कर्मभोग भाग ८ –
“ताई… मला खात्री होतीच… बाबा तुला नक्की सोडवतील…” रेवाला पाहताच काहीशी धावतच प्रिया रेवाच्या दिशेने धावली आणि अगदी लहान मुलं जशी आपल्या आईवडिलांना बिलगतात तशी तिने तिला मिठी मारली. रेवाच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते. तसं पाहिलं तर रेवाची आणि प्रियाची भेट तरी काय, अगदीच अल्पावधीची. जास्तीत जास्त एखाद्या तासाची. त्यातही जवळपास अर्धातास प्रिया तोंड फिरवूनच होती. म्हणजे अर्ध्या तासापेक्षाही कमी. पण त्या अर्ध्या तासाने दोघींनाही एक जवळची मैत्रीण मिळवून दिली होती. काही क्षणच असे असतात जे माणसाला जन्माची नाती देवून जातात.(कर्मभोग भाग ८)
“ताई… तुझीच वाट पहात होते मी. तुझ्या त्या संदीप बद्दल बरीचशी माहिती मी या काळात मिळवली आहे. सध्या त्याने पुणं सोडलं आहे. आता तो साताऱ्याला असतो. त्याचा पत्ताही मी मिळवला आहे. त्याचं लग्न झालं आहे. त्याला एक मुलगी आहे. त्याची बायको चांगल्या स्वभावाची आहे. तिलाही मी भेटले आहे. अर्थात मी तिच्या नवऱ्याबद्दल एक अवाक्षरही काढले नाही. पण त्या संदीपमध्ये फारसा बदल झालेला नाही. तुझ्या नंतरही दोन तीन मुलींना त्याने असेच फसवले असे मला काही ठिकाणाहून समजले.” आनंदाचा भर ओसरल्यावर प्रिया अगदी न थांबता बोलत होती आणि रेवा तिच्याकडे कौतुकाने बघत होती.
“झालं बोलून?” रेवाने काहीसे हसत तिला विचारले.
“अं… हो… बाकीचं जसं आठवेल तसं सांगेन.” आपण आता अगदी लहान मुलासारखे वागलो हे प्रियाच्या लक्षात येऊन तिलाही हसू आले.
“प्रिया… जी माहिती तू मिळवली आहेस त्यावरून मी घेतलेल्या निर्णयाशी तुही तितकीच सहमत आहेस असे दिसते. पण एक सांगू… अगं माझे फक्त तिथून सुटणे महत्वाचे होते. बाकी सगळी माहिती मी काही मिनिटातच मिळवू शकते. माणसाला शरीर नसण्याचे जसे काही तोटे आहेत तसे काही फायदेही आहेत. आणि हो… तुला तुझे मत सांगण्याचाही पूर्ण हक्क आहे. जे काही मनात असेल तर बेधडक बोलून टाक…”
“ताई… मला एक सांगायचे होते… सांगू?” जरासे चाचरतच प्रियाने विचारले.
“हो… सांग ना… जरूर सांग…”
“ताई… अगं त्या संदीपची बायको… स्वभावाने खूप चांगली आहे गं. संसारातही खूप सुखी आहे. तिची मुलगीही अगदी गोड आहे. आपण संदीपचा बदला घेतला तर तो पर्यायाने त्याच्या बायको आणि मुलीवर अन्याय नाही का होणार?”
यावर रेवाला काय बोलावे हेच सुचेना. अर्थात तिने हा विचारच कधी केला नव्हता. संदीपला माफ करणे तर शक्यच नव्हते. कारण तोच तिच्या या स्थितीला कारण होता. बरे त्यात काहीच बदल झालेला नाही असेही प्रिया सांगत होती.
“प्रिया… तू म्हणते ते जरी खरे असले तरी त्याला तसे सोडणे मला योग्य वाटत नाही. तरी आपण त्याबद्दल नंतर विचार करू… तू आता झोप.” असे म्हणत रेवा जशी आली होती तशी गायबही झाली. प्रियाने बेडवर अंग टाकले पण तिच्या समोर फक्त संदीपच्या बायकोचा आणि त्याच्या गोड मुलीचा चेहरा येत होता. विचार करता करता तिला कधी झोप लागली हे तिला समजलेही नाही.
