कर्मभोग भाग १५

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग १५ –

सागरने संदिपचे काहीच ऐकून घेतले नाही आणि त्याचा उपहास केला याचा संदिपला पहिल्यांदा खूप राग आला. पण शेवटी काही झाले तरी तो आपला मित्र आहे आणि त्याला सावध करणे आपले कर्तव्य आहे असे समजून त्याने परत सागरचा नंबर लावला. त्याला पलिकडून रिंग वाजल्याचा आवाज येत होता पण फोन कुणीच उचलत नव्हते.

“सागर फोन उचलण्याच्या पलीकडे गेला संदिप. आता त्याला फोन करून काही उपयोग नाहीये…” रेवाचा आवाज वातवरणात घुमला. आवाजाच्या दिशेने संदिपने पाहिले. हाताची घडी घालून कोपऱ्यात रेवा उभी होती. अगदी निर्विकार चेहऱ्याने.

“तू… तू इथेही आलीस? काय केले तू सागरला?” त्याने घाबरत विचारले.

“मी? मी काहीच नाही केले. फक्त तिथे जाऊन उभी राहिले. तर त्याचा आधी स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. मग त्याचे डोळे अगदी खरे दाखवत आहेत हे मी सिद्ध करून दिले. मग मी जिवंत नाहीये यावरही त्याचा विश्वास बसेना. मग म्हटलं, हेही आपण त्याला दाखवून द्यावं. मग ते नाही कारे माझं रूप, काल तुला दाखवलं होतं ते रे..! तेच त्यालाही दाखवलं. तर तो घाबरला. शी… अगदीच कच्चा खिलाडी निघाला तो. छातीत कळ उठली त्याच्या. आणि… सुटला बिच्चारा…!!!” अगदी एखाद्याशी गप्पा माराव्यात अशा अविर्भावात ती बोलत होती. तिच्या त्या थंड वागण्याने संदिप भडकला. टेबलावर ठेवलेला पेपरवेट त्याने रेवाच्या दिशेने भिरकावला. तो रेवापर्यंत आला. त्यानंतर काही वेळ तिथेच हवेत तरंगला आणि खाली पडला.

“हाहाहा… मुर्खा… अरे मी या सगळ्याच्या पलिकडे गेले आहे… तुझ्याच कृपेने… हेही विसरलास? चल जाऊ दे, काही झाले तरी एकेकाळचा माझा प्रियकर तू..! तू धोका दिलास पण मी बिलकुल धोका देणार नाही. तुला घेवून जाईनच. पण थोडं थांबावं लागेल हं तुला त्यासाठी…” त्याच्याकडे पहात हसत हसत रेवा म्हणाली. तिच्या त्या हसण्यात क्रौर्य पूर्णपणे भरलेले होते.

“तू… तू मला का सोडत नाहीस. सांगितले ना मी… माझी चूक झाली… माझ्या बायको मुलीचा तरी विचार कर गं…” आता परत रडत रडत त्याने माफी मागायला सुरुवात केली.

“अरे वेड्या… असा रडतोस काय बायकांसारखा? त्यावेळेस मी रडले होते तर तूच नाही का मला म्हणाला होतास. रडून काही उपयोग होत नाही म्हणून? आणि तू ऑफिसमध्ये आहेस. कुणी तुझ्या केबिनमध्ये आले तर त्याला काय वाटेल? जाऊ दे. तुला नाही वाटत ना मी इथं थांबावं? मी जाते. आणि हो, तुझ्या त्या दुसऱ्या मित्रालाही भेटायचे आहे मला. त्याचीही बातमी द्यायला येईन परत. बाय..!!!” अगदी प्रेमाचे नाटक करत रेवा तिथून दिसेनासी झाली आणि संदिप डोके धरून खुर्चीवर बसला. आता तो मनातल्या मनात विचार करू लागला. सागरला तर आपण नाही वाचवू शकलो. किमान निल्याला तरी सावध करावे आणि त्याने हातात फोन घेतला. निल्याचा नंबर लावणार इतक्यात रेवा परत हजर झाली.

