कर्जवसुली भाग २ –
“आवं… काय म्हनत हुते सायेब?” शांतानं काळजीच्या स्वरात विचारलं.
“काई नाई… कर्ज कदी फेडता म्हनून इचारीत व्हते…”
“आता वं? कुडून आनायचा पैसा? व्हतं नवतं ते समदं ग्येलं अन ह्ये आता पैशे मागून ऱ्हायले…” तिचा स्वर कापरा बनला. आपला नवराही गावातील इतर काही शेतकऱ्यांसारखा या समस्येला घाबरून आत्महत्या तर करणार नाही ना, असा एक ओझरता विचार तिच्या मनात आला आणि ती चरकली.
“आवं… म्या काय म्हन्ते… काय बी झालं तरी तुमी येडं वाकडं काय करनार नाई असं वचन द्या मला…” नानाचा हात हातात घेवून तिनं वचन मागितलं. नानाला मात्र काय बोलावं हेच समजत नव्हतं.
“बोला ना…!!!” तिनं जोरात नानाला हलवलं आणि नाना ताळ्यावर आला.
“तू म्हनू ऱ्हायली पर म्या वचन तरी कसं दिवू? म्या जीव दिला त सरकारकून काई पैश्ये मिळतीन… त्यात पोरीचं लगीन हुईल, कर्ज बी फिटंल आन पोराला शाळेत बी जाता यीन…” शून्यात पहात नाना म्हणाला.
“गप बसा..!!! दोन मैन्यापुर्वी सकाभाऊनी जीव दिला… काय उपेग झाला त्येचा? त्याची बायकू आजूकबी सरकारी हापिसात पोर कड्यावर घीवून हेलपाटे घालून ऱ्हायली. सकाभाऊ व्हता तवर उद्याची आस व्हती… आता तीबी ऱ्हायली नाई. आन पैश्ये भेटले तरी तिनं आता घराकडं पायचं का शेताकडं पायचं का पोराकडं पायचं? त्यो ग्येला सुकासुकी… पर त्याचे पोरं नी बायकू बसलीया भोग भोगत हितंच…” शांताचा आवाज चढला तसा नानानं चमकून शांताकडे पाहिलं. तो शांताला पहिल्यांदाच असे त्याच्यावर डाफरताना पहात होता. अर्थात ती जे काही बोलली त्यात काहीही वावगे नव्हते. सरकारी कामे कशी असतात हे त्याने कर्ज घेतानाच चांगले अनुभवले होते.
“बरं बाई… उगा काऊ नगंस माह्यावर…! म्या काय बी आसं करनार नाई… दिलं वचन…!!!” नानानं वचन दिलं आणि शांताचा जीव भांड्यात पडला.
गावाहून आल्यापासून साहेबाच्या नजरेसमोरून नानाची पोरीगी काही केल्या जात नव्हती. कसेही करून हा मासा हातचा सुटू द्यायचा नाही हे त्यानं मनाशी पक्कं ठरवलं. त्यादृष्टीने त्याच्या प्रयत्नांना सुरुवातही झाली. जे करायचे होते ते अगदी युद्ध पातळीवर करावे लागणार होते. सरकारने दुष्काळ जाहीर केला आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले तर त्याचे सगळे मनसुबे मनातल्या मनातच राहणार होते.
“राजू ऽऽऽ” साहेबाने बसल्या जागेवरूनच आवाज दिला आणि बाहेर बसलेला राजू धावतच केबिनमध्ये शिरला.
“जी???”
“पवारला आत पाठव…!”
“ठीके सायेब…” म्हणत राजू बाहेर पडला. दुसऱ्याच मिनिटाला पवार साहेबासमोर हजर होता.
“पवार, विश्वास बडाखची फाईल घेवून ये…” साहेबानं हुकुम सोडला.
“हो सर…” म्हणत पवार माघारी वळला. बाहेर आल्या बरोबर इतर सहकाऱ्यांनी पवारला आवाज दिला.
“काय रे? कशाला बोलावलं होतं?” एकानं प्रश्न केला.
“काही नाही रे… हरामखोरांनं शिकारी भवती पाश आवळायला सुरुवात केलीये…” आपला राग आवरत पवार बोलला.
“साला… किडे पडून मरेल हा. किमान गरिबाला तरी सोड म्हणावं… त्या पोरीकडं हा ज्या पद्धतीनं पहात होता ना… वाटलं त्याला तिथंच रेमटवावं…” पवारचा दुसरा सहकारी उद्गारला.
“हो ना… बेण्याच्या हातात माझं प्रमोशन आडकलंय म्हणून शांत बसावं लागतंय… नाहीतर याला कधीच चेपला असता मी…” पवारचा चेहरा संतापाने लाल बनला होता.
“यार पण आताच काही केलं नाही तर एक कुटुंब याच्या वासनेला हकनाक बळी पडेल, याचेच वाईट वाटते आहे.” पहिल्या सहकाऱ्याच्या चेहऱ्यावर असहाय्य असल्याचे भाव दिसून येत होते.
“अरे असं कर… फाईल लपव ती… आणि विचारलं तर सांग… फाईल सापडत नाही म्हणून… बहुतेक ८/१० दिवसात शासनानं दुष्काळ जाहीर केला तर किमान एक कुटुंब तरी वाचंल याच्या तावडीतून…” तिसऱ्या सहकाऱ्यानं आयडिया दिली आणि सगळ्यांनाच ती पसंत पडली.
“ओ पवार सायेब… सायेब बोलावताहेत तुम्हाला…” राजूने परत एकदा आवाज दिला.
“पवार… काय झालं फाईलचं? कुठाय फाईल?” पवारला केबिनमध्ये आलेला पाहताच साहेबानं प्रश्न केला.
“अं… पाहतोय सर…!!! पण…” पवारने वाक्य अर्धवट सोडलं.
“पण काय?” साहेब भडकला…
“सॉरी सर… पण… फाईल सापडत नाहीये… मी तीच शोधतो आहे…” पवार हळूच म्हणाला आणि साहेब उखडलाच.
“मिळत नाही म्हणजे काय? तुम्ही इथे कामं करायला येतात की गोट्या खेळायला? ते काही नाही… मला आत्ताच्या आत्ता फाईल माझ्या टेबलवर पाहिजे, नाहीतर मी तुझ्याबद्दल वर रिपोर्ट करेन…” साहेबानं दम भरला.
“पाहतो साहेब..!!!” म्हणत पवार केबिनमधून बाहेर पडला. पवार बाहेर कधी पडतोय याची जणू सगळेजण वाटच पहात होते. पवार दिसताच त्यांनी त्याला खुणेनेच ‘काय झाले?’ म्हणून विचारले आणि उत्तरादाखल पवारचा चेहरा हसरा बनला.
दोन तास उलटूनही फाईल टेबलावर आली नाही हे पाहून साहेब चरफडला. अर्थात तो यापेक्षा जास्त काहीच करू शकत नव्हता. सरकारी कामे कशी होतात हे काही त्याच्यासाठी नवीन थोडेच होते?
दोन दिवस उलटूनही फाईल मिळत नाही हे पाहून साहेबानं शेवटी वेळ न दवडण्याचा निर्णय घेतला आणि तो एकटाच विसू नानाच्या गावी हजर झाला.
क्रमशः कर्जवसुली भाग २,कर्जवसुली भाग २.
मिलिंद जोशी, नाशिक.