कर्जवसुली भाग ७

कर्जवसुली भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०

कर्जवसुली भाग ७ –

“बबन्या… काय बोलून ऱ्हायला तू? तुला तरी समजतंय व्हंय?” सागर भडकलाच. बबन्यालाही बहुतेक हे अपेक्षितच होते. त्यामुळे त्याने आकाशकडे पाहिले.

“सागऱ्या… आदी त्यो काय म्हनू ऱ्हायला ते ऐकून त घ्ये… नाई पटलं त आपन आपला निर्नय घीऊ…” सागरला मध्येच टोकत आकाश म्हणाला.

“आरं त्येच म्या म्हनू ऱ्हायलो… आदी समदं ऐकून घी..!!!” बबन्या वैतागला.

“आरं काय ऐकून घ्यायचं? याचं कुडं लफडं असतं त म्या स्वता त्या पोरीला आनलं असतं, आन याचं लगीन लावून दिलं असतं… पन ह्यो ज्ये काय म्हनू ऱ्हायला त्यो गुन्हा हाये. पोलिसांच्या हाती घावलो त हाडं मोकळे व्हतीलच पन गावाची भी इज्जत जाईल… आन मला सांग… त्या पोरीचा काय दोष हाय रे?” सागरचा आवाज काहीसा वाढला.

“पन म्या म्हनतो… एकडाव समदं ऐकून घीवू ना? आन मला सांग, बबन्याला काय आपन आज वळीखतो का? त्यो कसा बी असला तरी हलकट नाई ह्ये म्या देवावर हात ठीऊन बी सांगू शकतो…” आकाशने सागरला शांत करण्याचा प्रयत्न केला. तसा सागरही बबन्याला अगदी लहान पणापासून ओळखत असल्यामुळे त्याला आजचा बबन्या काहीसा वेगळा वाटत होता आणि हेच कारण होते त्याच्या वैतागण्याचे…

“ये सागऱ्या… पायजेल तर म्या माह्या आईची आन घ्येतो… त्या पोरीच्या केसाला बी म्या धक्का लावनार नाई… आन तुला म्हाईत हाये… म्या कदीच आईची खोटी आन घ्येत नाई…” बबन्याने सागरला विश्वास देण्याचा प्रयत्न केला आणि सागर काहीसा शांत झाला. त्यानंतर एकेक करून बबन्याने आपला संपूर्ण प्लान दोघांनाही समजावून सांगितला. बबन्या बोलत असताना दोघांच्या चेहऱ्यावरील भाव एकसारखे बदलत होते.

“आता बोला… करनार का मदत? आन तुमी मदत नाई केली तरी म्या ज्ये ठरीवलं त्ये करनारचं…” बबन्याने दोघांना विचारण्या बरोबरच आपला निर्णयही सांगून टाकला.

“बबन्या… आजूक बी सांगू ऱ्हायलो… येळ ग्येली नाई… तुजा इचार सोडून दे… आपल्याला लई म्हागात पडंल..!!!” सागरने मुळमुळीत शब्दात विरोध केला आणि बबन्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरले. सागरचा असा मुळमुळीत स्वर तो त्याला मदत करायला तयार असण्याचे द्योतक होता.

“बबन्या… आपन ज्ये करू ऱ्हायलो ते ठीक नाई… पन सवाल आपल्या गावच्या इब्रतीचा हाये… तवां आता ज्ये हुईल ते हुईल… आमी हाय तुह्या संग…” आकाशनेही आपण त्याच्या बरोबर असल्याचे सांगितले.

“ठरलं त मंग… परवा तयार ऱ्हा…” सांगून तिघांनी एकमेकांचा निरोप घेतला.

एक गोष्ट तर पूर्ण झाली होती. आता दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे शांता आणि विसुनानाला याबद्दल विश्वासात घेणं. बबन्या जो निघाला तो तडक विसुनानाच्या घरी हजर झाला.

“ये नाना… हायेस का घरला?” बबन्या आवाज देतच घरात आला. बबन्याचा आवाज ऐकून शांताही बाहेरच्या खोलीत दाखल झाली.

“काय रं… काल व्हता कुडं?” विसुनानानं विचारलं.

“शराला गेल्तो…”

“शराला? कायला?”

