कर्मभोग भाग १

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग १ –

दरवाजावरील बेल वाजली. या वेळेला कोण आले असावे याचा विचार करतच प्रियाने दार उघडले. दारात रवी उभा होता. खरं तर रवीची घरी यायची ही वेळ नव्हती त्यामुळे त्याला पाहताच तिला थोडे आश्चर्य वाटले तर त्यात काही नवल नव्हते.(कर्मभोग भाग १)

“तू? आणि इतक्या लवकर?” तिने काहीशा आश्चर्याने विचारले.

“हो… तुझी आठवण आली… घरी आलो…” आपल्या आवाजात शक्यतो मिश्कीलपणा आणायचा प्रयत्न करत रवी उत्तरला.

“माझी आठवण? का? अजून काही राहिले आहे का बोलायचे?” कडवट सुरात तिने प्रश्न केला.

“ए बाई… आता तो विषय नको परत. चूक झाली माझी. तुझ्यावर चिडायला नको होते मी… हवे तर तुझी माफी मागतो पण सोड तो विषय.” अतिशय वैतागलेल्या सुरात रवी उत्तरला.

“बरं बरं… तुला तुझी चूक उमजली यातच मला आनंद आहे.” काहीशी माघार घेत ती म्हणाली. खरं तर तिलाही तो विषय नकोच होता.

“चल ते जाऊ दे… तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. ओळख बरं काय असेल ती?” तिच्या गळ्यात हात टाकत त्याने प्रश्न केला.

काही केल्या त्याने कोणती बातमी आणली असेल याचा तिला तर्क करता येईना. एकतर गेल्या दीड दोन महिन्यांपासून त्याचे वागणे बरेच बदलले होते. एकेकाळी तिच्यावर जीवापाड प्रेम करणारा तिचा नवरा गेल्या काही दिवसांपासून खूप विचित्र वागू लागला होता. दर दिवसाआड त्यांची कडाक्याची भांडणे होत. भांडणानंतर तिचे मार खाणे तर नित्याचेच झाले होते. ‘माहेराहून पैसे आण’ ही त्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच होती. बरे ती घरची श्रीमंत होती असेही नाही. तिचे वडील भिक्षुकी करत होते. त्यातही यजमान जितके देईल तितकेच घ्यायचे हा त्यांचा शिरस्ता. त्यामुळे कित्येक वेळेस तर तिच्या कॉलेजची फी देतानाही त्यांच्या नाकीनऊ येत होते. तिचा लहान भाऊ, तोही अजून शिकतच होता त्यामुळे घरखर्च भागवून यांना पैसे देणे शक्यच नव्हते. अशी सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता त्याने कोणती आनंदाची बातमी आणली असेल याचे तिला कोडे पडले होते.

“का गं? कसला विचार करतेस एवढा? खरंच सांगतोय मी.” त्याने तिचा विचारमग्न चेहरा आपल्या दोन्ही हातात घेत विचारले.

“अं… काही नाही… कुठे काय?” ती त्याच्या या प्रश्नाने थोडी बावरली पण लगेचच तिने स्वतःला सावरले.

“कसली आनंदाची बातमी आणली आहेस?” होईल तितके नॉर्मल होत तिने प्रश्न केला.

“नाही… असे नाही सांगणार मी… थांब जरा… एक मिनिट…” असे म्हणत तो लगेच बाजूला झाला. त्याने आपल्या बरोबर आणलेला मिठाईची खोका उघडला. त्यातील एक तुकडा हातात घेवून तो तिच्या तोंडात भरवला.

“अगं आज मला माझ्या व्यवसायासाठी फायनान्स मिळाला आहे. हा पहा चेक… पूर्ण पाच लाखाचा. जसजसे काम पुढे पुढे सरकेल तसतसे अजून असे ९ चेक मिळतील.” त्याने आपल्या खिशातून चेक काढत तिच्या समोर धरला.

“अय्या… कित्ती छान…” ती ही त्याच्या आनंदात सामील झाली.

“आणि हो… ही झाली माझ्यासाठी आनंदाची बातमी… आता ऐक तुझ्यासाठी आनंदाची बातमी… आपले काम सुरु होण्याआधी आपण दोन दिवस कुठेतरी ट्रीपला जाणार आहोत. नाहीतरी तू म्हणत होतीसचं ना? काम चालू झाल्यावर मग वेळ मिळतो… नाही मिळतो…” त्याने तिची हनुवटी जरासी वर उचलत आनंदाची बातमी सांगितली.

