कर्मभोग भाग ४ –
“तुला काहीही होणार नाही प्रिया… मी काही होऊ देणार नाही.” असे म्हणत त्या स्त्रीने आपली नजर रवीवर खिळवली. रवीला आता कसलीच शुद्ध राहिली नाही. तो संपूर्णपणे त्या स्त्रीच्या कह्यात होता. एकाएकी तो उठला. त्याच्या डोळ्यात आता कोणतेच भाव दिसत नव्हते. तो पूर्णपणे भारला गेला होता. एखादा यंत्रमानव चालावा असा तो, त्यांनी आणलेले सामान जिथे ठेवले होते तिथे गेला. त्यातील एक मोठी थैली हातात घेतली. या थैलीत सगळ्या खाण्याच्या वस्तू, फळे आणि फळे कापण्याची छोटी सुरी ठेवलेली होती. या सगळ्या वस्तू घरातून निघताना प्रियाने घेतल्या होत्या. त्यातील सुरी त्याने हातात घेतली आणि तो दातखिळी बसलेल्या माणसाजवळ पोहोचला. त्याला काही समजायच्या आत रवीने हातातील सुरी त्या माणसाच्या गळ्यावर चालवली. रक्ताची एक चिळकांडी रवीच्या आणि त्याच्या शेजारी घाबरून बसलेल्या दुसऱ्या माणसाच्या अंगावर उडाली. रक्ताचा तो गरम स्पर्श होताच तो दुसरा माणूस भानावर आला. समोरचे दृश्य पाहून एक जोरदार किंकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली. प्रियाला देखील ते दृश्य पाहवले नाही. तिने आपले तोंड तत्क्षणी बाजूला फिरवले.(कर्मभोग भाग ४)
रक्ताने माखलेली सुरी हातात घेऊन रवीने आपला मोर्चा त्या दुसऱ्या माणसाकडे वळवला. त्या माणसाने थोडा मागे सरकण्याचा प्रयत्न केला पण मागे भिंत असल्यामुळे त्याला ते शक्य झाले नाही आणि परत एकदा रवीचा सुरी धरलेला हात त्याही माणसाच्या गळ्यावर चालला. त्या माणसाच्या तोंडातून एक अस्पष्टसा आवाज बाहेर पडला आणि त्याने मान टाकली. त्याच्या मानेतून उडालेले रक्ताचे शिंतोडे रवीच्या चेहऱ्यावर, कपड्यांवर सगळीकडे पसरले. दोघेही मेलेले पाहताच त्या स्त्रीचा अट्टाहास खोलीत घुमला. त्याबरोबर रवी शुद्धीवर आला. समोर पडलेली त्याच्या साथीदारांची प्रेते, त्यांच्या रक्ताने माखलेले स्वतःचे कपडे, आपल्या हातात असलेली रक्ताळलेली सुरी हे सगळे पाहून तो पूर्ण चक्राऊन गेला. हातातील सुरी तिथेच टाकून तो दोन फुट माझे सरकला. त्याच्या तोंडून शब्दही फुटेना. आपल्या हातून हे काय आणि कसे घडले याचा विचार मनात आला आणि त्याने आपल्या दोन्ही हातानी आपले डोके गच्च दाबून धरले.
“हाहाहा… तुझ्या पाच लाखाच्या चेकचा आता तुला काय उपयोग रे?” त्या स्त्रीचा उपरोधिक स्वर खोलीत घुमला. तिचा तो खोचक प्रश्न त्याने ऐकला आणि त्याच्या अंगाची लाही लाही झाली. त्याने ती बाजूला फेकलेली सुरी उचलली आणि तो त्या स्त्रीच्या दिशेने धावला. पण त्या स्त्रीवर मात्र याचा काहीच परिणाम झाला नाही. त्याचा उगारलेला हात तसाच हवेत खिळल्यासारखा झाला. आता त्याला ना हालता येत होते ना बोलता. पण तो सगळे ऐकूही शकत होता आणि पाहूही शकत होता.
