कर्जवसुली भाग ५

कर्जवसुली भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०

कर्जवसुली भाग ५ –

बबन्याने बँकेत पोहोचल्याबरोबर पवारचे टेबल गाठले. याच माणसाने विसुनानाला कर्ज काढते वेळी मदत केली होती.

“रामराम सायेब…!!!” बबन्यानं उभ्याउभ्याच नमस्कार घातला.

“हं… रामराम… बोला…!!!” फाईलमधील नजर वर करत पवारने बबन्याकडे पाहिले.

“सायेब… उल्शिक टाईम हाय का?”

“हं… बोला ना…!!!” त्याला बसण्याची खुण करत पवार बबन्याकडे लक्षपूर्वक पाहू लागला.

“थांकू सायेब… माह्या काकानं हितून कर्ज काढेले.”

“काय नांव?”

“विश्वास बडाख !!!” बबन्याने नांव सांगितले आणि पवार काहीसा चमकला. पण त्याने लगेचचं स्वतःवर नियंत्रण मिळवले.

“बरं मग?”

“त्याबद्दलचं उल्शिक बोलायचं व्हतं…”

पवारने एकदा आजूबाजूला पाहिले आणि आपला स्वर काहीसा हळू केला.

“हो… तीन चार दिवसांपूर्वी आम्ही येऊन गेलो त्यांच्याकडे… त्यांची एकूणच परिस्थिती पाहिली आणि खरंचच वाईट वाटले. पण एक बोलू? या खुर्चीवर बसून अशा गोष्टी बोलणे मला योग्य वाटत नाही पण… आठ एक दिवस थांबा… बहुतेक शासन दुष्काळ जाहीर करणार आहे. त्यावेळेस कर्जमाफीही केली जाण्याचा अंदाज आहे.” एकदम हळू आवाजात पवारने सांगितले. इतका गरम डोक्याचा बबन्या… पण आज मात्र एकदम शांत डोक्याने सगळे ऐकून घेत होता.

“आणखी एक… समजा आमचा साहेब जर तिथे आला, तर त्याच्या कोणत्याही गोष्टीला किंवा बोलण्याला घाबरू नका असा निरोप सांगा त्यांना…” बबन्याच्या हातावर आपला हात ठेवत शक्य तितक्या हळू आवाजात पवार म्हणाला आणि बबन्याला अजूनही चांगली माणसे समाजात आहेत यावर विश्वास बसला.

“त्यो हलकट कालच्यालाच येऊन ग्येला…!!!” बोलताना बबन्याचा चेहरा तापू लागला. आवाजही काहीसा वाढल्यासारखा वाटला पण पवारने डोळ्यानेच त्याला हळू बोलण्याची खुण केली.

“वाटलंच होतं आम्हाला… तिथून आल्यापासूनच तो त्यांची फाईल मागत होता… पण आम्ही त्याच्या पर्यंत ती पोहचू दिलेली नाही. त्यामुळे तुम्ही निर्धास्त रहा… एक लक्षात घ्या, कर्जदाराचेही काही अधिकार असतात आणि कोणतीही बँक त्यापलिकडे जाऊन कधीच वसुली करू शकत नाही… पण साहेबासारखे काही लोकं त्या गोष्टींचा आणि गरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शोषण करण्याच्या संधी शोधत असतात. गरीब लोकं स्वतःच इतके पिचलेले असतात की ते त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि इथेच या लोकांचे फावते.” पवार अगदी कळकळीने बोलत होता.

“ह्ये बी खरंय… पर समदे सारके नसतेत ना..!!” आपल्या रागावर नियंत्रण ठेवत बबन्या उत्तरला आणि नंतर त्याने घडलेली सगळी हकीकत पवारला सांगितली. त्याला या सगळ्याचा अंदाज असल्यामुळे त्याने आपला चेहरा शक्य तितका निर्विकार ठेवला होता.

“एक सांगू… गरम डोक्याने कोणताही निर्णय घेऊ नका. आणि निर्धास्त रहा…”

“हं…”

“आणि हो… माझं तर मत आहे की त्या दिवशी कुणी घरी थांबूच नका… काय?” पवार समजावणीच्या सुरात म्हणाला पण त्याचं बबन्याच्या चेहऱ्याकडे बारीक लक्ष होतं. बबन्याच्या चेहऱ्यावरील भाव अगदी ओळखू येतील इतके क्षणाक्षणाला बदलत होते. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. आणि प्रत्येक विचार पहिल्या विचारापेक्षा नक्कीच विरुद्ध होता.

“खरंय सायेब… पर याच्या घरात बाईमानुस नाई का? ह्यो असं वागतो तं?”

काहीसे शून्यात पहात अगदी हताश पणे बबन्या म्हणाला.