आता मात्र तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहू लागला. ज्याच्यावर प्रेम केले, ज्याच्याशी लग्न करण्यासाठी घरच्यांशी काही काळ अबोला पत्करला असा रवी तिला परत मिळाला आहे असे तिला वाटू लागले. त्या आनंदाच्या भरात तिने त्याला घट्ट मिठी मारली.

“थ्यांक्यू… थ्यांक्यू व्हेरी मच रवी… तुझे हे प्रेझेंट माझ्या नेहमीच लक्षात राहील.” ती आनंदाने म्हणाली.

“हो… मी दिलेले प्रेझेंट तू जन्मात कधीच विसरू शकणार नाहीस… मला खात्री आहे…” यावेळेस रवीचा स्वर तिला थोडा विचित्र वाटला. पण गेल्या काही दिवसात रवीच्या बोलण्यात बराच फरक पडला असल्यामुळे असेल कदाचित असे वाटून तिने त्याकडे दुर्लक्ष केले.

“कधी जायचे आपण ट्रिपला?” तिने उत्साहात प्रश्न विचारला.

“उद्याच…”

“उद्या? इतक्या लवकर? पण कुठे?” आता मात्र तिला आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. सकाळी भांडण करून गेलेला आपला नवरा वेळेआधीच लवकर येतो काय, मिठाई आणतो काय, ट्रिपचा बेतही ठरवतो काय… सगळेच अकल्पित.

“भंडारदऱ्याला… या दिवसात अगदी हिरवे हिरवे झालेले असते सगळीकडे… मस्त रिसोर्टही बुक केले आहे मी आपल्यासाठी. तुलाही नक्कीच आवडेल ते.”

एकावर एक आश्चर्याचे धक्के रवी आज तिला देत होता. आपसूकच तिचे मन थोडे साशंक झाले.

“रवी? अरे तुझ्यात इतका बदल कसा झाला? आणि तोही काही तासातच?” शेवटी न राहवून तिने विचारलेच.

“अगं… आज माझ्या हातात पहिला चेक आला आहे. ३/४ दिवसात कामाला सुरुवात होणार. मग म्हटलं आधी तुला खुश करावं… म्हणून सगळं झटपट ठरवलं…” तिची नजर टाळत तो उत्तरला, पण ते तिच्या लक्षात आले नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी आपले सामान बांधले. रवीने आदल्या दिवशीच मित्राकडून त्याची कार आणली होती. भंडारदरा तसं एका दिवसात पाहून होणारं ठिकाण, पण जर त्याचा खरा आनंद घ्यायचा तर २/३ दिवस तिथे राहणेच उत्तम. गाडीने घोटी सोडले आणि डोंगरदऱ्याचा प्रदेश सुरु झाला. रस्त्याची ती नागमोडी वळणे, बाजूने असलेले हिरवेगार डोंगर, त्यांच्या पायथ्याशी असलेली टुमदार घरे, डोंगरावरून पावसाच्या पाण्याने तयार झालेले धबधबे आणि त्यावर सकाळचे कोवळे ऊन पडून चमकदार बनलेले सोनेरी रंगाचे पाणी माणसाचे मन मोहून घेत होते. प्रिया अगदी भान हरपून बाहेरचे सौंदर्य न्याहाळत होती.

जवळपास ४/५ किलोमीटर अलीकडेच रवीने गाडी डाव्याबाजूने जाण्याऱ्या छोट्या रस्त्यावर टाकली. हा रस्ता जरी डांबरी होता तरी अगदीच लहान होता. एकावेळेस फक्त एक गाडी जावू शकेल असा. पावसाळा असल्यामुळे मध्येच तो उखडलेला होता. या रस्त्यावर ना येणारे वाहन होते ना जाणारे. मध्ये घरे देखील अगदीच किरकोळ म्हणजे नसल्यातच जमा होती. रस्त्यातील खड्ड्यांमुळे गाडी अगदीच हळू चालवावी लागत होती आणि त्यातच पाऊस चालू झाला होता. अगदी मुसळधार. पावसाचा जोर इतका होता की अगदी ७/८ फुटावरीलही काही दिसत नव्हते. त्यात उताराचा रस्ता. त्यामुळे रवी अगदी गप्प बसून गाडी चालवत होता आणि त्यामुळेच प्रियाचे मन अस्वस्थ होत होते. कसलीतरी अनामिक भीती तिच्या अंतःकरणात उमटत होती. पण त्याचे कोणतेही सबळ कारण तिला उमगत नव्हते.