“अरे..! तू काय त्या तुझ्या मित्राला वाचवायचा प्रयत्न करतो आहेस? तेही माझ्यापासून? कसं शक्य आहे? तुझा फोन संपत नाही तो पर्यंत मी तिथे असेल… मग?” रेवाचा स्वर केबिनमध्ये घुमला. रेवाला तिथे पाहताच त्याने मोठ्याने हंबरडा फोडला. त्याच्या केबिनबाहेर बसलेले दोनतीन जण धावतच त्याच्या केबिनमध्ये आले. संदीप मोठमोठ्याने रडत होता. त्याच्या सहकाऱ्यांना काय झाले हे बिलकुलच समजले नाही. एक दोघांनी त्याला विचारण्याचा प्रयत्नही केला. त्याही स्थितीत त्याने आपल्या केबिनमध्ये नजर फिरवली. पण रेवा त्याला कुठेच दिसली नाही. शेवटी त्याने आपले समान आवरले आणि तो घरी जायला निघाला.

“छोटू…! साहेबांना घरी सोडून ये… अशा स्थितीत त्यांनी गाडी चालवणे योग्य नाही.” तिथेच जवळच उभ्या असलेल्या व्यवस्थापकाने त्याच्या कंपनीच्या ड्रायव्हरला ऑर्डर सोडली आणि दोघेही ऑफिसमधून बाहेर पडले.

——————-

झपझप पावले टाकत चालणाऱ्या स्वामींना मनालीनं आवाज दिला.

“स्वामीजी…” काहीतरी आठवलं म्हणून तिनं आवाज दिला होता. स्वामी चालता चालता थबकले. मनालीनं धावतच जावून त्यांना गाठलं आणि त्यांच्यापुढे हात जोडून उभी राहिली.

“बोल मुली… काय विचारायचं आहे तुला?” आपल्या धीरगंभीर स्वरात त्यांनी विचारलं.

“स्वामीजी…! तिच्यापासून माझ्या सोनुला तर काही धोका होणार नाही ना?” अगदी काळजीच्या स्वरात तिनं विचारलं.

“काळजी करू नकोस मुली… ती असे काहीही करणार नाही. तिचा राग फक्त तुझ्या नवऱ्यावर आहे.” नंतर काहीसा विचार करून त्यांनी आपल्या खांद्याला अडकवलेल्या झोळीत हात घातला. त्यातून थोडी विभूती आपल्या तळहातावर घेतली आणि डोळे मिटून मंत्र म्हटला. मंत्र पूर्ण होताच आपले डोळे उघडून त्यांनी ती विभूती मनालीच्या हातात दिली.

“ही खाक घे… सतत तुझ्या बरोबरच ठेव. जर ती तुझ्या समोर आली तर फक्त ही खाक तिच्या दिशेला फेक. ती बंदिस्त होईल. आणि काही वेळातच मी तिथे येईल… अलख निरंजन…” असे म्हणत ते मंदिराच्या दिशेने चालू लागले.

आता मात्र मनालीची भीती बरीच कमी झाली होती. एकतर तिला आयुष्यमान भवं हा आशिर्वाद मिळाला होता, नंतर सौभाग्याचा आशिर्वाद तिने मागून घेतला होता. आणि रेवाला बंदिस्त करणारे अस्त्रही यावेळेस तिच्या हातात होते. त्या आनंदातच ती घरी गेली. ती घरात येऊन थोडा वेळ होतो न होतो तोच कंपनीचा ड्रायव्हर संदिपला घेवून आला. एरवी संदिप ऑफिसमधून असा घरी येत नव्हता आणि आज तर त्याला सोडायला त्याच्या कंपनीचा ड्रायव्हरही आला होता. संदिपचे डोळेही सुजल्यासारखे वाटत होते. एकूणच त्याचा हा अवतार पाहून मनाली मनातून घाबरली.

