कापालिक भाग १२ –
संतापाने थरथरतच कापालिकाने मुख्य पूजेसमोर फतकल मारली. एकदा कालिकेच्या नावाचा मोठ्याने जयघोष केला आणि हातात काळी हळद आणि कुंकू घेवून तो मोठमोठ्याने मंत्र म्हणू लागला. आता तो पाचही तत्वांचे मंत्र म्हणून त्या तत्वांना आवाहन करत होता. जसजसे एकेक मंत्र पूर्ण होऊ लागले, तसतशी एकेका तत्वाची शक्ती चांदणीच्या कोनात ठेवलेल्या एकेका कापलेल्या शीराच्या वर फिरू लागली आणि कालिकेचा जयघोष करताच त्या शीरामध्ये प्रवेश करू लागली. पुढच्या पाच मिनिटातच प्रत्येक शीर हळूहळू तीन साडेतीन फुट वर उचलले गेले, आणि एकेक करून प्रत्येक शिराच्या डोळ्यावरील झापडे उघडले गेले. आता त्या शीरांच्या डोळ्याच्या जागी प्रत्येक तत्व दिसत होते. पहिल्या शीरात आप म्हणजे पाणी तत्वाने प्रवेश केला होता, त्याचे डोळे फक्त निळसर रंगाचे दिसत होते. मध्येच त्याचा रंग हिरवट तर मध्येच चहाप्रमाणे मातकट दिसत होता. त्या शीराच्या तोंडातून हळूहळू पाण्याची खळखळही स्पष्टपणे ऐकू येत होती. दुसऱ्या शीरात तेज तत्वाने प्रवेश केला होता. त्याच्या डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्याचे डोळे मध्येच पिवळे, मध्येच लाल तर मध्येच पांढरे पडत होते. त्याच्या मुखातून एखादी वस्तू जळते त्यावेळेस जसा तडतड आवाज येतो त्याप्रमाणे आवाज येत होता.(कापालिक भाग १२)
तिसऱ्या शीरात वायू तत्वाने प्रवेश केला होता. त्याचे डोळे धुरकट पांढऱ्या रंगाचे दिसत होते. मध्येच ते राखाडी बनत होते तर मध्येच तिथे फक्त पोकळी असल्याचा भास होत होता. त्याच्या तोंडातून वाऱ्याचा घूघू आवाज आसमंतात घुमत होता. चौथ्या शीरात पृथ्वी तत्वाने प्रवेश केला होता. त्याचे डोळे एकदम काळेकभिन्न दिसत होते. मध्येच ते काहीसे मातकट बनत तर मध्येच हिरवेगार बनत. त्या डोळ्यांकडे पाहणारी व्यक्ती अपोआप तिकडे खेचली जाईल अशी एक चुंबकीय शक्ती त्यात होती. या शीराच्या मुखातून एकाच वेळेस अनेक वेगवेगळे आवाज उमटत होते. पाचव्या शीरात आकाश तत्वाने प्रवेश केला. त्याचे डोळे एकदम निळे पण खोल खोल दिसत होते. काही वेळेस ते मध्येच काळे होत तर कधी लालभडक बनत. त्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपली नजर एका ठराविक अंतरानंतर पाहू शकत नाही, पण तरीही त्यापलीकडेही अनंत, अमर्याद पोकळी भरून राहिलेली आहे असा भास होता होता. पण इतर चार शीरांप्रमाणे या शीराच्या मुखातून कोणताच ध्वनी उत्पन्न होत नव्हता. बाकीची सगळी शीरे अधांतरी तरंगत असताना काहीसे हेलकावे घेत होती पण हे पाचवे शीर मात्र अगदी स्थिर होते. त्यात जरा देखील हालचाल दिसत नव्हती.
थोड्याच वेळात प्रत्येक शिराच्या तोंडून फक्त एकच वाक्य बाहेर पडले. प्रत्येक शीराच्या तोंडून बाहेर पडणारा शब्द हा काहीसा घोगरा परंतु धीरगंभीर असा होता.
“कापालिका… आम्हाला का जागवले आहेस?”
“तुम्हाला माझे काम करायचे आहे.”
“कसले काम?”
“थोड्या वेळात आदिनाथ काही लोकांना घेवून किल्ल्यावर प्रवेश करणार आहे. त्याला इथे पोहचू द्यायचे नाही.” कापालिकाने त्यांना हुकुम केला.
“कापालिका… ही खूप मोठी चूक तू करतो आहेस. आदिनाथाला सात्विक शक्तीचे पाठबळ आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. त्याच्याशी शत्रुत्व करू नकोस…”
“ते तुम्ही मला सांगू नका… मला माहिती आहे, काय करायचे ते. माझी तुम्हाला जितकी आज्ञा आहे तितकेच तुम्ही करा.” कापालिक वैतागलाच.
