कर्मभोग भाग १४

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग १४ –

“तू… तू रेवाचं ना?” तिने काहीसे घाबरत प्रश्न केला.

“हो..! मी रेवाचं… तुझा नवरा माझ्याबद्दलच तुला सकाळी सांगत होता. त्याने माझ्याबद्दल काय सांगितले हेही मला माहिती आहे आणि त्यावर तू त्याला काय म्हणाली हेही मला समजले आहे. पण फक्त एकदा शेवटचे तुला समजावून सांगावे असे मला कुणी सांगितले आणि तिच्या शब्दाचा मान ठेवायचा म्हणून मी तुला इथे समजावयाला आले आहे.” रेवाला खरं तर मनालीचा निर्णय आधीच माहित होता पण तिने प्रियाला शब्द दिल्यामुळे ती फक्त आपला शब्द पाळण्यासाठी इथे आली होती.

“रेवा… माझ्या नवऱ्याचा नाद आता तरी सोड गं… मी तुझ्यापुढे पदर पसरते. त्याच्या आयुष्याची भिक मागते. त्याला नेऊ नकोस गं. त्याच्या नंतर आमचं, आमच्या मुलीचं काय होईल हाही विचार कर गं जरा…” तिने अगदी रेवापुढे पदरच पसरला.

“मनाली, त्याने जे केलं आहे त्याला आता क्षमा नाही. खरंच मला तुझ्याबद्दल वाईट वाटत आहे पण माझा निर्णय मी कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. आधी त्याच्या त्या दोन मित्रांना मी घेऊन जाणार आणि मग तुझ्या नवऱ्याला.” कठोरपणे म्हणत ती मागे वळली आणि दाराकडे चालू लागली. तिच्या निर्णयाचा मनालीला चांगलाच राग आला. तिने आपले डोळे पुसले आणि ती धावत जाऊन रेवाच्या समोर उभी राहिली.

“रेवा..! मी असे होऊ देणार नाही. त्यासाठी तुला आधी मला संपवावे लागेल आणि नंतरच तू ह्यांच्यापर्यंत पोहचू शकशील. त्यांच्यात आणि तुझ्यात आता मी उभी आहे. आणि माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. तो कधीच असत्याला साथ देणार नाही.” तिच्या शब्दात आता कठोरपणा बरोबरच आत्मविश्वासही जाणवत होता. तिच्या त्या बोलण्याचे रेवाला कौतुक वाटले. तिच्या चेहऱ्यावर स्मित पसरले.

“ओके… ऑल दी बेस्ट…” असे म्हणत ती दिसेनाशी झाली आणि मनालीने धावतच देवघर गाठले.

“देवा… माझी लाज आता सर्वस्वी तुझ्या हातात आहे. माझा सामना आता अशा शक्तीशी आहे जिथे माझे रक्षण तुझ्याशिवाय कुणीच करू शकणार नाही. मला मदत कर.” मनालीने देवापुढे हात जोडून देवाचा मनातून धावा सुरु केला. थोड्याच वेळात तिला आठवण झाली. दोन तीन दिवसांपूर्वीच शेजारच्या बाईने तिला स्वामी आदिनाथ यांच्याबद्दल सांगितले होते. आणि ते सध्या आपल्या साताऱ्यात उतरले आहेत असेही सांगितले होते. त्याची तिला आठवण झाली आणि तिच्यापुढे एक आशेचा किरण दिसला. अशा वाईट शक्तीशी सामना करायचा तर कुणीतरी तितकाच पोहोचलेला साधू / संतच करू शकेल हेही ती जाणून होती. तिने देवाला परत एकदा मनोभावे नमस्कार केला आणि ती उठली. सगळे भरभर आवरले आणि स्वामींच्या दर्शनाला निघाली.

