कर्मभोग भाग १० –
प्रियाचे वडील भिक्षुकी करीत असल्यामुळे लोकं त्यांना गुरु नावाने ओळखत होते. एरवी दुपारी १२ वाजेपर्यंत घरी येणारे गुरु आज मात्र चार साडेचार वाजले तरीही घरी परतले नव्हते. आता दोघीही काळजीत पडल्या होत्या आणि दारावरील बेल वाजली. प्रियाने दार उघडले तेव्हा गुरु दारात हजर होते. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचे चैतन्य दिसत होते.(कर्मभोग भाग १०)
“हे काय बाबा… किती उशीर? किती काळजीत पडलो होतो आम्ही?” प्रियाने दारातून बाजूला होत तोंडाचा पट्टा चालू केला.
“प्रिया… अगं जरा आत तर येऊ दे मला…! आणि हो… आधी पाणी आण माझ्यासाठी. आज खूप पायपीट केली आहे मी.” आल्या आल्या पलंगावर बसत त्यांनी प्रियाला पाणी आणायला सांगितले. तिने पाणी आणताच त्यांनी आधी कोरडा पडलेला घसा ओला केला आणि बोलायला सुरुवात केली.
“प्रिया… तू म्हणाली होतीस ना काल, तुझ्या त्या नव्या ताईला मदत करता येईल का म्हणून. आज त्यासाठीच मी एका ठिकाणी गेलो होतो. आपण तिला नक्कीच मदत करू शकू असे वाटते. पण त्याला थोडा वेळ लागेल. पण मला स्वतःला त्यासाठी तिथे जावे लागेल. पण त्या आधी एकदा रविला भेटावेसे वाटते आहे मला.” एका दमात त्यांनी सगळे सांगितले आणि प्रियाला आनंद झाला.
दुसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेत गुरु राजूर पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले.
“मला इथल्या साहेबांना भेटायचे आहे. रवी जहागीरदार केसच्या संदर्भात. मी रवीचा सासरा आहे.” तिथे असलेल्या हवालदाराला त्यांनी सांगितले.
“दोन मिनिट थांबा..” सांगत हावलदार बोराडे साहेबांच्या केबिनमध्ये आला.
“साहेब…! कालच्या रवी जहागीरदार केसच्या संदर्भात त्याच्या बायकोचे वडील तुम्हाला भेटायचे म्हणत आहेत.”
“ठीक आहे…! पाठव त्यांना आत.”
थोड्या वेळात गुरु बोराडे साहेबांच्या समोर हजर होते.
“बोला…! काय मदत करू शकतो मी आपली?” गुरूंकडे पहात बोराडे साहेबांनी विचारले.
“एका मुलाचा बाप म्हणून मी आपल्याला काही माहिती विचारू शकतो का?” गुरूंनी अगदी नम्रतेने त्यांना विचारले.
“हो…! विचारा…” काहीसे विचार करत त्यांनी उत्तर दिले.
“काल माझ्या मुलीने मला सगळे सांगितले. त्याने म्हणे तुमच्या देखत तिच्यावर हल्ला केला? समजा उद्या तो जर या प्रकरणातून सुटला, आणि माझी मुलगी परत त्याच्या बरोबर राहू लागली तर पुढे रागाच्या भरात त्याच्याकडून माझ्या मुलीला काही धोका होऊ शकतो का? हे मी एक बाप म्हणून विचारतो आहे साहेब. म्हणजे त्यानुसार आम्ही आमच्या मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू शकतो.” गुरूंच्या स्वरात आपल्या मुलीविषयी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती.