“ठीक आहे… जशी तुझी मर्जी… पण एक लक्षात ठेव, जर त्याची शक्ती तुझ्यापेक्षा प्रबळ ठरली तर मात्र आम्ही काही करू शकणार नाही…” इतके बोलून एकेक शीर दालनाच्या झरोक्यातून बाहेर पडले.
आदिनाथाने सगळ्यांना बरोबर घेऊन किल्ल्याचा डोंगर चढायला सुरुवात केली. भर दुपारची वेळ असल्यामुळे सूर्य वरून आग ओकत होता. आदिनाथाला मात्र त्याचे काहीच वाटत नव्हते. सब. इन्स्पेक्टर आहिरे हे सुद्धा या सगळ्याचा तपास लावायचाच यासाठी झपाटले गेल्यामुळे त्यांनाही त्याचे काही वाटत नव्हते. संगीताच्या आई वडिलांना तर फक्त संगीता सही सलामत परत पाहिजे होती त्यामुळे त्यांचा वेग इतरांपेक्षा जास्त होता. फरफट होत होती ती त्यांच्या बरोबर असलेल्या हावलदारांची. पायथ्यापर्यंत वाहन येत होते पण वर जाण्यासाठी मात्र पायी चढूनच जावे लागणार होते. किल्ल्याच्या माचीपर्यंत काही प्रोब्लेम आला नाही. पण माचीच्या दरवाज्यात आदिनाथाने पाय ठेवला आणि वातावरणात एकदम बदल झालेला सगळ्यांना दिसून आला. खूपच जोरदार सोसाट्याचा वारा सुटला. सगळी कडे फक्त धुळीचे लोट दिसत होते. डोळे उघडून चालणे खूपच जिकरीचे जात होते.
एकाएकी वादळाचा वेग भयानक वाढला. आता जे त्याच्या पट्ट्यात येईल त्याला एखाद्या कस्पटाप्रमाणे उडवायला त्या वादळाने सुरुवात केली. आपण सगळे जण वाऱ्याच्या वेगात उडून जाणार असेच आता सगळ्यांना वाटू लागले. तसेही हा किल्ला चढताना बऱ्याच ठिकाणी पायऱ्या तुटलेल्या होत्या, काही ठिकाणी जिथे पायऱ्या नव्हत्या तिथे मुरुमामुळे पायाची पकड नीट बसत नव्हती आणि त्यात असे सोसाट्याचे वारे… प्रत्येकाचे कपडे धुळीने पूर्ण माखले गेले असल्यामुळे ते सगळे एकाच मातकट रंगाचे दिसत होते. केसही पूर्णपणे विस्कटले गेले होते. चेहऱ्यावर मातीचा थर जमा झाल्यामुळे एकमेकांची ओळख पटणेही अवघड बनले होते. कोणती तरी अनामिक शक्ती आपल्याला पुढे जाऊ देत नाही याची सगळ्यांनाच खात्री पटली. जिथे उभे राहणे अवघड होते तिथे पुढे सरकणे तर शक्यच नव्हते. सगळे जण फक्त आहे त्या ठिकाणी टिकून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. याही परिस्थितीमध्ये फक्त आदिनाथच काय तो शांत दिसत होता. त्याच्या कपड्यांची आणि चेहऱ्याची अवस्था काही इतरांपेक्षा वेगळी नव्हती, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही दृढनिश्चय स्पष्ट दिसत होता.
थोडावेळ निश्चल उभा राहून आदिनाथाने अंदाज घेतला आणि मग त्याच्या जवळील भस्माच्या झोळीत हात घातला, चिमुटभर भस्म हातात घेतले आणि मोठ्याने गुरुदेवांचे नाव घेवून मंत्र म्हणायला सुरुवात केली. ४/६ ओळींचा तो मंत्र पूर्ण होतो न होतो तोच संपूर्ण वादळ एकाएकी शांत झाले. तिथे इतस्ततः विखुरलेल्या वादळाच्या खुणा काय त्या वादळाची जाणीव करून देत होत्या. पण वातावरण मात्र परत पूर्वीप्रमाणे भासू लागले.
“स्वामीजी… हे काय होतं?” घाबरतच हावलदार सावंतने आदिनाथाला विचारले.
“हे वायू तत्व होते… कापालिकाने आपण तिथे पोहचू नये यासाठी आपल्यावर सोडलं होते”
“आयला… लैच पोचलेला दिसतोय गडी” हावलदार थोरात उद्गारला.
