कर्मभोग भाग ७

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग ७ –

प्रियासोबत घडलेल्या घटनेला जवळपास महिना झाला होता. या कालावधीत दोन वेळेस तिला राजूर पोलीस स्टेशनला जवाब नोंदवण्यासाठी जावे लागले होते, पण या काळात तिला एकदाही रवीला भेटावेसे वाटले नाही. त्याला तिने आपल्या जीवनातून केंव्हाच हद्दपार केले होते. रेवाने जितकी माहिती सांगितली होती त्यावरून शोध काढत ती पुण्याला रेवाच्या कॉलेजलाही जाऊन आली होती. रेवाने सांगितलेल्या इतर दोघांबद्दल तर तिला काहीच माहिती नसल्यामुळे त्यांचा तपास करणे तिला शक्यच नव्हते, पण या वेळात तिने संदीपचा पत्ता बरोबर मिळवला होता आणि आता ती रेवा त्या बंदिवासातून कधी मुक्त होते याचीच वाट पहात होती.(कर्मभोग भाग ७)

गुरूंनीही या वेळात आपले तपोबल वाढवले होते, आणि त्यांचे फक्त एकच लक्ष होते, रेवाची मदत. आज ते प्रिया जिथे उतरली होती त्या रिसोर्ट मध्ये येवून पोहोचले.

“मला एक एकांत रूम हवी आहे. शक्यतो जिथे कुणाचा जास्त वावर नसेल अशी… लेखन करण्यासाठी…” त्यांनी रिसेप्शनवर बसलेल्या माणसाला सांगितले.

“सॉरी सर. पण सगळ्या रूम बुक आहेत. तुम्ही आधी बुक केली असती तर बरे झाले असते.” नम्रपणे आपली असमर्थता व्यक्त करत रिसेप्शन वरील व्यक्ती म्हणाली.

“साहेब… ती आपली शेवटची रूम आहे ना…” तिथे नवीनच आलेला वेटर पटकन बोलून गेला.

“अरे वा… छान… माझी आज रात्रीसाठी जरी सोय झाली तरी चालेल. काय आहे ना… माझ्या ओळखीचे एक गृहस्थ याबद्दल बोलले होते म्हणून मी इथेच आलो. खरंच त्यांनी जे काही तुमच्या रिसोर्टचे वर्णन केले होते त्यापेक्षाही ही जागा खूप छान आहे.” शक्यतो जितकी स्तुती करता येईल तितकी स्तुती करत गुरु म्हणाले.

“पण सर… ती रूम… खूप दिवसांपासून बंद आहे. नीटशी स्वच्छताही नाहीये तिथे…” त्यांना टाळण्यासाठी त्या माणसाने सांगितले.

“अहो… चालेल की… मी एकटाच तर आहे. आणि त्यातून मी लेखनासाठी बैठक मारली की कित्येक तास उठतही नाही… मला चालेल ती रूम… बोला… याचा अडव्हांस किती द्यायचा?” असं म्हणत त्यांनी आपल्या खिशात हात घालून पैशाचे बंडल बाहेर काढले. आता चालत आलेली लक्ष्मी नाकारणे त्या माणसालाही जीवावर आले. त्याने गुरूंकडून पैसे घेत तिथे काम करणाऱ्या एका मुलाला हाक मारली.

“मुन्ना… ती शेवटची रूम उघडून साफ करून ठेव… बोला… साहेब कोणत्या नावाने पावती करू?” मुन्नाला सांगून झाल्यावर त्याने गुरूंकडे मोर्चा वळवला.

“माझे नांव सदानंद कुलकर्णी, राहणार नाशिक, फोन, ………….. “ आपली सगळी आवश्यक ती माहिती नोंदवून ते खोलीवर येवून दाखल झाले. सगळ्यात आधी त्यांनी त्या संपूर्ण खोलीचे निरीक्षण केले. खोली जरी वर दिसायला साफ दिसत असली तरी तेथील वातावरणात एक प्रकारची उदासी ठळकपणे जाणवत होती.

दुपारी नदीवर जाऊन बराच वेळ ते तिथल्या जागेचे निरीक्षण करत होते. निसर्गाचे ते इतके सुंदर रूप मनाला आल्हाददायक वाटत होते. थोडासा दूरवर असलेला पाण्याचा खळखळाट, तेथील झाडांवरून येणारे पक्षांचे वेगवेगळे आवाज सगळेच कसे मोहित करणारे होते. काही वेळ तिथे बसून नंतर ते आपल्या रूमवर परत आले. पडवीत ठेवलेल्या खुर्चीवर आता निवांत डोळे मिटून देवाचे ध्यान करत बसले तेवढ्यात कुणाच्या तरी पावलांची त्यांना चाहूल लागली. त्यांनी डोळे उघडले. समोर रिसोर्टचा माणूस होता.

