कर्मभोग भाग २

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग २ –

काही वेळातच दोघेही फ्रेश होऊन धरण पाहण्यासाठी बाहेर पडले. पण प्रियाचे मात्र कशातच लक्ष लागत नव्हते. सतत रात्री काय होणार याची तिला धास्ती वाटत होती. शेंडी गावात आल्यावर आधी तिने फोन हातात घेतला. तिथे रेंज व्यवस्थित येत असल्यामुळे लगेचच मैत्रिणीला फोन लावला. रवीने देखील तिला बिलकुल आडवले नाही. पण तो सतत तिच्या बरोबर असल्यामुळे तिला मैत्रिणीशी मोकळेपणाने बोलता येईना. शेवटी आपण भंडारदऱ्याला आलो आहोत हे आपल्या मैत्रिणीला समजले आहे यातच समाधान मानून आणि अगदी जुजबी संभाषण करून तिने फोन ठेवला.(कर्मभोग भाग २)

रात्री आठच्या सुमारास सगळीकडे फिरून दोघे रिसोर्टवर परत आले. आता परत पावसाला सुरुवात झाली होती. पावसाचा आवाज, नदीचा खळखळाट आणि त्याच्या बरोबर रातकिड्यांची किरकिर रात्रीच्या त्या भयाण शांततेचा भंग करत होते. दोघेही गाडी पार्क करून पायवाटेवर आले. इथून घरांची रांग चालू होत होती. रवीने घेतलेली रूम रांगेत सर्वात शेवटची असल्यामुळे तिथपर्यंत पायी जाणे भाग होते. पावसाने चांगलाच जोर पकडलेला असल्यामुळे गाडीतून उतरून थोडे अंतर चालल्या बरोबरच ते दोघेही भिजले. कधी एकदा रूमवर पोहोचतो आणि कपडे बदलतो असे तिला झाले. पहिल्या तीन रुमच्या बाहेरचा दिवा जळत होता. नंतर मात्र पूर्ण अंधार होता. खोल्यांची रांग पुढे जावून जराशी आतल्या बाजूला वळत होती त्यामुळे पहिल्या खोलीपासून शेवटची खोली बिलकुलच दिसत नव्हती. प्रत्येक खोलीच्या पडवीतील दिव्याचा पिवळसर प्रकाश सभोवतालच्या अंधाराशी सामना करत होता. ज्या ज्या रूम तिथून दिसत होत्या त्या प्रत्येक रुमच्या पडवीत कुणी ना कुणी गप्पा मारत बसले होते. पहिल्या रुमच्या पडवीत एक कुटुंब गप्पा मारत होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या रुमच्या पडवीत नवीन लग्न झालेले जोडपे दिसत होते. त्यांना तिथे पाहून तिला जरा धीर आला. आपण इथे एकटे नाही याची जाणीवच तिला खूप बळ देवून गेली. त्यापुढील २ रुमच्या पडवीतील दिवा मात्र बंद होता म्हणजे तिथे कुणीही उतरले नव्हते. तिथे आले तसे त्यांना त्यांची रूम दिसू लागली. त्याच्या अलीकडील रूमचा दिवाही जळत होता म्हणजे तिथेही कुणीतरी उतरले होते. तसे त्या रुमच्या पडवीत काही जण बसलेले तिला दिसले. ते दोघे जसे त्या रुमच्या जवळ आले, तिथे पार्टी चालू होती. ते एकूण तीन जण होते. त्यांच्या मध्ये एक टेबल मांडले होते. त्यावर काही रिकाम्या झालेल्या आणि काही भरलेल्या दारूच्या बाटल्या ठेवलेल्या होत्या. तिघांच्याही हातात दारूचे ग्लास होते आणि ते अचकट विचकट विनोद करत एकमेकांना टाळ्या देत पार्टीचा आनंद घेत होते. संपूर्ण भिजलेले दोघे जण जसे त्यांच्या रुमच्या समोरून जात होते, त्या तिघांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या. तिघांनीही एकमेकांना डोळ्यांनी केलेल्या खुणा तिला तत्काळ जाणवल्या. तिघेही तिच्या भिजलेल्या शरीराकडे एकटक पहात होते. त्यांच्या त्या वखवखलेल्या नजरांची तिला एकदम शिसारी आली. जितक्या लवकर होईल तितके तिथून पुढे जावे म्हणून तिने आपला वेग वाढवला. पण जोपर्यंत रवी दार उघडत नाही तो पर्यंत तिला बाहेर उभे रहाणे भाग होते आणि त्या तिघांच्या नजरा काही तिच्यावरून हटत नव्हत्या. शेवटी रवीने दार उघडले आणि ती काहीशी पळतच रूममध्ये शिरली.

“काय गं… काय झाले इतके घाबरायला?” त्याने तिला प्रश्न केला.

“रवी… आपल्याला आपली रूम चेंज नाही का करता येणार?” रवीच्या प्रश्नांचे उत्तर न देता तिने प्रतिप्रश्न केला.

