कर्मभोग भाग ३

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग ३  –

सगळेच आता भयचकित झाले होते. ही कोण? इथे कशी आली? याचा कुणालाच उलगडा होत नव्हता. तितक्यात रवीला आठवले. ज्यावेळेस त्याने सगळ्यात शेवटची रूम रिसेप्शनवर मागितली होती त्यावेळेस “हीच रूम पाहिजे का तुम्हाला?” असे त्याला कितीतरी वेळेस विचारले गेले होते. हे आठवताच तो दरवाजाच्या दिशेने धावला. एका झटक्यात त्याने कडी उघडली आणि दार उघडण्यासाठी तो जोर लावून ओढू लागला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दार कुणीतरी बाहेरून बंद केल्यासारखे वाटत होते.(कर्मभोग भाग ३)

“हाहाहा… आता का पळतोस?” त्या स्त्रीचा काहीसा घोगरा आवाज खोलीत घुमला…

ही स्त्री कोण असेल हे आता सगळ्यांच्याच लक्षात आले होते. प्रत्येक जण दाराकडे जाऊन ते उघडण्याचा प्रयत्न करत होता. एक जण खिडकीकडे धावला. पण तीही उघडण्याचे नाव नव्हते. तेवढ्यात एकाने तेथील खुर्ची खिडकीच्या काचेवर मारली पण काच आता पूर्ण कडक बनलेली होती. बिळाच्या तोंडावर आग लागली की उंदीर जसे इकडे तिकडे पळू लागतात तशीच त्या चौघांची गत झाली होती. हे सगळे पाहताना मात्र प्रियाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य पसरले.

“प्रिया… घाबरू नकोस… आता तुझे रक्षण करायला मी आले आहे. मला तुझी मोठी बहिणच समज…” खोलीत परत तो घोगरा आवाज घुमला. त्या स्त्रीच्या त्या आवाजात प्रियाला आत्मियता जाणवली, आणि ती बरीच शांत झाली. तिची भीतीही बऱ्याच प्रमाणात कमी झाली. पण तिकडे ते चौघेही नखशिकांत थरथरत होते. दोघांनी तर देवाच्या नावाचा मोठ्याने जपही चालू केला.

“आता तुम्हाला देव आठवला होय? असंख्य स्त्रियांच्या अब्रूशी खेळताना नाही आठवला तुम्हाला देव?” प्रिया चवताळली.

“प्रिया… तू आता शांत रहा… आणि हो… हे नराधम तसे सुटले तर परत इतरही मुलींना नासवतील… त्यामुळे मी यांची जी गत करणार आहे त्याबद्दल मनात किंतु ठेवू नकोस… आज मी खेळ खेळणार आहे… जसा हे लोकं इतर मुलींशी खेळत आले आहेत तसा. मागे हो…” प्रियाच्या दंडाला धरून तिला मागे ओढत ती स्त्री आपल्या घोगऱ्या आवाजात म्हणाली. प्रियाला तो स्पर्श अगदी थंडगार तरीही आश्वासक धीर देणारा वाटला आणि ती मागे सरकली.

“रवी… चेक मिळाला ना तुला? आता त्याचे दामही चूकव तू…” रवीकडे वळत ती स्त्री म्हणाली.

“नाही… नाही… मी… मी चुकलो… मी खरंच चुकलो… मला मारू नको… मला माफ कर…” रवी अगदी कळवळत म्हणाला…

“अरे हट… तू माझा नाही प्रियाचा अपराधी आहेस… माफी मागायची तर तिची माग…” त्या स्त्रीच्या आवाजात तुच्छता साफ साफ दिसून येत होती. रवी धावतच प्रिया समोर आला. त्याने तिच्यापुढे आपले गुडघे टेकले, हात जोडले आणि तो तिची कळवळून माफी मागू लागला. त्याच्या या कृतीने प्रियाचा दुखावलेला स्वाभिमान तिला परत मिळाला. तिला काहीवेळ आधी पर्यत आपण खूप कमजोर आहोत म्हणून जे वाटत होते ते नैराश्य कुठल्या कुठे पळाले. आता त्याला माफ करायचे की त्याच्या अपराधाची शिक्षा द्यायची हे ती स्वतः ठरवणार होती.

