कर्जवसुली भाग ३

कर्जवसुली भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०

कर्जवसुली भाग ३ –

“विश्वास बडाख… आहेत का घरी?” बाहेरून आवाज आला आणि विसू नाना बाहेर आला. बाहेर बँकेचा साहेब घाम पुसत उभा होता.

“रामराम सायेब… या… आत या…” साहेबाला पाहताच नानानं लगबगीनं त्याला आत बोलावलं. साहेबही काहीसे मंद स्मित करत घरात शिरला. नानानं त्याला बसायला खुर्ची दिली आणि स्वतः आदबीने बाजूला उभा राहिला.

“अगं ये… सायबास्नी पानी आन…”

चहापाणी घेवून झाल्यावर साहेबानं मुद्द्याला हात घातला.

“का हो… झाली का काही पैशांची सोय?” आपल्या लहेजात सहजता आणत साहेबानं प्रश्न केला.

“अं… नाई सायेब… नाई झाली…” नाना ओशाळला.

“च् च्…” तोंडाने आवाज करत साहेबानं दीर्घ सुस्कारा सोडला.

“सायेब… आता तुमीच यातून वाट दावा…” साहेबापुढे हात जोडून नाना उभा राहिला. शांताही साहेब काय म्हणतोय ते ऐकत दाराआड उभी राहिली. साहेबानं खूप विचार करतोय असे दाखवले आणि काहीतरी सुचल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर झळकले.

“एक उपाय आहे पण…”

“पन काय सायेब?”

“जाऊ द्या… तुम्हाला पटणार नाही…” नकारार्थी मान हलवत साहेब म्हणाला.

“आवं पन एकदा सांगून तर बगा…” नानाच्या चेहऱ्यावर आशादायक भाव उमटले.

“नाही… मला नाही वाटत तुम्ही या गोष्टीला राजी व्हाल म्हणून…” साहेबाने फक्त शब्द फिरवले.

“सायेब… ज्ये काय आसन त्ये सांगून त बगा…”

“तुमचे काही दागदागिने सावकाराकडे गहाण का नाही ठेवत?” साहेबानं साळसूदपणे प्रश्न केला.

“आवो… कसले दागिने? बाईच्या गळयात एक फुटका मनी बी रायला नाई. शेत बी सावकाराकडं आदीच गहान टाकलंय…” नानाचा चेहरा रडवेला झाला.

“तर मग एक अगदी शेवटचा उपाय आहे माझ्याकडे…” साहेबाच्या चेहऱ्यावर बेरकी भाव दिसू लागले.

“कोंचा?” नानाच्या आशा परत पल्लवित झाल्या.

“मी तो सांगेलच पण मला नाही वाटत तो तुम्हाला आवडेल. पण निर्णय घेण्याच्या आधी पूर्ण विचार करून मग निर्णय घ्या.” साहेब प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला.

“सायेब… आता माह्या आवडीचा सवाल युच कुड ऱ्हायला… जीव दिला अस्ता पन बायकूनं आन घातली. ज्ये काय मनात आसन त्ये बोलून टाका…” नाना पुरता हताश होऊन म्हणाला.

“आता जरा स्पष्टच बोलतो… तुम्ही मला खुश केलंत तर मी तुम्हाला या सगळ्यातून सोडवू शकतो. तुमचं बँकेचं सगळं कर्ज मी भरेन आणि वरून तुम्हाला हातखर्चाला काही रक्कमही देईन.” नानाच्या चेहऱ्यावर नजर रोखत साहेब उत्तरला.

“म्हंजी???” नाना गोंधळला.

“म्हणजे तुमची मोठी पोरगी…” इतके बोलून साहेबानं पॉज घेतला. आता कुठे नानाच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्याचे डोके भणाणले आणि लगोलग त्याने साहेबाची कॉलर पकडली.

“ए XXX, काय बोलून ऱ्हायला… थांब… हितंच जित्ता गाडतो तुला…” नानाच्या डोळ्यात रक्त उतरले. त्यांचे बोलणे दाराआडून ऐकणारी शांता धावतच पुढे आली. असा काही प्रकार होईल याचा साहेबाला आधीच अंदाज असल्यामुळे त्याचा चेहरा अजूनही सपाटच होता.

“आवं… सोडा… सोडा म्हन्ते ना… आदी शांत व्हा… काय करता काय हून बसलं त तरास आमालाच हुईल…” एक जळजळीत कटाक्ष साहेबाकडं टाकत तिने नवऱ्याला आवरलं.

“अगं पन ह्ये बेनं काय म्हनू ऱ्हायलंय…” साहेबाची कॉलर सोडत नाना बाजूला झाला.

“हां… ठावं हाय मला… पन जरा सबुरीनं घ्याया पायजेल.” साहेबाची कॉलर नानाच्या हातून सोडवत तिने समजावले आणि मग साहेबाकडं मोर्चा वळवला.

“आवं सायेब… आमी गरीब आसू पन आबरू येशीवर टांग्ली न्हाई आजूक… तुमाला ज्ये काय करायचं त्ये करा पन गपगुमान हितनं भायेर व्हा…” तिच्या स्वरात तुच्छता पूर्णतः भरलेली होती.

“हे पहा बाई… अजूनही विचार करा… भावनेच्या भरात घाईघाईने निर्णय घ्याल आणि जन्मभर त्याची फळे तुम्हाला भोगावी लागतील…” साहेब जागेवरून तसूभरही हलला नव्हता.

“काय इचार करायचा यात? येकदा सांगितलं त समजत नाई व्हय?” नाना साहेबाच्या अंगावर धावून गेला आणि त्याच्या बायकोने त्याला परत मागे खेचले.

“ठीक आहे… जशी तुमची मर्जी, आज फक्त मी आलो, उद्या बँकेचे इतर लोकही माझ्या बरोबर असतील, पोलीसही असतील आणि नंतर तुम्ही सगळे घराबाहेर असाल. आज मी तुमच्या मुलीकडे नजर टाकली, उद्यापासून मात्र अशा अनेक नजरा तिचे लचके तोडायला सरसावलेल्या असतील. पहा… अजूनही विचार करा…” उठण्याचे नाटक करत साहेब बोलला आणि त्याचा परिणाम दोघांच्याही चेहऱ्यावर साफ साफ दिसू लागला.

“सायेब… दया करा वो…” शांताचा स्वर पुरता खाली आला. एका क्षणात तिच्या समोर सगळे दृश्य उभे राहिले आणि शेवटी तिने साहेबाचे म्हणने मान्य करण्याचा निर्णय घेतला.

“आवं… जरा आत चला…” तिने नानाला आतल्या खोलीत नेले. साहेब मात्र मनातून खुश झाला. आतापर्यंतच्या अनुभवाने शेवट काय होणार हे त्याने लगेच ओळखले. १५/२० मिनिटात दोघेही बाहेर आले त्यावेळेस नानाचा चेहरा साफ उतरलेला होता.

“सायेब… तुमी ज्ये काय करून ऱ्हायले त्ये लैच वंगाळ हाय…” नाना बोलला आणि साहेबाच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. त्याचा हेतू साध्य झाला होता.

“चार दिवसांनी मी परत येईन… रहायलाच. तुम्ही मला खुश केलंत तर तुमचे सगळे प्रॉब्लेम मी स्वतः सोडवीन. येतो मी…” म्हणत साहेब उठला आणि घराबाहेर पडला.

क्रमशःकर्जवसुली भाग ३,कर्जवसुली भाग ३.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्जवसुली भाग २

Leave a comment