“मुर्खा… माणूस फक्त एकदाच मरतो हे माहिती नाही का तुला? ही माझी जागा आहे… इथे माझ्या इच्छेशिवाय काहीच होत नाही. तुला मारायला मला एक क्षण देखील पुरेसा आहे पण त्याने तू आरामात सुटशील… त्यामुळे मी तुला अशीच सोडून देणार आहे. इथली पापे तुला इथेच भोगायची आहेत. चल हो बाजूला…” इतके म्हणत तिने रवीला धक्का दिला. त्यासरशी तो कोलमडला आणि त्याची शुद्ध हरपली.
“प्रिया…” ती स्त्रीने प्रियाला आवाज दिला.
प्रियाने तोंड वळवले. सगळ्या खोलीत पांढरा धूर फक्त दिसत होता आणि समोर होती ती स्त्री. बाकी कोण कुठे कोणत्या स्थितीत पडले आहे हे तिला धुरामुळे काहीही दिसले नाही.
“तुला आता कसलीच भीती नाही…” त्या स्त्रीने आश्वासक आवाजात प्रियाला धीर दिला आणि प्रियाचा बांध फुटला. तिच्या डोळ्यातून अपोआप अश्रू सुरु झाले आणि तीने तिथेच फतकल मारली.
“धीर धर प्रिया… खंबीर हो… आपल्या अश्रूंना या जगात काहीही किमंत नाही. इथे गरज आहे ती काली स्वरुपाची…” प्रियाच्या खांद्यावर थोपटत ती स्त्री म्हणाली. काही वेळातच प्रियाने स्वतःला सावरले. त्या स्त्रीचे अनेक आभार मानल्यानंतर तिला सभोवतालची जाणीव झाली. बाहेर मिट्ट काळोख होता, त्यामुळे आता खोलीबाहेर पडणे शक्यच नव्हते. त्यातून रवीने तिला जंगली श्वापदांची भीतीही घातलेली होती. बरे खोलीत राहायचे तर तिथे तीन जण मेलेले आणि ज्याच्यावर विश्वास ठेवून ती इथे आली होती तो तिचा नवरा, त्याच्यापासूनच तिला जास्त भीती होती. फक्त त्यातल्या त्यात एकच गोष्ट तिच्या बाजूची होती आणि ती म्हणजे तिची नवी ताई. सध्या तरी ती बाहेरपेक्षा खोलीत जास्त सुरक्षित होती. तिच्या सोबत होती तीने यापूर्वी कधीही जन्मात न पाहिलेली स्त्री… स्त्री कसली भूतचं ते. चांगले असले म्हणून काय झाले? त्या भूतानेच माणसातल्या राक्षसांपासून तिचे रक्षण केले होते. तिच्या चेहऱ्यावर हे सगळे भाव आलटून पालटून उमटत होते.
“काय गं… कसला विचार करतेस इतका? एका भूताबरोबर कसे राहायचे याचा?” आता त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. त्या स्त्रीचे शब्द ऐकले आणि प्रियाला त्याही स्थितीत हसू आले.
“नाही गं ताई… माणसाच्या मनाचा विचार करत होते. मला जर कुणी असे सांगितले असते कि या रूम मध्ये भूत आहे म्हणून, तर मी ही रूमच काय पण गांवही सोडले असते आणि आता मात्र तुझे इथे असणेच माझ्यासाठी आश्वासक आहे. एक करशील सकाळ पर्यंत अशीच थांबशील… माझ्यासोबत?”
“अगं त्यात काय… मी तर इथेच असते… अगदी सकाळ झाली तरीही…”
“ताई… एक विचारू?”
“हो विचार की…”
“नाही म्हणजे… तू इथे? या आवस्थेत?” जरासे चाचरतच प्रियाने विचारले.