“प्रिया… प्रिया… माफ कर गं मला… मी… मी चुकलो… मी तुझा नवरा आहे… माझ्या… माझ्या मोठ्या आयुष्यासाठी तू व्रत करतेस आणि आता तूच मला मारणार? नाही गं नाही… अजून आपला संसार व्हायचा आहे. मला तुला खूप सुख द्यायचं आहे… माफ कर गं मला… माफ कर…” आपण काय बोलतो आहोत हेही त्याला नीट समजत नव्हते पण तो प्रियाकडे दयेची याचना करत होता.

“हाहाहा… रवी… अरे तू मला काय सुख देणार हे मी थोड्या वेळापूर्वीच अनुभवले रे…” उपरोधिक स्वरात प्रिया उद्गारली… बाकी तिघे अजूनही थरथरत जसे जागेवरच खिळले होते…. नव्हे त्या स्त्रीने त्यांना खिळवून ठेवले होते असे म्हणने जास्त संयुक्तिक ठरेल.

“ताई… याचे काय करायचे हे मी तुला काही वेळाने सांगेन… तो पर्यंत तू या इतरांचा समाचार घे…” त्या स्त्रीकडे पहात प्रिया म्हणाली.

“हाहाहा… ठीक आहे… फक्त आता मी जे रूप धारण करणार आहे त्याला भिऊ नकोस… हवे तर माझ्याकडे पाहूही नकोस…” इतके बोलत तिने आपला रोख त्या तिघांच्या दिशेने वळवला. ते तिघेही घाबरून तिच्याकडेच पहात होते. हळूहळू त्या स्त्रीचे रूप पालटू लागले. तिचे डोळे अंधुक होत होत पूर्णपणे नाहीसे झाले. त्या जागी आता फक्त खाचा दिसू लागल्या. नाकावरील त्वचा पूर्णपणे वितळली जाऊन नाकाचे हाड कवटीपासून तरंगते आहे असा भास होऊ लागला. तोंडातील दोन्ही सुळे एका इंचापर्यंत वाढले. शरीराच्या जागी फक्त हाडांचा सापळा दिसू लागला. आता ती कवटी भेसूर हास्य करू लागली. तिचा हात आता पहिल्या व्यक्तीच्या दिशेने वाढू लागला. ते दृश्य इतके भयाण होते की त्यांच्यातील एकजण तिथल्या तिथे शुद्ध हरपून पडला. त्या स्त्रीचे हे रूप पाहून प्रियाही अगदी घाबरून गेली पण त्या स्त्रीने प्रियाला याबद्दल आधीच सांगितल्यामुळे तिने आपले तोंड फिरवून दोन्ही हातांनी कान गच्च दाबून धरले. रवी मात्र थरथरत त्या स्त्रीकडेच पहात होता. त्या स्त्रीने पहिल्या व्यक्तीच्या कपाळावर आपले बोट टेकवले. त्या व्यक्तीला आता आपल्या कपाळाला कुणीतरी ड्रीलने भोक पाडते आहे अशा वेदना होऊ लागल्या… तो मोठमोठ्याने ओरडू लागला. त्याने मागे सरकायचा प्रयत्नही केला पण त्यात तो यशस्वी झाला नाही. रवीला त्याचा तो आकांत पाहवेना. त्याने आपले डोळे गच्च मिटले आणि दोन्ही हातांनी आपले कान झाकायचा प्रयत्न करू लागला पण ते त्याला शक्य होईना. जवळपास दहा मिनिटे त्या पहिल्या व्यक्तीची ओरडाओरड चालू होती आणि त्यानंतर अगदी मोठ्ठी किंकाळी फोडून त्याचे हातपाय थंड पडले. त्याच्या आत्म्याने त्याचे शरीर कायमसाठी सोडले.

“हाहाहा… एक जण संपला…” मोठा अट्टाहास करत ती स्त्री म्हणाली आणि तिने हात मागे घेत आपला मोर्चा दुसऱ्या व्यक्तीकडे वळवला.

“तुझी काही शेवटची इच्छा आहे का? अरे हो… विसरलेच… तुला तुझी रात्र चांगली घालवायची आहे नाही का? हाहाहा…” आपल्या घोगऱ्या आवाजात ती स्त्री विकट हास्य करत म्हणाली.

