पोलीस आणि गावकरी जमलेले दिसले. मारुती मंदिराच्या आवारात घडणारा सर्व प्रकार कापालिक त्याच्या बसल्या जागेवरून पहात होता आणि त्याच बरोबर आदिनाथाची शक्ती किती आहे हे सुद्धा त्याला हावलदारासोबत घडलेल्या प्रकाराने काहीसे लक्षात यायला सुरुवात झाली. जसजसे तो मन लावून पहात होता तसतसा त्याचा चेहरा भेसूर वाटू लागला. त्याचे डोळे संतापाने लाल होऊ लागले. त्याचा श्वासोच्छवास जलद होऊ लागला आणि आता त्याचा संताप शिगेला पोहोचला.

संगीताच्या शरीरात बंदिस्त असलेली हडळ वर खाली होता होताच कापालिकाच्या चेहऱ्याचे बदलणारे भाव पहात होती. जसजसे कापालिकाच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले तसतसा हडळीचा खेळ सुद्धा कमी कमी होत गेला. आता तर ती हडळ सुद्धा अगदी घाबरून एकाच ठिकाणी थरथरत उभी होती. आणि जसे पोलिसांना घेवून आदिनाथ किल्ल्यावर येण्यास निघाला आहे हे कापालिकाने पाहिले तसा त्याने रागाच्या आवेशात एक जोरदार फटका त्या खापराच्या भांड्याला मारला. तो फटका इतका जोरदार होता की त्या भांड्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होवून त्या इतस्ततः विखुरल्या गेल्या. सगळीकडे रक्त रक्त तर झालेच पण काही रक्त कापालिकाच्या चेहऱ्यावर उडून त्याचा चेहरा आधीपेक्षाही भयानक दिसू लागला.

काही क्षणातच त्यांने स्वतःवर नियंत्रण मिळवले आणि आदिनाथ सगळ्यांना किल्ल्यावर घेवून येऊ नये याच्या तयारीला त्याने सुरुवात केली.

क्रमशःकापालिक भाग ११,कापालिक भाग ११.

मिलिंद जोशी, नाशिक..

कापालिक भाग १०

Leave a comment