आज संदीप घरी एकटाच होता. त्याची बायको आणि मुलगी पुण्याला गेले होते. बायको घरी नाही म्हटल्यावर त्याला रान मोकळे झाले होते. त्याने घरी ओल्या पार्टीचा बेत आखला होता. त्याचे मित्रही त्यासाठी हजर झाले होते. बराच वेळ दारू ढोसल्यावर त्यांनी पार्टी आवरती घेतली. संपूर्ण खोलीत दारूचा वास पसरला होता. रिकाम्या झालेल्या बाटल्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. दारूने त्याच्यावर पूर्णपणे अमल बसवला होता. अर्थात त्याच्या मते तो पूर्ण शुद्धीत होता. पार्टी संपून आणि सगळ्यांना आपापल्या घरी जावून १५/२० मिनिटे झाली होती. इतक्यात दारावर टकटक झाली. नक्कीच कुणाचे काहीतरी राहिले असेल म्हणून तो दार उघडण्यासाठी धडपडत उठला.
“च्यायला… लोकं फुकटची मिळाली की भरमसाठ ढोसतात आणि मग आपल्या वस्तू तिथेच विसरतात…” त्याने स्वतःशीच म्हटले.
“कोण आहे?” त्याने विचारले. पण बाहेरून काहीच उत्तर आले नाही. बहुतेक आपलाच मित्र असावा कुणीतरी म्हणून त्याने दार उघडले. त्याच्याकडे पाठ करून एक स्त्री दारात उभी होती. बहुतेक ती आपल्या मागे कुणी नाहीना किंवा आपल्याला कुणी पहात तर नाही ना याचा अंदाज घेत असावी.
“ओ… बोला म्याडम… कोण पाहिजे तुम्हाला?” त्याने दारातूनच विचारले…
“तूच…” त्या स्त्रीने आपली मान वळवली आणि संदीप चार फुट मागे सरकला.
“तू… तू तर मेली होतीस ना? इथे कशी आली?” रेवाला पाहून त्याची नशा एका झटक्यात उतरली.
“का? घाबरलास? त्या वेळेस घाबरून पळाला होता तसा?” रेवा आत येत म्हणाली.
“नाही… शक्य नाही…” त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
“काय शक्य नाही? आणि का शक्य नाही? मी मेले नाही… मी जिवंतच आहे. त्यावेळेस मी फक्त जखमी झाले होते आणि तू तुझ्या त्या हलकट मित्रांबरोबर मी जिवंत आहे की मेले याची खात्री न करताच भ्याडासारखा पळालास.” रेवाच्या स्वरात कडवटपणा पूर्ण जाणवत होता.
“पण तू का आलीस इथे?” त्याच्या चेहऱ्यावर आता भीती स्पष्ट दिसत होती. कपाळावर घाम आला होता. त्याचे सारखे सारखे डोळे चोळणे त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसल्याचे सूचित करत होते.
“का म्हणून काय विचारतोस वेड्या… तुझी बायको नाही का मी? बायको नवऱ्याकडे नाही तर कुणाकडे जाणार?” रेवा अगदी शांतपणे बोलत होती पण तिच्या शब्दाशब्दात त्याला विखार जाणवत होता.
“नाही… तू माझी बायको नाहीस… तू जा इथून…” तो तिच्याशी बोलत होता पण तिच्या जवळ जाण्याची त्याची हिम्मत होत नव्हती.
“अरे… आपण देवाच्या साक्षीने लग्न नाही का केले… भंडारदऱ्याला… त्या अमृतेश्वर मंदिरात? तुला आठवत नसेल तर मी करून देते ना आठवण…” ती त्याच्या जवळ जात म्हणाली. तसा तो अजून मागे सरकला. काय बोलावे हेच त्याला सुचेना.
“आता मी परत आले आहे. तुझ्या सोबतच राहायला.” ती आणखी जवळ जात म्हणाली.
“पण.. पण माझं लग्न झालं आहे. माझी बायको आणि मुलगी इथे राहतात.” तो अडखळत म्हणाला.