मनाली आश्रमात पोहोचली त्यावेळेस स्वामी ध्यान लावून बसलेले होते. अनेक भक्त त्यांच्या दर्शनासाठी आलेले होते. आपण कधी एकदा स्वामींना भेटतो आणि त्यांच्याकडून अभय मिळवतो असे तिला झाले होते. काही वेळातच स्वामीं समाधीतून बाहेर आले आणि लोकांनी दर्शन घ्यायला सुरुवात केली. काही वेळातच मनालीचाही नंबर आला आणि तिने पुढे होऊन स्वामींचे पाय धरले.

“आयुष्यमान भवं…” स्वामींनी आशिर्वाद दिला. पण मनालीने पाय सोडले नाहीत.

“मुली… उठं…” स्वामींचा धीरगंभीर आवाज आला.

“स्वामी..! मला जो पर्यंत तुम्ही सौभाग्याचा आशिर्वाद देत नाहीत तो पर्यंत मी आपले पाय सोडणार नाही…” मनाली त्यांचे पाय न सोडताच म्हणाली.

“मुली… असे मागून घेतलेले आशिर्वाद बऱ्याच वेळेस घातक ठरतात…” त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला.

“स्वामी..!! मला फक्त हाच एक आशिर्वाद हवा आहे…” तिने अगदी रडवेल्या स्वरात म्हटले आणि शेवटी स्वामींनी नाईलाजाने तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला सौभाग्यवती भवं हा आशिर्वाद दिला. तिच्या डोक्यावर हात ठेवताच तिच्यावर कोणते संकट आले आहे याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी पटकन आपला हात तिच्या डोक्यावरून काढून घेतला.

“मुली… तू मला एका खूप मोठ्या धर्मसंकटात टाकले आहेस…” त्यांनी मनालीकडे पाहत म्हटले आणि बाकी इतर कुणालाही दर्शन न देता त्यांनी मंदिराचा मार्ग धरला. पण मानली आता निर्धास्त झाली होती. तिला स्वामींकडून अभय मिळाले होते. आता ती खरंच रेवा आणि संदीपच्या मध्ये उभी होती. संदीपची ढाल बनून.

——————–

सागरच्या मोबाईलची रिंग वाजली. कुणाचा फोन आहे म्हणून त्याने आधी फोनची स्क्रीन पाहिली. संदीपचे नाव दिसतात सागरच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. त्याने लगेचच फोन रिसीव्ह केला.

“हेल्लो…”

“अबे सागऱ्या, अरे एक प्रॉब्लेम झालाय…” बऱ्याच लहान आवाजात पलीकडून संदीपचा स्वर ऐकू आला.

“च्यायला… इतक्या दिवसांनी फोन करतोयस आणि ते सुद्धा प्रॉब्लेम सांगण्यासाठी? आणि इतका हळू काय बोलतोयस?” सागरने विचारले.

“अबे… ऐक तर… ती परत आलीये…”

“ती? कोण ती?” काहीच उलगडा न झाल्याने सागरने विचारले.

“अरे ती रेवा…” संदीपने उत्तर दिले.

“रेवा? कोण रे?” सागरने गोंधळून विचारले.

“अरे भंडारदरा… आले का लक्षात?”

“च्यायला… ठिकाणावर आहेस का तू? ती कशी येईल? तुला माहिती आहे ना. ती या जगात नाहीये म्हणून?” आता सागरचा आवाज देखील लहान झाला होता.

“अरे हो रे… पण ती म्हणजे तिचं भूत आलं आहे. आपला बदला घेण्यासाठी.” अगदी हळू आवाजात संदीपने सांगितले.

“साल्या… तुला सकाळपासून कुणी भेटलं नाही का?” काहीसा उपहास करत सागर म्हणाला.

“अरे खरंच..! शप्पथ..!! ती परत आलीये…” संदीपने आपलं म्हणणं चालूच ठेवलं.

“ए… गप… आधी मला सांग… काल वहिनी गावाला गेल्या होत्या का?” सागरने प्रश्न केला.