“साहेब… रात्री जेवणाला काय आणू?” त्याने विचारले.

“नाही… मी रात्री निराहार असतो… त्यामुळे काही लागणार नाही. बाकी काही असेल तर तुम्हाला सांगेन मी.”

तो माणूस ठीक आहे म्हणून परत गेला आणि गुरु परत एकदा डोळे मिटून देवाचे ध्यान करण्यात मग्न झाले.

जसा अंधार पडला आणि आपल्या खोलीकडे कुणी येणार नाही याची त्यांना खात्री झाल्यावर ते आत आले आणि दार बंद केले. एकदा गुरुदेव दत्तांचे स्मरण करून त्यांनी आवाज दिला.

“रेवा… रेवा माझ्या समोर ये… मला माहिती आहे तू इथेच आहेस. मला प्रियाने पाठवले आहे.” असे म्हटल्यावर काही वेळ शांततेत गेला आणि आता गुरूं समोर एक आकृती हळूहळू स्पष्ट होऊ लागली. आता पर्यंत असे काही असेल तर काय उपाय करायचे हे त्यांनी बऱ्याच जणांना सांगितले होते. काही ठिकाणी स्वतः जाऊन पूजा पाठ करून लोकांची अशा गोष्टींपासून मुक्तता केली होती, पण मेलेले माणूस समोर प्रकट होते हे ते पहिल्यांदाच अनुभवत होते. काही क्षणांसाठी त्यांचे मन कचरले. त्यांनी मनातल्या मनात गुरुदेवांचे नावही घेतले पण नंतर रेवाने त्यांच्या मुलीला केलेली मदत आठवली आणि त्यांनी आपल्या भीतीवर नियंत्रण मिळवले. आता रेवा पूर्णपणे त्यांच्या समोर आलेली होती. जर कुणी इतर माणसाने तिला इथे पाहिले असते तर ती जिवंत नसून मृत व्यक्ती आहे असे कुणीही म्हटले नसते.

“रेवा… प्रिया माझी मुलगी आहे आणि तिनेच मला तुझ्याबद्दल सांगितले. माझ्यासाठी जशी ती तशीच तू. जितकी माझ्याकडून शक्य असेल तितकी सगळी मदत तुला करण्याचे मी तिला वचन दिले आहे.” गुरु बोलत होते आणि रेवाच्या डोळ्यात त्यांना कृतज्ञतेचे भाव दिसले.

“काका… खरे सांगू… प्रियाच्या रूपाने मला बहिणच मिळाली. ती जर मला जिवंतपणीच मिळाली असती तर किती बरे झाले असते? असे प्रेम मला आधीच मिळाले असते तर मी स्वतःला सगळ्यात भाग्यवान समजले असते. असो. कशी आहे ती?”

“ती ठीक आहे. तिने रवीला तिच्या जीवनातून पूर्णपणे हद्दपार केले आहे. आणि रवी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांच्या मते आता तो सहीसलामत सुटणे शक्य नाही.”

“बरे झाले. अशा माणसाला अशीच शिक्षा मिळाली पाहिजे.” रेवाच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान दिसत होते.

“बरे आता मला सांग… प्रिया म्हणत होती की तू इथे बंदिस्त आहे म्हणून? कुणी तुला इथे बांधले आहे?” गुरूंनी मुद्द्यालाच हात घातला.

“मी स्वतःचा घात करून घेतल्यानंतर मी इथेच होते. कधीच कुणासमोर आले नाही. त्याची कधी मला गरजही वाटली नाही. पण काही जणांना माझे अस्तित्व जाणवत होते. त्यातच एक दिवस एक सिद्ध पुरुष इथे आले. त्यांनाही माझे अस्तित्व जाणवले आणि त्यांनी इतरांना माझ्यापासून काही त्रास होऊ नये यासाठी या जागेत मला बंदिस्त करून टाकले. त्यानंतर मी हेच आपले प्रारब्ध असावे असे म्हणून ते स्विकारले. पण त्या दिवशी प्रियावर तो प्रसंग गुदरला आणि माझे अस्तित्व थरारले. त्या नराधमांना असे सोडून देणे मला योग्य वाटत नाही आणि त्यासाठी मला आता इथून बाहेर पडायचे आहे.” रेवाने सगळे सांगून टाकले.