“ठीक आहे मग… त्यांना राहू दे इथे… तू माझ्या बरोबर चल… मस्त धरतीवरील स्वर्गात राहू… फक्त तू आणि मी… बाकी कुणीच नाही.” झटक्यात पुढे होत तिने त्याचा दंड पकडला. तिच्या हाताच्या स्पर्श त्याला बर्फासारखा थंडगार लागला. तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत तो मागे सरकला आणि जमिनीवर पडलेल्या दारूच्या रिकाम्या बाटलीवर पाय पडून त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर दाणकन आदळला.
“नाही… नाही तू जिवंत नाहीस… तू मेलेली आहेस… तू भूत आहेस… भूत…” एका हाताने आपले डोके पकडत तो उद्गारला.
“हाहाहा… असं काय करतोस वेड्या? भूत कधी असतात का? घाबरू नकोस… माझा हात धर… ऊठ बरं…” तिने आपला हात त्याच्या पुढे केला. पण तिचा हात पकडण्याचे त्याला धारिष्ट्य होईना. तो हात धरणार नाही हे तिला चांगलेच माहिती होते. म्हणून मग ती जरा मागे सरकली.
“ऊठ पटकन… आपल्याकडे वेळ नाहीये… मी तुला घेवून जाण्यासाठीच आले आहे.” हे म्हणताना तिचा चेहरा बदलू लागला. तो अधिकाधिक भेसूर होऊ लागला. डोळ्यातील बुबुळे गायब झाली. तिथे आता फक्त मोकळी जागा दिसू लागली, दातांचे सुळे एक इंचापर्यंत वाढले, त्वचा पूर्ण विरघळून गेली. फक्त कवटीच्या नाकाचे हाडं त्या जागी तरंगताना दिसू लागले. हे सगळे पाहताना त्याची पाचावर धारण बसली.
“मला माफ कर… मला क्षमा कर… खरंच मी खूप वाईट वागलो. मी चुकलो… दया कर…” तो आता तीच्यापुढे दयेची याचना करू लागला.
“तुम्ही लोकांनी केली होती का माझ्यावर दया? चल आता…” रेवाचा घोगरा आवाज खोलीत घुमला. तिचा हात त्याच्या जवळ जावू लागला आणि घाबरून संदीपची शुद्ध हरपली.
तो जेव्हा शुद्धीवर आला तेव्हा रेवा तिच्या सौम्य रुपात तिथेच बसलेली होती.
“संदीप… आता कसं वाटतंय?” तिने त्याच्याकडे पहात विचारले आणि संदीपने मोठ्याने टाहो फोडला. रेवा तिथेच बसून मोठमोठ्याने हसत होती. थोड्या वेळात ती उठली.
“संदीप… आता तुझ्या बायकोलाही एकदा भेटून घेते… आणि हो तुझे ते हलकट मित्र… त्यांनाही भेटायचे राहिलेच आहे की. आधी त्यांना आपल्यासाठी खोली बुक करायला पाठवते आणि मग तुला घ्यायला येते… तो पर्यत तू निवांत रहा… अशी पार्टी कर… मित्रांशी भेटून घे. आणि हो… जी काही इस्टेट तुझ्या नावावर असेल आधीच बायकोच्या, मुलीच्या नावावर करून ठेव हो… मी जाते आता… येत जाईन तुला भेटायला… रोज… न चुकता… काय आहे ना… मला तरी कोण आहे रे तुझ्याशिवाय? तुझ्याशिवाय इतके दिवस मी कसे काढले हे माझे मलाच माहित… तू आता आराम कर हं…” इतके बोलून अट्टाहास करत ती दिसेनासी झाली.
संदीप मोठमोठ्याने रडतच होता. त्याची नशा कधीच उतरली होती. ज्याच्यामुळे अनेक मुलींना रडण्याची वेळ आली होती तोच आज मोठमोठ्याने रडत होता आणि त्याच्या जवळ हे ऐकण्यासाठी कुणीही नव्हते.. रेवाही नाही.
क्रमशःकर्मभोग भाग ८,कर्मभोग भाग ८,कर्मभोग भाग ८.
मिलिंद जोशी, नाशिक…