त्या स्त्रीचा मोर्चा आपल्याकडे वळला आहे असे पाहून त्याने देवादिकांची नावे घ्यायला सुरुवात केली. हनुमान चालीसा आठवायचा ही प्रयत्न केला पण त्याला तो काही केल्या आठवेना. त्याच्या तोंडातून शब्दही फुटेना.

“हाहाहा… ज्या देवाचे ध्यान करण्याचा तू प्रयत्न करतो आहेस… तो कधीही तुझ्या मदतीला येणार नाही… जेंव्हा तुम्ही अबलांवर अत्याचार करत होतात त्यावेळेस तो त्यांच्या मदतीला धावला नाही तर आता तो तुमच्या मदतीला धावेल असा विचारच कसा करतोस? चल तयार हो मरणासाठी…” त्या स्त्रीचा घोगरा आवाज खोलीत घुमला. पण इतक्या सहजासहजी त्याला मारणे तिच्या मनाला पटले नाही.

“तुला शेवटचे काही बोलायचे आहे? चल बोल… काय बोलायचे ते… आणि हो… तुझ्या कोणत्याही स्तोत्र म्हणण्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही हेही लक्षात ठेव त्यामुळे त्यात वेळ घालवू नकोस…” दुसऱ्या माणसाची ती अवस्था पाहून त्या स्त्रीला खूप गंमत वाटली आणि तिने त्याला खेळवायचे ठरवले.

“मला… मला माफ कर… करा… मी यापुढे कुणालाच त्रास देणार नाही… कोणत्याच स्त्रीकडे वाईट नजरेने पाहणार नाही…” तो अडखळत तिची विनवणी करू लागला.

“ते तर तुला आता यापुढे कधीच शक्य होणार नाही… दुसरे काहीतरी बोल… हाहाहा…” आपले नसलेले डोळे त्याच्यावर रोखत ती स्त्री म्हणाली.

आता वेगळे काय बोलायचे हा त्याला प्रश्न पडला.

“बोल…” त्या स्त्रीचा आवाज वाढला.

“ताई… ताई… प्रिया ताई… मला वाचवा…” तो मोठ्याने ओरडला आणि प्रिया उभी होती तिथे जाऊन त्याने एकदम तिचे पाय धरले. आपले कुणीतरी पाय धरले आहेत हे पाहून तिने मान वळवली. काही वेळापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर असलेले छद्मीहास्य आता तिच्या चेहऱ्यावर पसरले.

“मी विनवीत होते त्यावेळेस तर तू हसत होतास ना? आता का घाबरतोस?” तिने त्याला पायानेच ढकलत म्हटले. एरवी जर कुणी प्रियाला अशी विनंती केली असती तर ती लगेच विरघळली असती. पण आज मात्र ती कुणालाच माफ करायला तयार नव्हती. रवी एकाच जागेवर खिळून फक्त पाहत होता. त्याच्या मनातील भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्याच्या डोळ्यात कधी भीती तर कधी निराशा तर कधी वेदना स्पष्ट जाणवत होत्या. पण तो काहीच करू शकत नव्हता. साधा हलूही शकत नव्हता. या आधी इतकी हतबलता त्याने कधीच अनुभवली नव्हती.

“चल अजून एक चान्स देते मी तुला… इथून जर बाहेर पडता येत असेल तर ते करून पहा.” त्या स्त्रीचा आवाज परत एकदा घुमला. इथे आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात येवून तो माणूस उठला आणि कधी दाराला, कधी खिडकीला धक्के देऊ लागला. जो जो त्याचे प्रयत्न वाया जात होते तो तो त्याचे मनोबल कमी कमी होत होते. शेवटी एक वेळ अशी आली की त्याने तिथेच बसून घेतले. मोठ्याने हंबरडा फोडला आणि तो आता आपले मरण कधी येते याची वाट पाहू लागला आणि परत खोलीत त्या स्त्रीचा उपहासाने भरलेला घोगरा आवाज घुमला.

“कारे… दमलास? इतक्यातच हार मानलीस? आता सांग… तुमच्यापासून वाचण्याची शेवट पर्यंत धडपड करणारी स्त्री जास्त धैर्यवान की तुझ्यासारखे नेभळट आणि नामर्द पुरुष धैर्यवान? थू तुझ्या जिंदगीवर… ज्या स्त्रीच्या पोटी जन्म घेतलास त्याच स्त्रीची विटंबना केलीस… तू तर खेळण्याच्याही लायकीचा नाहीस…” हे बोलत असताना तिच्या बोलण्यातील विखार शब्दाशब्दाला वाढत होता.