“मुली… मी माझ्या परीने नक्कीच प्रयत्न करेन. पण शेवटी यात यश येणे न येणे हे त्या सर्वव्यापी नियंत्यावर अवलंबून आहे.” असे म्हणून त्यांनी आपले डोळे मिटले. मनात गुरुदेवांचे स्मरण केले आणि जी काही त्यांनी माहिती मिळवली होती त्यानुसार आपली बैठक मांडून मंत्र म्हणायला सुरुवात केली. काही वेळातच रेवाला एक वेगळीच अनुभूती यायला लागली. ज्यावेळेस गुरूंनी आपले डोळे उघडले त्यावेळेस रेवा बंधनातून मुक्त झाली होती. आपण खरच बंदिवासातून मुक्त झालोय की नाही यासाठी ती खोलीच्या बाहेर पडली. नदीवर गेली, समोरच्या डोंगरमाथ्यावर जावून आली, इतकेच काय पण काही क्षणातच ती धरणावरही जावून आली होती.

“काका… काका… मी बंधनातून मुक्त झाले. आता मी कुठेही जाऊ शकते आहे. काका तुमच्या रूपाने मला आज माझे वडीलच मिळाले असे वाटते आहे. तुमचे आभार मी कोणत्या शब्दात व्यक्त करू हेच मला समजेनासे झाले आहे.” आनंदाच्या भरात ती म्हणाली.

“मुली… मलाही तुझ्यासाठी आनंद होत आहे. पण वडील या नात्याने एक सल्ला देऊ?”

“काका… मला माहिती आहे तुम्ही मला काय सांगणार आहात ते… हेच ना… की हा सूडाचा विचार मी सोडून द्यावा?”

“हो… हेच मला सांगायचे आहे. हेच मी माझ्या मुलीलाही सांगायचा प्रयत्न केला आहे. सूड हा फक्त क्षणिक समाधान देतो… पण त्याने कुणाचेच भले होत नाही.” त्यांनी रेवाला समजावण्याचा प्रयत्न केला.

“खरे आहे काका. तुम्ही म्हणतात ते मला मान्य आहे. पण अशा नराधमांना कुणीतरी अद्दल घडवली पाहिजे. प्रियाच्या वेळेस जर मी त्यांना तसे सोडले असते तर उद्या प्रियाच्या जागी अजून किती जणी त्यांच्याकडून फसवल्या गेल्या असत्या? पण मी त्यांना जन्माची अद्दल घडवली. किमान त्या पोरी तरी वाचल्या… त्यामुळे तेवढे सोडून तुम्ही काहीही सांगा काका… ते सगळे मी मान्य करेन, पण त्या नराधमांचा सूड घेतल्याशिवाय मी राहणार नाही.” हे बोलत असताना तिचा चेहरा अधिकाधिक कठोर होत होता.

“ठीक आहे मुली… तसेही यावर आताच बोलून काही फायदाही नाही. तू आणि प्रिया जो निर्णय घ्याल त्याला मी पटत नसले तरी पूर्ण सहकार्य करेन हे मात्र तितकेच खरे आहे. मी आता आराम करतो.” असे म्हणत त्यांनी बेडवर अंग टाकले.

आपल्या वडिलांना नक्कीच यश येणार आणि ते रेवाची सुटका नक्कीच करणार याबद्दल प्रियाला जणू खात्रीच होती. आणि रेवाची बंधनातून मुक्तता झाल्यावर सगळ्यात पहिले ती आपल्यालाच भेटायला येईल असेच तिचे मन तिला सांगत होते… त्यामुळे बरीच रात्र झालेली असूनही प्रियाला आज झोप येत नव्हती. ती तळमळत पडली होती. वेळ जावा यासाठी आधी तिने टीव्ही लावला, नंतर पुस्तक हातात घेतले पण कशातच तिचे लक्ष लागत नव्हते आणि तेवढ्यात तिला ओळखीचा स्वर ऐकू आला…

“प्रिया….“ प्रियाने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि हळूहळू धुरकट आकृती तिच्यासमोर स्पष्ट होऊ लागली.

क्रमशःकर्मभोग भाग ७,कर्मभोग भाग ७,कर्मभोग भाग ७.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्मभोग भाग ६

Leave a comment