थोड्याच वेळात गाडी एका रिसोर्टजवळ थांबली. इथेच रस्ता संपलेला होता. समोरच कृष्णावंती नदी खळखळत वहात होती. नदीच्या दुसऱ्या काठाने लगेचच डोंगराच्या चढणीला सुरुवात होत होती. गाडीच्या उजव्या हाताला काही अंतर गेल्यावर भाताची शेते दिसत होती आणि डाव्या हाताला रिसोर्टच्या रूम दिसत होत्या. अगदी दगडी बांधकाम आणि वर कौलाचे छत असलेल्या. बाहेर पाऊस बराच कमी झाला होता. दोघेही खाली उतरून रिसेप्शनला गेले. रवी सगळे सोपस्कार पूर्ण करत होता तो पर्यंत प्रिया त्या जागेचे बारकाईने निरीक्षण करत होती. ज्यांना एकांत पाहिजे त्यांच्यासाठी खरेच तो स्वर्गच होता यात काहीच संशय नव्हता. रिसेप्शनच्या इमारतीपासून वेगवेगळ्या खोल्यांपर्यंत जाण्यासाठी एका वेळेस फक्त एक माणूस जाऊ शकेल असा दगडाची पायवाट बनवण्यात आली होती. पायवाटेच्या दोन्ही बाजूला गुडघ्याइतक्या उंचीची फुलझाले लावलेली होती. हिरवट पोपटी रंगाच्या झाडांवर पिवळी, नारंगी, गुलाबी रंगाची फुले उमलल्यामुळे त्या पायवाटेचे सौदर्य खूपच खुलले होते. पायवाटेच्या डावीकडे रिसोर्टच्या रूम म्हणजे एक स्वतंत्र टुमदार घरेच बनवलेली होती. प्रत्येक घरासमोर बसायला जागा केलेली होती जी कौलारू छताने अच्छादलेली होती. दोन घरांच्या मध्ये ८/१० फुटाचे अंतर सोडल्यामुळे त्यांचे वेगळेपण सिद्ध होत होते. पायवाटेच्या उजव्या बाजूला १०/१२ फुट रुंदीची जी जागा होती त्यात फुलांची बाग फुलवलेली होती आणि त्याच्या पलीकडे कृष्णावंती नदी वहात होती. बहुतेक नदी जास्त खोल नसावी कारण पाण्याचा खळखळाट खूप जोराचा होता.

एकंदरीत त्या जागेचे सौदर्य पाहून तिच्या मनात उत्पन्न झालेली भीती कुठल्या कुठे पळाली. ती जरी रिसेप्शनच्या इमारतीमध्ये उभी होती तरी बाहेर पाऊस चालू असल्यामुळे बाहेरून येणारे गार वारे तिच्या अंगाला झोंबत होते. ती त्या जागेच्या प्रेमातच पडली. कधी आपल्या मैत्रिणीला फोन करून तिला आपल्या आनंदात सामील करून घेतो असे तिला झाले. त्या भरातच तिने पर्स मधून आपला मोबाईल काढला आणि मैत्रिणीचा नंबर लावला. बराच वेळ मोबाईल कानाला लावल्या नंतरही काहीच आवाज येत नाही हे लक्षात आल्याने तिने मोबाईलवरील रेंज मीटरवर आपली नजर टाकली. थोडी देखील रेंज इंडीकेशन तिला दिसली नाही. तिने जरा आजूबाजूलाही जावून पाहिले, पण तिथेही मोबाईलला रेंज नव्हती. आपल्या ट्रीप मध्ये रवीला कुणाचेच फोन येणार नाही या गोष्टीचा विचार तिच्या मनात आला आणि तिला मनस्वी आनंद झाला. तेवढ्यात सगळे सोपस्कार पूर्ण करून रवी तिच्या जवळ आला.

“काय? कसा आहे स्पॉट?” त्याने उत्साहाने विचारले.

