कर्मभोग भाग ९ –
मनाली, संदीपची बायको घरी आली त्यावेळेस घराचा अगदी अवतार झालेला होता. संदीपने दार उघडले आणि अस्ताव्यस्त पडलेल्या दारूच्या बाटल्या पाहून ती भडकली. “काहो… मी एक दिवस तुमच्या पासून दूर काय गेले… तुम्ही अगदी घराचा बार बनवला?” सगळ्या पसरलेल्या बाटल्या एकत्रित करत ती म्हणाली. एरवी तिच्या अशा बोलण्यावर संदीप भडकला असता किंवा मग अगदी लाडीगोडीत तरी आला असता, पण आज तसे काहीच घडले नाही याचे तिला काहीसे आश्चर्य वाटले.(कर्मभोग भाग ९)
“तरी बरं मी सोनुला आजीकडे ठेवून आले. तिने हे सगळे पाहिले असते तर मी तिला पसारा घालू नको असे कोणत्या तोंडाने बोलू शकले असते?” एकीकडे तिची बडबड आणि एकीकडे तिचे आवरणे चालूच होते. इतके बोलूनही संदीप आज इतका शांत कसा म्हणून तिने त्याच्याकडे पाहिले.
“ओ… बोला ना काहीतरी… असे गप्प का? काय झाले ते तर सांगा…” तिने विचारले आणि संदीप तिच्या खांद्यावर डोके टेकवत ओक्साबोक्सी रडू लागला. संदीपचे हे रुप तिने या आधी कधीही पाहिले नव्हते. तो चिडत होता, संतापत होता, आपल्या शब्दांनी इतरांना दुखावून त्यांना रडायलाही लावत होता पण तिने कधी त्याच्या डोळ्यात अश्रूंचा थेंबही पाहिला नव्हता. आता मात्र तिच्या मनात धस्स झाले.
“ओ… अहो बोला ना काहीतरी… काय झालेय? असे रडताय का? व्यवसायात मोठा तोटा झाला का? की आपल्या नातेवाईकांचा कुणाचा काही वाईट निरोप आला? काय झालेय ते तर सांगा आधी…” ती अगदी घाबऱ्या आणि काळजीच्या स्वरात एकावर एक प्रश्न करू लागली.
“ती… ती परत आलीये…” स्वतःवर काहीसे नियंत्रण मिळवत संदीप बोलला.
“ती? कोण ती? आणि परत आलीये म्हणजे?” मनालीला संदीप काय बोलतोय याचा काहीच उलगडा होईना.
“ती… रेवा… रेवा परत आलीये…” त्याने अडखळत सांगितले.
“रेवा? कोण ही बया? तुमचं काही लग्नाआधी लफडं होतं की काय?” त्याला आपल्यापासून बाजूला करत तिने विचारले. काय बोलावे हे आधी संदीपला सुचेना पण लगेचच त्याने स्वतःला सावरले.
“अगं… नाही गं… मी आतापर्यंत तुझ्याशिवाय कोणत्याही स्त्रीकडे पाहिलेही नाहीये. रेवा आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो. त्यावेळेस मी तिला आवडायचो. तिने ते मला बोलूनही दाखवले होते. पण मी तिला स्पष्ट नकार दिला आणि तिने नंतर ते कॉलेज सोडले. त्यानंतर तिचे काय झाले हे मला माहिती नाही पण काल ती इथे आली होती आणि आता मी तुला घेवून जाणार हे सांगून गेली आहे.” संदीपने पूर्ण थाप मारली.
“अहो… मग त्यात रडण्यासारखं काय आहे? आपण पोलिसात जाऊ. माझ्या भावाच्या बऱ्याच ओळखी आहेत.” त्याचे सांत्वन करत ती म्हणाली.
“मनू… त्याने काही फायदा होणार नाही गं. तिने मध्यंतरी आत्महत्या केली आणि आता ती मला घेवून जाणार असे म्हणते आहे. ती जिवंत नाहीये… ते भूत आहे भूत.” आणि परत एकदा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. एरवी तिला कुणी असे सांगितले असते तर तिचा यावर बिलकुल विश्वास बसला नसता. अगदी संदीपने सांगितले असते तरी पण संदीपची ती स्थिती पाहून त्यातील गांभीर्य तिला जाणवले.