“हो… पोहोचलेला तर आहेच, पण चुकीच्या मार्गाला लागला आहे. याचा उपयोग त्याने लोकांच्या कल्याणासाठी केला तर त्याचे आणि लोकांचे दोघांचेही भले होईल.” आदिनाथाच्या बोलण्यात हळहळ दिसून येत होती.
हे सगळे पाहून काय बोलावे हे सब. इन्स्पेक्टर आहीरेंना मात्र समजत नव्हते. कारण त्यांनी मंदिरात ज्या वल्गना केल्या होत्या, त्या किती फोल होत्या हे त्यांना एरवी चांगलेच लक्षात आले होते. शेवटी त्यांनी न राहवून आदिनाथाला विचारले.
“स्वामीजी… अजूनही असे अडथळे त्याने तयार केले आहेत का आपल्यासाठी?”
“हो… अजून चार तत्व आहेत. जे आपल्याला तिथे पोहोचण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतील. पण आपल्या पाठीशी गुरुदेव आहेत. त्यामुळे काळजी करू नका… फक्त काहीही झाले तरी माझ्या नजरेच्या टप्प्यातून बाजूलाही जाऊ नका…” आदिनाथाने सगळ्यांना ताकीदच दिली.
“आता कसले जातोय बाजूला? घरी सलामत पोहोचलो तरी खूप आहे.” अजून एक हावलदार बोलून गेला.
आता पर्यंत सर्वजण माचीवरील एका पडक्या वाड्याजवळ आले. आता जरी वाड्याची फक्त एक खोली थोडीफार सुस्थितीत होती तरी एकेकाळी हा वाडा नक्कीच भव्य असणार हे त्या ठिकाणी असलेले इतर भग्न अवशेष पाहून लगेच लक्षात येत होते. एकाएकी आदिनाथ थांबला. परत काहीतरी अघटीत घटणार असे त्याचे मन त्याला राहून राहून सांगू लागले. पण काय हे मात्र त्याला उमजेना म्हणून त्याने सगळ्यांना त्या वाड्याच्या खोलीत आश्रय घ्यायला सांगितले. ते त्या खोलीत शिरतात न शिरतात तोच एकाएकी सगळे आकाश भरून आले. जिकडे पाहावे तिकडे काळेढग जमा झाले. एकाएकी ढगांच्या गडगडाटाबरोबर विजा चमकू लागल्या. हे सगळे ढग आपल्या पासून फक्त काही फुटांवर एकमेकांवर आपटत आहेत असे जाणवू लागले. ढगांचा तो आवाज इतका प्रचंड होता की आपण नक्कीच बहिरे होणार असेच प्रत्येकाला वाटू लागले. सगळीकडे अंधार दाटून आला. अगदी सेकंदांच्या अंतराने विजा चमकत होत्या. बाहेर पाहणे तर शक्यच नव्हते. विजांचा तो प्रकाश माणसाला कायमचे आंधळे करण्यासाठी पुरेसा होता. १० मिनिटांपूर्वी जर यातील कुणाला आता पाऊस येणार आहे असे सांगितले असते, तर या सगळ्यांनी त्याला नक्कीच वेड्यात काढले असते. सोसाट्याच्या वाऱ्याबरोबरच पावसालाही सुरुवात झाली. हवेत एकदम गारवा उत्पन्न झाला. आधी काहीसे मोठे असणारे थेंब आता गारांमध्ये परावर्तीत झाले आणि गारा बर्फाच्या मोठ्या दगडांमध्ये परावर्तित झाल्या. गारांचा आकार उत्तरोत्तर वाढू लागला आणि काही वेळात वाड्याची ही खोलीही पावसाच्या आणि गारांच्या या माराने कोसळेल असे वाटू लागले. सगळ्यांचेच चेहरे भयग्रस्त दिसत होते. सगळ्यांचे लक्ष आता फक्त आणि फक्त आदिनाथावर होते आणि त्या वेळेस आदिनाथ मात्र झोळीतील विभूती दोन बोटांच्या चिमटीत धरून आकाशाकडे पहात तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता. काही क्षणांच्या अवधीतच त्याने मोठ्याने गुरुदेवांच्या नावाचा जयजयकार केला आणि बोटांच्या चिमटीत धरलेली विभूती बाहेरच्या दिशेला फुंकली. काही क्षणातच पाऊस अचानक बंद झाला, जमा झालेले काळे ढग पांगले गेले आणि आकाश पुन्हा पूर्वीसारखे निरभ्र दिसू लागले. आदिनाथाने सगळ्यांना बाहेर येण्यास सांगितले तोपर्यंत बाहेर रखरखीत ऊन पडले होते.
क्रमशःकापालिक भाग १२,कापालिक भाग १२,कापालिक भाग १२.
मिलिंद जोशी, नाशिक…