“अहो… आज असे घरी कसे? काय झालं?” तिने काळजीच्या स्वरात विचारले.

“मला पाणी दे आधी…” धाडकन सोफ्यावर अंग टाकत तो म्हणाला. त्याच्या हातापायात त्राण असे काही उरलेच नव्हते. तिने धावत जावून त्याच्यासाठी पाणी आणले. ड्रायव्हरला ऑफिसला पाठवून दिले आणि काय झाले हे त्याला विचारले. त्यानेही तिच्यापासून काहीच लपवले नाही. रेवा कशी आली, तिने सागरला कसा संपवला आणि ती आता निलेशला मारायला जाणार आहे हेही त्याने सांगून टाकले.

“तुम्ही काही काळजी करू नका… देव आपल्या पाठीशी आहे. आता कुणी तुम्हाला काही करू शकणार नाही.” त्याला धीर देत ती म्हणाली. तेवढ्यात संदीपच्या मोबाईलची रिंग वाजली. पलिकडे निलेश होता.

“अहो, निलेश भाऊजींचा फोन आहे.” तिने फक्त त्याचे नाव घेण्याचा अवकाश, संदिपने तिच्या हातातून फोन जवळजवळ हिसकलाच.

“निल्या… असशील तसा इथे ये…”

“अरे पण?… मी कशासाठी फोन केला आहे ते तर ऐक?”

“ते सगळं नंतर… तू फक्त असशील तसा इथे ये… बस….” आणि इतके बोलून संदिपने फोन कटही केला.

काही वेळातच निलेश त्याच्या घरी हजर होता. संदिप अजूनही सोफ्यावरच बसलेला होता. निलेशला पाहताच त्याने मनालीला निलेशसाठी आणि त्याच्यासाठी काहीतरी बनवून आण असे सांगून स्वयंपाकघरात पाठवले.

“काय रे..! इतके घाईघाईने का बोलावले? आणि तू आज घरी कसा? आणि हे काय.., तुझे डोळेही सुजल्यासारखे वाटताहेत? काय भानगड काय आहे?” निलेशने आल्या आल्या प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.

“आणि तुला माहिती आहे का? सागरला ऑफिसमध्येच हार्ट अॅटॅक आला आणि तो तिथल्या तिथेच गेला. आताच फोन आला होता मला. त्याच्या ऑफिसमधून. तिकडेच निघालो होतो मी आणि तुला बोलवावे म्हणून फोन केला तर तुझी ही गत.” निलेशने संदिपला जे प्रश्न आधी विचारले होते त्याचे उत्तर मिळण्याची वाटही न पाहता पुढचे बोलणे चालू केले होते.

“निल्या.., मला माहिती आहे सगळे. आणि हळू बोल आधी…” काहीशा दबक्या आवाजात संदिपने त्याला हळू बोलण्याचा इशारा करत म्हटले.

“अरे काय झाले इतके? आणि सागरच्या मृत्यूपेक्षा जास्त महत्वाचे काय आहे?” निलेशने वैतागून विचारले.

“अरे ती रेवा परत आली आहे. आणि सागऱ्याच्या मृत्यूलाही तीच कारण आहे.” अगदी हळू आवाजात संदिपने सांगितले.

“रेवा? म्हणजे ती भंडारदरावाली? ती कशी काय येईल?” निलेश पूर्णच वैतागला.

“ही अशी…!!!” रेवाचा आवाज खोलीत घुमला. दोघांनीही आवाजाच्या दिशेने पाहिले. हाताची घडी घालून रेवा शांत उभी होती. तिला पाहताच संदिपची दातखिळी बसली. निलेशचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.

क्रमशःकर्मभोग भाग १५,कर्मभोग भाग १५.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्मभोग भाग १४

Leave a comment