“अगं… अशी कशी आता चेंज करता येईल रूम? आणि काय वाईट आहे या रूम मध्ये?” रवीने विचारले.

“मला नाही आवडली ही रूम… बस… इतकेच मी आत्ता सांगू शकते… नाही का चेंज करता येणार आपल्याला रूम?” तिने परत आपले टुमणे लावून धरले.

“ठीक आहे… आधी कपडे तर बदलून घे… मीही आधी चेंज करतो…”

दोघांनीही चेंज करून होते न होते तोच दारावर टकटक झाली.

“कोण आहे?” रवीने विचारले.

“रूम सर्विस सर…” बाहेरून आवाज आला. रवीने दार उघडले.

“जेवण आणू का सर?” आलेल्या वेटरने प्रश्न केला. तितक्यात प्रियाने त्याला विचारले.

“काहो… आम्हाला आमची रूम चेंज करता येईल का?”

“ते तुम्हाला रिसेप्शनवर विचारावे लागेल म्याडम… पाहिजे तर मी त्यांना विचारून सांगतो.” वेटरने उत्तर दिले.

“प्लीज… विचारून सांगा ना आम्हाला…”

“ठीक आहे… पण जेवण आताच आणू का इथे?”

“नाही आधी तुम्ही ते विचारा… नंतरच आम्ही जेवण घेऊ.”

“ठीक आहे म्याडम…” म्हणत वेटर निघून गेला.

काही वेळातच तो परत आला.

“सॉरी म्याडम… कोणतीच रूम शिल्लक नाहीये. सगळ्या बुक आहेत त्यामुळे रूम चेंज नाही होऊ शकणार… बरे आता आणू का जेवण?” त्याने नम्रतापूर्वक प्रियाच्या विचारण्याला नकार देत पुढचा प्रश्न केला.

“ओह… शी… ठीक आहे… आण आताच जेवण…” काहीशा नाराजीने तिने जेवणाची ऑर्डर दिली. या कोणत्याच संभाषणात रवी बिलकुल सहभागी झाला नव्हता याचे तिला काहीशे आश्चर्यच वाटले.

“रवी… रात्र झाली… आता सांग ना… काय सरप्राईज आहे माझ्यासाठी ते?” तिने रवीकडे मोर्चा वळवला.

“थांब गं… एवढी कसली घाई आहे तुला? आधी जेवण करून घेवू… बाकी गोष्टींसाठी पूर्ण रात्र पडली आहे…” रवीची नजर तिला जरा चमत्कारिकच वाटली.

१० मिनिटात वेटर जेवण घेवून आला. दोघांनी जेवण उरकले. जेवणानंतर थोडे बाहेर फिरावेसे वाटत होते पण बाहेर पाऊस चालूच होता, त्यात अंधार, आणि त्या शेजारच्या खोलीत उतरलेल्या तिघांच्या वखवखलेल्या नजरा. त्यांच्याकडे पाहताक्षणीच तिला त्यांच्या बद्दल तिरस्कार निर्माण झाला होता.

“रवी… त्या शेजारच्या खोलीत उतरलेले लोकं पाहिलेस का तू?” तिने सुरुवात केली.

“हो… का गं? त्यांचे काय?”

“अरे… आपण येत होतो तर कसे घाणेरड्या नजरेने पहात होते माझ्याकडे…”

“अस्सं? मग मला तेंव्हाच का नाही सांगितलं?”

“अरे तिघेही पूर्ण दारूच्या धुंदीत होते… उगाच कशाला तमाशा? म्हणून मी गप्प बसले… त्यामुळेच मी रूम चेंज करायची म्हणत होते…” तिने सरळ सांगून टाकले.

“हं… जाऊ दे गं… तू नको टेन्शन घेवूस…” त्याने तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हटले. नंतर इतर गप्पा रंगल्या आणि त्यात ती सगळे विसरून गेली. जवळपास १ तासाने दारावर टकटक झाली.

“कोण?” रवीने विचारले…

“रूम सर्विस सर…” बाहेरून आवाज आला.

“रूम सर्विस? आणि इतक्या रात्री?” प्रिया रवीकडे पहात म्हणाली.

“हो… प्रिया… तुझे सरप्राईज असेल… मी म्हटले होते ना तुला… ते…” असे म्हणत रवी दरवाजाकडे गेला. या सरप्राईज बद्दल प्रिया अगदीच विसरली होती. रवीने दार उघडले मात्र त्याला आत ढकलत शेजारच्या खोलीत उतरलेले ते तिघेही आत दाखल झाले. त्यांना पाहताच प्रियाच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तिघांपैकी एकाने पटकन दार लावून घेतले. ती खोली साऊंडप्रुफ असल्यामुळे आता तिचा आवाज बाहेर ऐकू जाणार नव्हता. जरी तिने दार वाजवले तरी नदीचा खळखळाट, पावसाचा आवाज आणि इतर खोल्यांपासून असलेली त्यांच्या खोलीची दुरी पाहता त्याचाही काही उपयोग होणार नव्हता.