“अरे देवा…” म्हणत ती खाली बसली. क्षणभर तिचे विचारच खुंटले. तिच्या मनात सगळ्यात पहिला विचार मुलीचा आला आणि ती जास्तच हळवी बनली.
“अहो… पाहिजे तर मी तिच्यापुढे पदर पसरते. तिच्याकडूनच माझ्या सौभाग्याचं दान मागते…” तिच्याही डोळ्यात अश्रू होते.
“नाही गं त्याचाही काही उपयोग होईल असे वाटत नाही. ती मला सांगून गेली आहे. ती तुला भेटून माझ्याविषयी खोटंनाटं सांगणार आहे. म्हणजे तुही मला सोडून देशील…” त्याने परत दुसरीही थाप मारली.
“नाही हो नाही… तीच काय पण अगदी ब्रम्हदेव जरी आला आणि त्याने मला तुमच्याबद्दल काही विचित्र सांगितलं तर मी त्यावरही विश्वास ठेवणार नाही.” ती त्याला जवळ घेत म्हणाली आणि त्याही स्थितीत त्याला जरा हायसे वाटले.
“मला माहिती आहे मनू… तू मला नेहमीच साथ देशील…”
“आता ऊठा… देवावर पूर्ण विश्वास ठेवा. तो कधीच असत्याची बाजू घेणार नाही… आधी खोली आवरू…” असे म्हणत ती उठली आणि डोळे पुसून परत खोली व्यवस्थित करायला लागली.
दुपारी संदीप ऑफिसला गेला होता. मनालीचंही काम चालू होतं आणि दारावरील बेल वाजली. मानलीनं दार उघडलं. दारात एक २५/२६ वर्षाची मुलगी उभी होती. सलवार कमीज घातलेली आणि हसतमुख चेहऱ्याची.
“कोण पाहिजे?” मनालीने विचारले.
“आत येऊन बोलू का?” तिच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळत त्या मुलीने प्रतिप्रश्न केला.
“हो… ये ना… पण मी ओळखलं नाही…” तिला आत घेत मनाली म्हणाली.
“माझ्याबद्दल तुम्हाला तुमच्या नवऱ्याने सांगितलेच असेल ना?” ती मुलगी हसत म्हणाली.
“माझ्या नवऱ्याने? तुमच्या बद्दल?” मनाली हे म्हणताच मनात विचार करू लागली आणि सकाळचा प्रसंग तिला आठवला. म्हणजे ही रेवा तर नाही? आणि ही इथे आपल्याला काय सांगायला आली आहे? एकामागून एक विचार तिच्या मनात येत होते आणि ती रेवाचे बारकाईने निरीक्षण करू लागली. एका क्षणाला तर तिच्या मनात हाही विचार आला की अशा सुंदर मुलीचे प्रेम धुडकावून लावणारा आपला नवरा म्हणजे अगदीच बावळट आहे. पण नंतर आपल्या समोर उभी असलेली मुलगी जिवंत नसून एक भूत आहे हा विचार आला आणि ती काही पावले मागे सरकली.
“तू… तू रेवाचं ना?” तिथे काहीसे घाबरत प्रश्न केला.
“हो… मी रेवाचं… तुझा नवरा माझ्याबद्दलच तुला सकाळी सांगत होता. त्याने माझ्याबद्दल काय सांगितले हेही मला माहिती आहे आणि त्यावर तू त्याला काय म्हणाली हेही मला समजले आहे. पण फक्त एकदा शेवटचे तुला समजावून सांगावे असे मला कुणी सांगितले आणि तिच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून मी तुला इथे समजावयाला आले आहे.” रेवाला खरं तर मनालीचा निर्णय आधीच माहित होता पण तिने प्रियाला शब्द दिल्यामुळे ती फक्त आपला शब्द पाळण्यासाठी इथे आली होती.
“रेवा… माझ्या नवऱ्याचा नाद आता तरी सोड गं… मी तुझ्यापुढे पदर पसरते. त्याच्या आयुष्याची भिक मागते. त्याला नेऊ नकोस गं. त्याच्या नंतर आमचं, आमच्या मुलीचं काय होईल हाही विचार कर गं जरा…” तिने अगदी रेवापुढे पदरच पसरला.