“हं… तुला सांगू प्रिया… आज पहिल्यांदा मी कुणाशी तरी बोलू शकते आहे याचा मला खूप आनंद होतोय. माझं नांव रेवा. माझा जन्म पुण्याचा. घरी आई वडील आणि मी असे तिघेच. मी ८ / ९ वर्षाची असतानाच दोघेही अपघातात गेले. त्यानंतर माझा सांभाळ माझ्या चुलत्याने केला. सांभाळ केला म्हणण्यापेक्षा माझी जबाबदारी उचलली हे योग्य होईल. त्यानंतर माझे जीवनच बदलले. चुलतीला मुल नव्हते पण तिला कधी मी मुलगी वाटलेच नाही. मी फक्त एक अडथळा होते, त्यांच्यात आणि माझ्या वडिलांच्या संपत्तीत. तशी खूप संपत्ती होती असेही नाही पण मुबलक होती. चुलता चुलती कडे मी रहात असले तरी माझ्यात आणि अनाथ मुलांमध्ये कोणताच फरक नव्हता. शाळा संपली आणि मी कॉलेजमध्ये दाखल झाले. तिथे मला संदीप भेटला. संदीप हा बोलायला अत्यंत लाघवी आणि राहायला अगदी ऐटबाज. त्यामुळे मला तो आवडू लागला. नंतर नोटबुक देण्याघेण्याच्या माध्यमातून आमची ओळख झाली ती दिवसेंदिवस वाढू लागली. आमच्या नावाची चर्चा कॉलेजमध्ये व्हायची त्यावेळेस मलाही ते खूप छान वाटायचे. घरी अगदी मुखजड झालेली मी कॉलेजमध्ये, त्याच्या सहवासामध्ये खूप मोकळी झाले आणि त्यात आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस माझ्या काही मैत्रिणींनी मला त्याच्यापासून सावध रहा म्हणून सांगितले होते पण मी काहीच ऐकायला तयार नव्हते. मला त्या सगळ्या जणी माझ्या शत्रू वाटू लागल्या….” हे सगळं रेवा शून्यात पहात सांगत होती आणि प्रिया ते ऐकत होती.
“त्यानंतर एक दिवस लग्न करून संदीप मला इथे घेऊन आला. मी खूप आनंदात होते पण तोच माझा शेवटचा आनंद. त्याच रात्री संदीपचे मित्रही इथे हजर झाले आणि संदीपचा प्लान माझ्या लक्षात आला. जो प्रसंग तुझ्या बाबतीत झाला अगदी तसाच प्रसंग माझ्याही बाबतीत घडला. मला तिथून पळता येणे शक्य नव्हते त्यामुळे मी स्वतःच्या शीलाचे रक्षण करण्यासाठी बरोबर आणलेल्या सुरीने स्वतःचा घात करून घेतला. तुला सांगते प्रिया… त्यावेळेस जर मी स्वतःचा घात करण्यापेक्षा त्यांच्यातील एखाद्याला जरी इजा पोहोचवली असती तरी आज चित्र वेगळे दिसले असते.” हे बोलताना तिचे डोळे जरासे पाणावलेले दिसले. हे सगळे ऐकत असताना प्रियाच्या अंगावर काटा आला. सगळ्या पुरुष जातीबद्दल तिच्या मनात संताप आला.
“ताई… हे सगळे पुरुष एकाच माळेचे मणी का गं? तुझा संदीप आणि त्याचे मित्र काय किंवा माझा नवरा आणि त्याचे साथीदार काय… इथून तिथून सगळे सारखेच?” प्रिया चिडून बोलली. खरे तर रेवाला आलेला अनुभवही यापेक्षा काहीच वेगळा नव्हता.
“होय… म्हणूनच मी आता ठरवले आहे. त्या तिघांचा सूड घ्यायचा. इतके दिवस माझ्या मनात काहीही नव्हते. त्यामुळेच तर मी कुणाच्याही समोर आले नाही. पण आजच्या या प्रसंगाने माझ्या जखमेवरील खपली निघाली आहे. या लोकांना असे सोडले तर उद्या अनेक स्त्रियांची हे विटंबना करतील. बोल प्रिया… तू करशील मला या कामात मदत?”
“हो ताई… जरूर.” प्रिया उत्तर दिले.
“पण आधी या भानगडीतून तुला सहीसलामत सोडवणे महत्वाचे आहे. तरच बाकी गोष्टी होऊ शकतील.” असे म्हणत तिने प्रियाच्या चेहऱ्यावरून आपला हात फिरवला आणि प्रियाला आपले डोळे जड होत आहेत असे वाटून काही क्षणातच ती शुद्ध हरपून तिथेच पडली.
क्रमशः कर्मभोग भाग ४.कर्मभोग भाग ४-
मिलिंद जोशी, नाशिक…