“खूप छान… खूपच छान… अगदी स्वर्ग आहे हा माझ्यासाठी.” ती आनंदाने म्हणाली. तसे तिचा चेहराच सगळे सांगत होता.

“आता आधी इथे आपण मस्त चहा, नाष्टा करू आणि पाऊस जरा कमी झाल्यावर आपल्या खोलीत आपले सामान टाकून मस्त धरणाचे पाणी पहायला जाऊ… चालेल ना?” त्याने तिला विचारले.

“चालेल तर… मला भूकही लागलेलीच आहे.” तिनेही होकार भरला.

थोड्याच वेळात त्यांच्या समोर गरमागरम भज्यांची डिश आली. एकतर बाहेर चाललेला पाऊस, अंगाला झोंबणारा गार वारा, पोटात खवळलेली भूक आणि त्यात गरमागरम भजे… स्वर्गीय सुख यापेक्षा काय वेगळे असू शकेल? थोड्या वेळाने जठराग्नी जरा शांत झाल्यावर तिने रवीला विचारले.

“रवी… तू मला या आधी का नाही आणले इथे?”

“अगं मला तरी कुठे माहिती होते या जागेबद्दल… काल माझ्या मित्रांनी याबद्दल सांगितले आणि आज लगेचच मी तुला घेवून आलो.”

“पण काय रे… आता खूप छान वाटते आहे पण या जंगलात रात्री भीती तर नाही ना?” तिने चाचरत विचारले.

“हं…“ रवी काहीसा गंभीर झालेला दिसला.

“ए… सांग ना… एकतर मोबाईलला इथे रेंजही नाहीये. त्यातून हा जंगली भाग… मध्येच लाईट गेली तर?”

“लाईट गेली तर जनरेटरची सोय आहे इथे… हो पण एक गोष्ट आहे मात्र… रिसेप्शनवर मला सांगण्यात आले आहे की रात्री १० नंतर खोलीच्या बाहेर पडू नका. बिबटे, तरस हिंडत असतात या परिसरात.” हे सांगताना रवी आपल्याला मुद्दाम घाबरवण्याचा प्रयत्न करतोय असे तिला जाणवले.

“ए… उगाच घाबरवू नकोस मला…” तिने डोळे मोठे करत म्हटले.

“नाही गं… मी खोटे बोलत नाहीये… इथे खरंच जंगली श्वापदे आहेत.”

“बापरे…” आता तिच्या चेहऱ्यावर काहीशी भीती स्पष्ट दिसत होती.

“रवी… पण खरंच सांगते… तू दिलेले हे सरप्राईज मी कधीच विसरणार नाही.” ती रवीचा हात आपल्या हातात घेत म्हणाली.

“अगं सरप्राईज तर मी तुला रात्री देणार आहे.. जे तू तुझ्या जिंदगीत कधीच विसरणार नाही असे…” आपला हात तिच्या हातातून हळूच सोडवून घेत तो म्हणाला. हे बोलताना परत एकदा तिला त्याचा स्वर जरा विचित्रच वाटला. परत एकदा तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

“अजून कोणते सरप्राईज आहे?” तिने विचारले.

“ते तुला रात्री समजेलच… चल… पाऊस थांबला आहे तो पर्यंत आपण आपले सामान खोलीत नेवून टाकू.” असे म्हणत तो उठला आणि गाडीच्या दिशेने चालू लागला. आता मात्र तिचे विचारचक्र जोरात फिरू लागले. आपला नवरा सकाळी भांडतो… संध्याकाळी घरी लवकर येतो… लगेच दुसऱ्याच दिवशी आपल्याला अशा निर्जन स्थळी घेवून येतो… सगळेच अनाकलनीय. आणि अजून रात्र झाल्यावर हा काय नवीन सरप्राईज देणार? बरे ते सांगताना त्याचा स्वर… नेहमीपेक्षा जरा विचित्रच… पुढे काय वाढून ठेवले आहे देव जाणे. आता जे व्हायचे ते होवो… मी तयार आहे सगळ्यांशी सामना करायला… विचारांच्या या तंद्रीतच ती उठली आणि रवीच्या मागोमाग चालू लागली.

क्रमशः कर्मभोग भाग १,कर्मभोग भाग १,कर्मभोग भाग १ –

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्मभोग भाग २

Leave a comment