“आहे ना… कॉलेजमध्ये जाणारी मुलगी आहे. याचा मुलगा शाळेत जातो.” पवार बोलून गेला आणि क्षणार्धात त्याला आपण हे काय भलते बोलून गेलो असे झाले. पण या वेळात बबन्याच्या चेहऱ्यावरील भाव अगदी पूर्णपणे बदलले होते. काही क्षणांपूर्वी असलेली अगतिकता आता त्याच्या चेहऱ्यावर तसूभरही दिसत नव्हती.

“ओ… काही भलतं सलतं करू नका..!!!” बबन्याचा हात पकडत पवार म्हणाला.

“न्हाई… आता काय बी भलतं सलतं नाई त येकदम बराबर हाये त्येच करनार हाये म्या…” हे वाक्य उच्चारात असताना बबन्याच्या चेहऱ्यावर काहीसे स्मित झळकले आणि पवारच्या काळजात चर्र झाले. पण आता तो काही करू शकत नव्हता. त्याची अवस्था खूपच विचित्र झाली. एखादी अघटीत घटना घडणार याची त्याला पूर्ण कल्पना आली होती, पण ती कशी थांबवावी हे मात्र त्याला समजत नव्हते. आता पर्यंत साहेबानं जे केलं होतं त्याचं फळ त्याच्या मुलांना भोगावं लागू नये असे त्याला मनोमन वाटत होते. पण कुठेतरी साहेबाला कायमचा धडा शिकवणे तितकेच गरजेचे होते. ज्याच्यामुळे अनेक कुटुंबांना नरकयातना भोगाव्या लागल्या होत्या त्याला असेच सोडणे त्याच्या मनाला पटत नव्हते. इतके दिवस त्याच्या मनात साचलेल्या रागाने डोके वर काढले. योग्य अयोग्य हा विचार काहीसा बाजूला पडला. आणि आता याबद्दल कुठेही, कोणतीही वाच्यता करायची नाही असा त्याने निर्णय घेतला.

पवारचे आभार मानून बबन्या माघारी वळला. घरी आला तेंव्हा त्याच्या आईने विसुनाना येऊन गेल्याचे सांगितले आणि बबन्या घरातून बाहेर पडला.

“आरं ये नाना… हायेस का घरला?” बबन्याचा स्वर कानावर पडला आणि विसुनाना धावतच बाहेर आला.

“काय रं… कुडं गेल्ता?” नानानं विचारलं.

“शराला जाऊन आलो म्या..!” नानाच्या हाताला धरून त्याला घरात घेऊन जात बबन्या म्हणाला आणि दोघेही घरात आले. बबन्याचा आवाज ऐकून शांताही बाहेरच्या खोलीत आली होती.

“काय झालं?” नानानं काळजीच्या स्वरात विचारलं. खरं तर काय बोलावं हेच त्याला समजत नव्हतं.

“काई नाई… तुह्या बँकेत गेल्तो… तिडं पवार सायेब भेटले. मंग त्येन्लाच इचारलं… त त्ये म्हन्ले काय बी काळजी करू नका… त्यो भाड्या काय बी वाकडं करू शकनार नाई… धा बारा दिसात शासन कर्जमाफी दिल असं वाटू ऱ्हायलं. आन त्यो सायेब हितं आला तरी घाबरू नका म्हनून निरोप दिलाय त्यांनी…” नानाच्या खांद्यावर थोपटत बबन्या म्हणाला आणि दोघांनी वर पाहून हात जोडले.

“द्येवा.., लई उपकार हायेत तुजे… अगदी किस्नासारखा धावून आलास बगं गरीबाच्या मदतीला…!!!”

बबन्या अगदी टक लावून त्यांच्या आनंदी चेहऱ्याकडे पहात होता. एका मोठ्या संकटातून अगदी शेवटच्या क्षणी कुणी मदत केल्यावर मनाची जी अवस्था होते तीच काहीशी या दोघांचीही झाली होती.

“बबन्या… आमाला लई भ्या वाटलं व्हतं… ह्ये पोरगं आता काय करून यील, आन काय नाई… पन तू लैच चांगलं क्येलं बग… आता त्या हलकट मानसाशी काय बी संबंद नाई ठिवायचा…” शांताच्या स्वरात कौतुक होतं.

“मावशे… आसं कसं? संबंद तर येईलचं… म्या त्याला चांगलाच धडा शिकवीनार हाय… आन त्यात आता मला तुमी मदत करायची हाये…” काहीसा गंभीर होत बबन्या उत्तरला आणि परत एकदा दोघांच्या अंगावर सरसरून काटा आला.

क्रमशःकर्जवसुली भाग ५,कर्जवसुली भाग ५.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्जवसुली भाग ४

Leave a comment