“असं कुणाबद्दल ठामपणे काहीच सांगता येत नाही काका… पण एक सांगू? मला नाही वाटत तो आता सहजासहजी सुटेल. त्याचा आजन्म कारावास टळणे कठीण आहे. आताच रिपोर्ट आले आहेत. त्याने प्रत्यक्ष दोन खून केलेले स्पष्ट होते आहे. जप्त केलेल्या शस्त्रावर त्याच्याच बोटांचे ठसे आहेत, त्याच्या कपड्यांवर मयतांचे रक्तही मिळाले आहे. तीन पैकी एक जण हा हृदय विकाराच्या झटक्याने गेला असे असले तरी त्याच्या मृत्यूला अप्रत्यक्षपणे या इसमाने केलेल्या दोन हत्याच कारणीभूत आहेत असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच त्याच्या सामानात पाच लाखाचा चेक सापडला आहे ज्याचा उल्लेख तुमच्या मुलीने केला होता. म्हणजे हा सुद्धा परिस्थितीजन्य पुरावा होऊ शकतो. बरे त्याने आणि मयत इसमांनी हॉटेलचे केलेले बुकिंगही एकाच फोन वरून आणि एकाच वेळी केले असल्यामुळे ‘त्यांच्यात अनैतिक कारणांवरून बाचाबाची झाली’ या तुमच्या मुलीच्या, आम्ही रेकॉर्ड करून घेतलेल्या स्टेटमेंटलाही बळकटी मिळते आहे. पुन्हा त्याने केलेला खोलीत भुत असल्याचा बनाव, आमच्या देखत तुमच्या मुलीवर केलेला हल्ला, त्याच्या शेजारांनी त्याच्याबद्दल दिलेली माहिती हे सगळेच त्याच्या विरुद्ध जाते आहे. त्यामुळेच तो यातून सहीसलामत सुटणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे.” बोराडेंनी एका दमात सगळे सांगून टाकले.
“मी एकदा भेटू शकतो रवीला? तो माझ्या मुलीशी असा का वागला याचा त्याला जाब विचारायचा आहे. तुम्हाला सांगतो साहेब, आम्ही प्रियाला आधीच समजावण्याचा प्रयत्न केला होता. याच्याशी लग्न करू नकोस म्हणून. पण तिने याच्यावरील प्रेमापायी याच्याशी लग्न केले. आम्ही तिच्या प्रेमापायी त्यांच्या लग्नाला होकारही दिला. त्यावेळेस जर तिने आमचे ऐकले असते तर आज ही वेळ आलीच नसती.” हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळून गेले.
“शांत व्हा काका. सॉरी पण तुम्ही त्याला न भेटणेच चांगले. एकदम विचित्र माणूस आहे तो. तुम्ही शांतपणे घरी जा आणि तुमच्या मुलीला सांभाळा.” त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास देत बोराडेंनी त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. अगदी मलूल चेहऱ्याने गुरु उठले.
“आणि हो… माणुसकी म्हणून तुम्हाला एक सल्ला द्यावासा वाटतो… तुमच्या मुलीला याच्यापासून जितके बाजूला ठेवता येईल तितके ठेवा…” बोराडेंनी सल्ला दिला.
त्यांच्या बोलण्याला मानेनेच होकार देत गुरु केबिनमधून बाहेर पडले.
प्रियासोबत घडलेल्या घटनेला जवळपास महिना झाला होता. या कालावधीत दोन वेळेस तिला राजूर पोलीस स्टेशनला जवाब नोंदवण्यासाठी जावे लागले होते, पण या काळात तिला एकदाही रवीला भेटावेसे वाटले नाही. तिने त्याला आपल्या जीवनातून केंव्हाच हद्दपार केले होते. रेवाने जितकी माहिती सांगितली होती त्यावरून शोध काढत ती पुण्याला रेवाच्या कॉलेजलाही जाऊन आली होती. रेवाने सांगितलेल्या इतर दोघांबद्दल तर तिला काहीच माहिती नसल्यामुळे त्यांचा तपास करणे तिला शक्यच नव्हते, पण या वेळात तिने संदीपचा पत्ता बरोबर मिळवला होता आणि आता ती रेवा त्या बंदिवासातून कधी मुक्त होते याचीच वाट पहात होती.
क्रमशःकर्मभोग भाग १०,कर्मभोग भाग १०,कर्मभोग भाग १०.
मिलिंद जोशी, नाशिक…