“तुला मेलेल्याला आताच मारून काय उपयोग? आधी तुझ्या जोडीदाराचा नंबर… मग तुझा…” असे बोलत त्या स्त्रीने बेशुद्ध पडलेल्या माणसाकडे आपला मोर्चा वळवला. डोळ्याच्या खाचा त्या माणसावर रोखल्या आणि एखादा पाण्याचा फवारा आपल्यावर कुणी मारत आहे असा भास होत तो उठून बसला. बिना डोळ्यांचा आणि बिना मासांचा हो सापळा आपल्याकडेच पाहतो आहे हे पाहून त्याला दरदरून घाम सुटला.

“ये रे… धर माझा हात… तुला बायकांचे हात धरायला खूप आवडते ना?” उपहासाच्या सुरात ती स्त्री बोलली. रवी अगदी भेदरलेल्या नजरेने एकदा त्या सापळ्याकडे एकदा त्याच्या साथीदाराकडे आळीपाळीने पहात होता. प्रियाही आता या खेळाचा आनंद घेत होती. तिला त्या स्त्रीची किंवा तिच्या या बीभत्स रुपाची जराही भीती वाटत नव्हती. तिच्या डोळ्यासमोर काही वेळापुर्वीचा प्रसंग चितारला गेला आणि तिचा संताप उसळला.

त्या व्यक्तीच्या तोंडातून एक शब्दही बाहेर फुटत नव्हता. त्याची एकदम दातखिळीच बसली. त्यांच्याबरोबर खेळ करणेही त्या स्त्रीला कमीपणाचे वाटू लागले आणि पाहता पाहता तिचे रूप पालटू लागले. ती परत आपल्या पहिल्या रुपात आली.

“प्रिया… तू रवी बद्दल काय विचार केला आहेस?” तिने प्रियाला विचारले.

“ताई… आज पर्यंत रवीने मला खूप त्रास दिलेला आहे. मारझोड केलेली आहे. माझ्या आई वडिलांचा होईल तितका अपमान केला आहे पण तरीही मी ते सगळे सहन केले. एक नवरा म्हणून मी त्याला माझे सर्वस्व अर्पण केले. त्याच्या प्रत्येक गोष्टी सोडून देत आले पण आज त्याने माझ्या स्त्रीत्वाचा अपमान केला आहे. ज्याला माझ्याकडून माफी नाही. स्त्रीला कमजोर समजून तिची विटंबना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला योग्य शिक्षा झालीच पाहिजे… तू त्याला जी शिक्षा करशील ती मला मान्य आहे… ताई आज तू होतीस म्हणून मी वाचले, नाही तर माझ्या नशिबी काय भोग आले असते हा विचार करूनही अंगावर काटा येतो…” असे बोलत तिने रवीकडे पाहिले. त्याची ती मलूल मुद्रा पाहून याही परिस्थितीमध्ये तिचे मन काहीसे हेलावले. तिला आपला प्रियकर रवी दिसला पण फक्त काही क्षणच. आणि नंतर परत तिची मुद्रा कठोर झाली.

“प्रिया… मी समजू शकते तुझ्या यातना.” असे म्हणत त्या स्त्रीने आपला आश्वासक हात तिच्या खांद्यावर ठेवला.

“आता ऐक… माझ्याही काही मर्यादा आहेत. मी या जागेत कितीही प्रबळ असले तरी याच्या बाहेर मला पडता येत नाही आणि त्यामुळे तुझी बाकी कोणतीही मदत मला करता येणार नाही. त्यासाठी काही गोष्टी आता तुलाच कराव्या लागणार आहेत. आहेस ना तयार त्यासाठी?” त्या स्त्रीने प्रियाला विचारले.

“ताई… तू जे काही सांगशील ते मी माझ्या परीने नक्कीच करेल. पण आता या नराधमांना माफी नाही… आता माझे जे काही व्हायचे असेल ते होवो…” प्रिया कठोर होत म्हणाली.

क्रमशः कर्मभोग भाग ३, कर्मभोग भाग ३, कर्मभोग भाग ३.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्मभोग भाग २

Leave a comment