“व्हतं काई काम…”

“बबन्या… काय येडं वाकडं त करत नाई ना तू?” शांतानं आता डायरेक्ट मुद्द्यालाच हात घातला आणि बबन्या काहीसा गंभीर झाला.

“मावशे… येडं वाकडं मला नाई वाटू ऱ्हायलं…” हे बोलताना बबन्याच्या चेहऱ्यावरील भाव शांतला जरा वेगळेच भासले.

“बबन्या… म्या काय म्हन्तो… आता तू सोता बँकेत जाऊन आलाय. पवार सायबांनी बी आपल्याला काळजी करू नगा असा निरूप धाडलाय… मंग…” बोलता बोलता विसुनाना काहीसा थांबला.

“नाना… त्यानं काय हुईल? त्यो सायेब त तसाच सुटंल ना? मला त्यालाच धडा शिकवायचा हाय. पुन्यांदा कुना बी नडलेल्या मानसाला नाडताना त्यानं हजार येळेस इचार क्येला पायजेल. आन देवानं बी सांगितलंय… आदी स्वता प्रयत्न करा आन नाई काई झालं त मला आवाज द्या… म्हनून आता म्या काय सांग्तो त्ये नीट ऐका…” असे म्हणून त्याने आपला संपूर्ण प्लान दोघांना सांगायला सुरुवात केली. शांताने दोन तीन वेळेस त्याला विरोध केला पण बबन्याने तिला दाद दिली नाही आणि आपले म्हणने पर्ण करण्याचा प्रयत्न केला. जसजसा बबन्या आपला प्लान सांगत होता, शांताच्या चेहऱ्यावर संताप वाढताना दिसत होता.

“नाई… मला नाई पटत… पाप पुरशानं करायचं आन शिक्शा बाईनी भोगायची. त्यो सायेब हलकट निघाला त्यात त्याच्या पोरीचा काय दोष? आन तिचं आयुष्य बरबाद हुईल अशा कोन्च्याच गोष्टीत म्या सामील नाई होनार. आन तुमाला बी म्या आसं काय बी करू देनार नाई…” शांता चांगलीच भडकली होती.

“अगं मावशे… त्या पोरीच्या केसाला बी धक्का लागनार नाई…” बबन्यानं समजावण्याचा प्रयत्न केला…

“तुमा पुरशांचा काय नेम… रागाच्या आन सुडाच्या भरात काय कराल ह्ये काय सांगता येतं व्हंय? तुमची आई, तुमची भैन, तुमची मुलगी याच तेवड्या बाईमानुस आन मंग इतर कोन? तुमच्यातली मानुसकी तवां कुडं जाती शेन खायला?” शांतानं साक्षात चंडीचा अवतार धारण केला. ज्या बबन्याला ती इतके दिवस ओळखत होती तो बबन्या आणि आजचा बबन्या यांच्यात असलेला फरक तिला जास्त त्रासदायक आणि व्यथित करणारा होता.

“मावशे… उल्शिक शांत हो… नाव शांता आन केवडी चिडू ऱ्हायली?” बबन्याने हसायला सुरुवात केली. काहीही करून त्याला तापलेले वातावरण शांत करायचे होते. अर्थात असे काही होईल हे तो आधीच विचार करून आलेला होता. त्याच्या दृष्टीने हीच एक गोष्ट सगळ्यात अवघड होती.

“मावशे… माह्या आईची आन घीवून सांग्तो… ती पोरगी बी माह्यासाठी गौरीसारखीच असंल. आन तुला म्हाईत हाये… येकदा का म्या कुनाला भैन मानलं मंग तिच्यासाठी म्या काई बी करू शक्तो…” बबन्यानं फायनल अस्त्र बाहेर काढलं आणि शांता जरा शांत झाली. त्यानंतर अगदी व्यवस्थितपणे त्याने आपला प्लान पुन्हा एकदा दोघांना सांगितला. नानाच्या चेहऱ्यावर आलेले टेंशन मात्र लपू शकत नव्हते. हा प्लान किती सफल होईल याबाबत मात्र तो साशंकच होता.

क्रमशःकर्जवसुली भाग ७,कर्जवसुली भाग ७.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्जवसुली भाग ६

Leave a comment