कर्जवसुली भाग ४

कर्जवसुली भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०

कर्जवसुली भाग ४ –

“नाना…!!! हाये का घरला?” बाहेर बबन्याचा आवाज आला आणि पाठोपाठ तो दारात उभा राहिला. नाना अजूनही साहेबाच्या विचारातून बाहेर आलेला नव्हता. त्यामुळे त्याच्याकडून काहीही उत्तर दिले गेले नाही.

“आरं ये नाना… काय म्हनू ऱ्हायलो म्या…” बबन्या घरात आला आणि नाना काहीसा भानावर आला.

“अं… तू कदी आलास?” काहीसे गोंधळलेल्या आवाजात नानाने बबन्याकडे पाहिले.

“आत्ता… आरं हायेस कुडं? कसला इचार करून ऱ्हायला येवडा?” नानाच्या मांडीवर थाप मारून त्याच्या शेजारी बसत बबन्यानं विचारलं.

“नाई… कायी नाई…!!!” नानानं कसंतरी स्वतःला सावरलं.

“नाई… तू मला सांगून नाई ऱ्हायला. कायतरी नक्की हाय…” नानाच्या चेहऱ्याकडे एकटक पहात बबन्या म्हणाला.

“सांगितलं ना येकदा… मंग कामून इचारू ऱ्हायला पुन्यांदा?” नाना चांगलाच भडकला आणि बबन्याची खात्री पटली.

“ये मावशे… भायेर ये…” नानाच्या चिडण्याचा बबन्यावर काडीचाही परिणाम झालेला दिसला नाही. बबन्याचा आवाज ऐकून शांता बाहेर आली, पण तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहून मात्र बबन्या गंभीर झाला. नक्कीच कोणती तरी मोठी समस्या निर्माण झाली आहे हे त्याने लगेचच ओळखले. आपण आता नेहमीसारखे कोरडे बोलून उपयोग नाही हेही त्याला जाणवले.

“मावशे… गौरी माही राखीभैन हाये. म्हंजी म्या बी तुज्या कुटुंबातला न्हवं का? मला सांग, काय झालं?” बबन्याच्या बोलण्यात आपुलकी पुरेपूर भरली होती. आणि शांतानं डोळ्यांना पदर लावला. नानाच्या डोळ्यातही अश्रू दिसू लागले.

“नाना… म्या काय म्हन्तों… या दुनियेत कोंचा बी प्राम्बेम आसंला तरी त्यावर काय ना काय उपाय ऱ्हातोच. आन तू मला परका समजत असशीन त नग सांगूस…” बबन्याची ही मात्रा पूर्णतः लागू पडली.

“आरं काय सांगाया ठिवलं नाय त्या भाड्यानं…” नानानं कपाळावर हात मारून घेतला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

“म्हंजी? कोन हाय त्यो?” बबन्यानं विचारलं आणि तात्यानं एकेक करून सगळ्या घटना त्याच्या कानावर घातल्या. जसजसा नाना बोलत होता, बबन्याचा चेहरा तापत होता. नानाचे सगळे सांगून होईस्तोवर बबन्या मात्र एकही अक्षर बोलला नाही.

“नाना… रडू नगंस… रडून काय हुनार नाय. समदं म्या बघतो. आता त्यो हाय नी म्या हाय.” नानाच्या खांद्यावर थोपटत बबन्या उत्तरला. नानाला बबन्याच्या हाताचा स्पर्श खूपच आश्वासक वाटला.

“कदी येनार म्हनला त्यो?” बबन्यानं पुढचा प्रश्न केला.

“चार दिसांनी…” कसंबसं नानानं उत्तर दिलं.

काही न बोलता बबन्या उठला आणि घरातून बाहेर पडला.

“आवं… ह्यो काय वंगाळ त करनार नाय ना?” काहीसे आठवून शांता धास्तावली आणि तिचा रोख नानाच्या लक्षात आला. त्याला दोन वर्षांपूर्वी घडलेली गोष्ट आठवली. गावातील दोघांनी गौरीची छेड काढली म्हणून बबन्यानं त्यांना तुडवलं होतं. त्यातील एकाचा हात कायमचा अधू झाला होता. ती केस अजूनही चालूच होती. गरम डोक्याचा बबन्या कधी काय करील हे कुणीच सांगू शकत नव्हते. पण आज इतकी मोठी गोष्ट घडूनही ज्या अर्थी बबन्या काहीच बोलला नाही, त्या अर्थी त्याच्या मनात काहीतरी भलतेच शिजत असणार याची पुरेपूर खात्री नानाला पटली. त्याने धावतच दरवाजा गाठला आणि बबन्याला हाक मारली. पण बबन्या मात्र दिसेनासा झाला होता.

सगळं गांव बबन्याला ‘गावाला वाहिलेला पोळ’चं समजत होतं. जोपर्यंत त्याचा बाप जिवंत होता, त्याच्यावर काहीतरी अंकुश होता, पण दोन वर्षांपूर्वी तो गेला आणि हा निरंकुश बनला. दीड एकराच्या शेतात पिकणारा भाजीपाला हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत. एकदा का सकाळी सकाळी माणसांना कामाला लावून दिले की हा मोकळा हिंडायला.  त्याच्या मनात एखादी गोष्ट शिरली की त्याला अटकाव करणे कुणालाही शक्य नव्हते. त्याची आई त्याच्या ह्या स्वभावाला अगदी वैतागली होती. पण त्याच्यात काहीएक बदल अजून तरी झाला नव्हता. अशा बबन्यानं आता या प्रकरणात उडी घेतली होती त्यामुळेच तर नाना आणि शांता काळजीत पडले होते. नानाच्या मागे इतर काळजी काय कमी होत्या म्हणून त्यात अजून एकाची भर पडली.

शेवटी नानाने बबन्याचे घर गाठले.

“ए… बबन्या…” नानाने आवाज दिला तसा बबन्याची आई बाहेर आली.

“त्यो घरात नाई… त्यो कुडं घरात ऱ्हातो व्हंय?” तिचा स्वर वैतागलेला होता.

“आरं देवा… आता कुडं शोदू?” काहीसे स्वगतच नाना पुटपुटला.

“का रं? काय केलं आता त्यानं?” तिच्या स्वरात काळजी होती.

“काई नाई… नंतर बोलतू… येतो म्या…” म्हणत नाना माघारी वळला. काहीसे आठवून त्याने एसटीस्टँड गाठले. स्टँड समोरील पानटपरीवर सदू बसला होता. नानाला तिथं पाहताच सदूनं आवाज दिला…

“ये नाना… येवडी काय लगबग?”

“काई नाई… बबन्या दिसला व्हंय?” नानाने सदूच्या प्रश्नाला उत्तर न देता प्रतिप्रश्न केला.

“बबन्या? आरं आताच शराच्या गाडीत बसून ग्येला ना त्यो… येईलच दोन तीन तासात… का रं?”

“नाई.. काई नाई… उल्शिक काम व्हतं…” असं हताशपणे म्हणत नाना माघारी वळला.

“काय वो… भेटला का त्यो?” घरी आल्या आल्या शांतानं प्रश्न केला आणि उत्तरादाखल नानानं डोक्यावर हात ठेऊन तिथंच फतकल मारली.

क्रमशः

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्जवसुली भाग ३

Leave a comment