“हो..! पण, तुला कसं कळलं?” काहीशा आश्चर्याने संदीपने विचारले.

“कसं म्हणजे? अजूनही तुझी कालची उतरलेली नाहीये..” हसत हसत सागर म्हणाला.

“तुला खोटं वाटतं ना? पण लक्षात ठेव ती मला आधी तुमचा बदला घेणार आहे असे सांगून गेली आहे…”

“ए… आता जास्त बोर नको करूस… इतरही कामं आहेत मला. तुझी उतरली की बोलू आपण… बाय…” सागर चांगलाच वैतागला आणि त्याने जास्त काही न बोलता फोन ठेवून दिला.

“संदीप अगदी खरे बोलत होता. मी परत आलेय…” रेवाचा आवाज आला. सागरने चमकून आवाजाच्या दिशेने पाहिले. चेहऱ्यावर अगदी निर्विकार भाव असलेली रेवा त्याच्या समोर उभी होती. त्याच्याकडे अगदी एकटक पहात. क्षणभर त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. रेवा त्याच्या समोर त्याच्याकडे एकटक पहातच उभी होती. जशी एखादी व्यक्ती उभी असावी तशीच. आता त्याच्या कपाळावर घामाचे बिंदू दिसायला लागले. माणूस घाबरला की त्याची बुद्धी जास्त तेज बनते त्याप्रमाणे त्याचेही झाले. आपल्या समोर रेवा नसून रेवासारखीच दिसणारी कुणीतरी असेल असे त्याला वाटले. भूत जर स्त्री असेल तर पांढऱ्या साडीतली पारदर्शक आकृती, तिच्या मागे पांढरा धूर / धुके, केस मोकळे सोडलेले अशी एक प्रतिमा उभी राहते. पण समोर उभ्या असलेल्या मुलीमध्ये त्याला असे कोणतेच गुण दिसत नव्हते. त्यामुळे ही कुणीतरी मुलगीच आपल्याला भीती दाखवायला आली असेल किंवा मग आपली चेष्टा करण्यासाठी संदिपनेच हिला पाठवले असेल असा त्याचा ग्रह झाला.

“चल… काहीतरी बोलू नकोस… आणि मी असा घाबरणाऱ्यातला माणूस नाही. बोल… काय काम आहे?” समोर भूत नसून कुणीतरी स्त्रीच उभी आहे अशी पक्की खात्री झाल्यावर तो म्हणाला.

“मुर्खा.., आता मला माझे काम करण्यासाठी तुझ्यासारख्या भेकाडांची गरज लागत नाही. थांब तुझी खात्री पटवते मी…” तिच्या स्वरात कठोरता दिसू लागली. हळूहळू तिचे रूप पालटू लागले. तिचे ते भेसूर आणि भीतीदायक रूप पाहून मात्र सागर पुरता घाबरला. त्याचे हातपाय लटलट कपू लागले. सर्वांगाला घाम सुटला आणि तो तिच्याकडे दयेची भिक मागू लागला.

“हाहाहा… अरे तू तर एका अबलेकडे भिक मागतोस? ये… येना… त्यावेळेस जे शरीर होते तेच आताही आहे… हा धर माझा हात…” तिचा घोगरा आवाज त्याच्या केबिनमध्ये घुमला आणि तिचा लांब होत आपल्या कडे येणारा हात पाहून त्याच्या छातीत कळ आली. त्याचे डोळे विस्फारले गेले. त्याचे दोन्ही हात आपल्या छातीवर गेले आणि काही क्षणातच त्याची हालचाल पूर्णपणे थांबली.

“शी… खूपच भेकड आणि कमजोर निघाला हा…” काहीसे स्वतःशीच पुटपुटत रेवा दिसेनासी झाली.

क्रमशःकर्मभोग भाग १४,कर्मभोग भाग १४.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्मभोग भाग १३

Leave a comment