“मनाली… त्याने जे केलं आहे त्याला आता क्षमा नाही… खरंच मला तुझ्याबद्दल वाईट वाटत आहे पण माझा निर्णय मी कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. आधी त्याच्या त्या दोन मित्रांना मी घेऊन जाणार आणि मग तुझ्या नवऱ्याला.” कठोरपणे म्हणत ती मागे वळली आणि दाराकडे चालू लागली. तिच्या निर्णयाचा मनालीला चांगलाच राग आला. तिने आपले डोळे पुसले आणि ती धावत जाऊन रेवाच्या समोर उभी राहिली.
“रेवा… मी असे होऊ देणार नाही. त्यासाठी तुला आधी मला संपवावे लागेल आणि नंतरच तू ह्यांच्यापर्यंत पोहचू शकशील. त्यांच्यात आणि तुझ्यात आता मी उभी आहे. आणि माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तो कधीच असत्याला साथ देणार नाही.” तिच्या शब्दात आता कठोरपणासोबतच आत्मविश्वासही जाणवत होता. तिच्या त्या बोलण्याचे रेवाला कौतुक वाटले. तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरले.
“ओके… ऑल दी बेस्ट…” असे म्हणत ती दिसेनाशी झाली आणि मनालीने धावतच देवघर गाठले.
“देवा… माझी लाज आता सर्वस्वी तुझ्या हातात आहे. माझा सामना आता अशा शक्तीशी आहे जिथे माझे रक्षण तुझ्याशिवाय कुणीच करू शकणार नाही… मला मदत कर…” मनालीने देवापुढे हात जोडून देवाचा मनातून धावा सुरु केला. थोड्याच वेळात तिला आठवण झाली. दोन तीन दिवसांपूर्वीच शेजारच्या बाईने तिला स्वामी आदिनाथ यांच्याबद्दल सांगितले होते आणि ते सध्या आठ दिवस आपल्या साताऱ्यात उतरले आहेत असेही सांगितले होते. त्याची तिला आठवण झाली आणि तिच्यापुढे एक आशेचा किरण दिसला. अशा वाईट शक्तीशी सामना करायचा तर कुणीतरी तितकाच पोहोचलेला साधू / संतच करू शकेल हेही ती जाणून होती. तिने देवाला परत एकदा मनोभावे नमस्कार केला आणि ती उठली. सगळे भरभर आवरले आणि स्वामींच्या दर्शनाला निघाली.
मनाली आश्रमात पोहोचली त्यावेळेस स्वामीजी ध्यान लावून बसलेले होते. अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी आलेले होते. आपण कधी एकदा स्वामीजींना भेटतो आणि त्यांच्याकडून अभय मिळवतो असे तिला झाले होते. काही वेळातच स्वामीजी समाधीतून बाहेर आले आणि लोकांनी दर्शन घ्यायला सुरुवात केली. काही वेळातच मनालीचाही नंबर आला आणि तिने पुढे होऊन स्वामींचे पाय धरले.
“आयुष्यमान भवं…” स्वामींनी आशिर्वाद दिला. पण मनालीने पाय सोडले नाहीत.
“मुली… उठं…” स्वामींचा धीरगंभीर आवाज आला.
“स्वामी… मला जो पर्यंत तुम्ही सौभाग्याचा आशिर्वाद देत नाहीत तो पर्यंत मी आपले पाय सोडणार नाही…” मनाली त्यांचे पाय न सोडताच म्हणाली.
“मुली… असे मागून घेतलेले आशिर्वाद बऱ्याच वेळेस घातक ठरतात…” त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.
“स्वामी… मला फक्त हाच आशिर्वाद हवा आहे…” तिने अगदी रडवेल्या स्वरात म्हटले आणि शेवटी स्वामींनी नाईलाजाने तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला सौभाग्यवती भवं हा आशिर्वाद दिला. तिच्या डोक्यावर हात ठेवताच तिच्यावर कोणते संकट आले आहे याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी पटकन आपला हात तिच्या डोक्यावरून काढून घेतला.
“मुली… तू मला खूप मोठ्या धर्मसंकटात टाकले आहेस…” त्यांनी मनालीकडे पाहत म्हटले आणि बाकी इतर कुणालाही दर्शन न देता त्यांनी मंदिराचा मार्ग धरला. पण मनाली आता निर्धास्त झाली होती. तिला स्वामींचे अभय मिळाले होते आणि आता ती खरंच रेवा आणि संदीपच्या मध्ये उभी होती. संदीपची ढाल बनून…
क्रमशःकर्मभोग भाग ९,कर्मभोग भाग ९,कर्मभोग भाग ९.
मिलिंद जोशी, नाशिक…