“काय रवी शेट… कसा गेला दिवस? काही गमतीजमती सांगा ना आम्हाला…” त्यांच्यातील एकजण रवीकडे हसत पहात म्हणाला.

“कसा म्हणजे? चांगलाच गेला…” हसत हसत रवीने उत्तर दिले.

“मग आता आमची रात्र चांगली जाण्यास मदत करा म्हणजे झाले…” दुसरा एकजण म्हणाला आणि प्रियाला काय घडते आहे याचा अंदाज आला. आता तिच्या चेहऱ्यावरील भीतीची जागा संतापाने घेतली.

“नालायक माणसा… हलकटा… तू इतका खालच्या पातळीला उतरलास? पैशासाठी स्वतःच्या बायकोचा सौदा केलास?” तोंडाने शिव्या देत ती रवीवर धावून गेली.

“नीच… कुठे फेडशील हे पाप? तुझ्या आईचा, बहिणीचाही असाच सौदा केला असतास?” हे बोलत असताना तिने रवीच्या श्रीमुखात भडकावली. त्याला तिच्याकडून होणारा असा प्रतिकार अनपेक्षित असल्यामुळे तो काहीसा मागे ढकलला गेला. तेवढ्यात त्या तिघांमधील तिसऱ्याने तिचे हात धरून तिला बाजूला ओढले.

“ओहोहोहो… वहिनी… अहो असे काय करता? नवरा आहे तो तुमचा…” पहिला व्यक्ती कुस्चितपणे म्हणाला.

“थू… तुझ्या सारखा नवरा असण्यापेक्षा मला विधवा होणे आवडेल…” ती रवीच्या तोंडावर थुंकत म्हणाली. तिच्या या वागण्याने रवीची तळपायाची आग मस्तकात गेली. तोही तिच्या अंगावर धावून जावू लागला पण दुसऱ्या व्यक्तीने त्याला मागे सारले.

“ए दीड शहाणे… यालाही कारण तूच आहेस. तुझ्या बापाकडून आणले असते पैसे तर मी कशाला तुझा सौदा केला असता? माझे ऐकले नाहीस ना… भोग आता आपल्या कर्माची फळं” रवी चवताळून म्हणाला.

“नराधमांनो… फळं तर तुम्हाला भोगावी लागतील… तुमच्या कर्माची…” ज्याने तिचा हात धरून ठेवला होता त्याच्या हातातून आपला हात काढून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत ती उद्गारली.

“मी काय म्हणतो प्रिया… आता तुझा हा आवाज कुणालाच ऐकू जाणार नाहीये. आणि आमच्या चौघांसमोर तुझा टिकावही लागणार नाही. मग कशाला उगाच शक्ती वाया घालवतेस? आम्हाला सहकार्य कर आणि स्वतःचं भलं करून घे… काय?” आपल्या हाताची पकड जराही कमी होऊ न देता तिला समजवायचा तिसऱ्या माणसाने प्रयत्न केला.

“अहो… सोडा हो… सोडा मला… तुमच्या बहिणीसारखी आहे हो मी… तो वर बसलेला सगळे पाहतोय… त्याची तरी भीती बाळगा…” प्रतिकार करून काही उपयोग नाही हे तिच्या लक्षात आल्याने तिने विनंती करण्याचा प्रयत्न केला.

“हाहाहा… त्याची भीती दाखवू नकोस आम्हाला. तुझ्यासाठी ही पहिली वेळ असेल पण आमच्यासाठी हे नित्याचेच आहे…” पहिला व्यक्ती अट्टाहास करत म्हणाला. लगेच दुसऱ्या व्यक्तीकडे पहात म्हणाला…

“पाहतोस काय नुसता? चल हो पुढे…” पहिल्या व्यक्तीचे शब्द संपतात न संपतात तोच दुसरा व्यक्ती पुढे झाला. त्याने प्रियाच्या अंगाला हात लावला मात्र त्याच्या नाकावर एक जोरदार फटका बसला आणि तो तसाच मागे फेकला गेला. काय होते आहे हे कळायच्या आधीच ज्याने प्रियाला पकडून धरले होते त्याच्या एक सणसणीत कानफटात बसली. तो फटका इतका जोराचा होता की तो माणूस प्रियाचा हात सोडून चार फुट बाजूला जावून पडला. काय घडते आहे हे कुणालाच समजेना. प्रियाच्या जवळ आता एक आकृती हळूहळू स्पष्ट होऊ लागली. काही क्षणातच तिने एका स्त्रीचा आकार धारण केला. आता त्यांच्या समोर एक २५/२६ वर्षाची स्त्री उभी होती.

क्रमशः कर्मभोग भाग २, कर्मभोग भाग २, कर्मभोग भाग २-

मिलिंद जोशी, नाशिक..

कर्मभोग भाग १

Leave a comment