कर्मभोग भाग ५

कर्मभोग भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

कर्मभोग भाग ५ –

प्रिया जेव्हा शुद्धीत आली त्यावेळेस कुणीतरी आपल्या चेहऱ्यावर पाणी मारते आहे असे तिच्या लक्षात आले. तिने डोळे किलकिले करून पहिले त्यावेळेस एक लेडी पोलीस काँस्टेबल तिला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे असे तिला दिसले. तिने धडपडत उठायचा प्रयत्न केला.(कर्मभोग भाग ५)

“सायेब… बाई शुद्धीवर आल्यायेत…” प्रिया शुद्धीवर आल्याची खात्री होताच त्या काँस्टेबलने तिच्या साहेबांना हाक मारली. तिचे साहेब, सब. इन्स्पेक्टर बोराडे लगबगीने तिथे आले.

“बाई… तुमचं नांव?” त्यांनी डायरेक्ट प्रश्नांनीच सुरुवात केली.

“प्रिया… प्रिया रवी जहागीरदार… पण रवी कुठाय? आणि ती… ती माणसे गेली का निघून?” तिने घाईघाईत विचारले.

“रवी ठीक आहे… बरे… काल इथे काय घडले ते आम्हाला सांगता का?” तिच्या प्रश्नाचे जुजबी उत्तर देत बोराडेंनी पुढचा प्रश्न केला.

“काल आम्ही ट्रीपसाठी इथे आलो. दिवसभर सगळे स्पॉट पाहून झाल्यावर रात्री आम्ही परत आलो. रात्री जेवण मागवले आणि जेवणानंतर छानपैकी गप्पा मारत बसलो होतो इतक्यात दारावर टकटक झाली. रवीने दार उघडले तर तीन जण एकदम खोलीत शिरले. मी तर अगदी घाबरूनच गेले. मी ओरडणार इतक्यात त्यातील एकजण म्हणाला, आमच्या मध्ये येऊ नका… आमचा मित्रांचा व्यवहार आहे आणि त्याचीच बोलणी करायला आम्ही आलो आहोत. पण नंतर त्यांची बाचाबाची एकदम वाढली म्हणून मी त्यांना सोडवायला गेले तर त्यातील एकाने मला धक्का दिला आणि मी काही समजायच्या आतच भोवळ येवून पडले. नंतरचे मला काहीच माहिती नाही… पण तुम्ही कसे काय इथे? काय झाले?”

“ते नंतर सांगतो… पण आधी मला सांगा… तुमच्या नवऱ्याची, म्हणजे रवीची आणि त्या माणसांची काय बोलणी चालू होती काही सांगता येईल तुम्हाला?”

“ते काहीतरी पाच लाखाच्या चेक बद्दल बोलत होते… आम्ही तुझा चेक पास केलाय तर ठरल्याप्रमाणे आता आम्हाला आमचा हिस्सा दे म्हणून… असेच काहीतरी त्यांचे चालू होते आणि रवीने त्यांना सांगितले की हे सगळे मी माझ्या हिमतीवर मिळवले आहे…” हे सांगत असतानाच तिचे लक्ष आजूबाजूला पडलेल्या रक्तावर गेले आणि ती ओरडली.

“रवी… इतकं सगळं रक्त? रवी कुठाय… रवी कुठाय… ओ… सांगा ना… प्लीज सांगा ना… तो ठीक आहे ना?” अगदी रडवेल्या स्वरात प्रियाने विचारले.

“ए बाई… तुला सांगितलं ना एकदा… तो ठीक आहे म्हणून?” लेडी काँस्टेबल जवळपास प्रियावर खेकसलीच.

“शोभाबाई… तुम्ही जरा शांत बसा बरं… हे पहा बाई, तुमच्या नवऱ्याला जराशी जखम झाली होती म्हणून त्यांना डॉक्टरकडे नेलं आहे इलाज करायला. थोड्याच वेळात येतील ते.” लेडी काँस्टेबलला दटावत आणि प्रियाला धीर देत बोराडे म्हणाले आणि त्यांनी काँस्टेबलला बाजूला येण्याची खुण केली.

“ताई… तुम्ही आधी शांत व्हा… पाणी प्या… मग आपण बोलू” तिथेच ठेवलेली पाण्याची एक बाटली प्रियाच्या हातात देत ती काँस्टेबल बोराडे होते तिथे गेली.

“हे पहा शोभाबाई… या बाईला आता काहीच सांगू नका. आधी तिच्याकडून आपण जबाब नोंदवून घेवू. जर तिला समजले की तिच्या नवऱ्याला आपण अटक केली आहे तर ती जबानी फिरवू शकते. आणि हो त्या बाईला समजणार नाही अशा प्रकारे तिचा जबाब रेकॉर्डही करून घ्या… काय समजलं?”

“ठीक आहे साहेब…“

“चला आता…” म्हणत बोराडे प्रियाजवळ आले.

“बाई… शांत झालात का? काही प्रश्न विचारू तुम्हाला?” अगदी जनरल बोलतो आहोत अशा अविर्भावात बोराडेंनी विचारले आणि प्रियाने मानेनेच त्यांना होकार दिला.

“मला सांगा बाई… तुमचं लग्न कधी झालं?”

“अडीच वर्षांपूर्वी…”

“तुमच्या नवऱ्याचा स्वभाव कसा आहे हो? म्हणजे आपलं जनरल विचारतो आहे मी.”

“कसा म्हणजे… चारचौघांसारखाचं आहे… पण तुम्ही हे मला का विचारीत आहात?”

“काही नाही हो… जनरल माहिती घेण्याची सवय पडली… बाकी काही नाही. हं तर स्वभावाबद्दल सांगत होता तुम्ही. त्यांना काही व्यसनं?”

“नाही हो… कसलंच व्यसन नाही त्याला. अगदी निर्व्यसनी आहे तो.”

“ओके ओके… बरं त्यांची एखादी गोष्ट… जी तुम्हाला अजिबात आवडत नाही अशी… आहे का काही?”

“अं… नाही म्हणजे त्याचा राग… त्याला खूप समजावते मी. इतका चिडत जाऊ नकोस म्हणून. पण अजून खूप काही त्याच्यात सुधारणा झालेली नाहीये. तेवढं एक सोडलं तर खूप चांगला आहे तो. समजा रागाच्या भरात त्याने कधी माझ्या अंगावर हात टाकला तरी राग शांत झाल्यावर किमान १० वेळेस सॉरी म्हणतो.” प्रिया सांगत होती आणि बोराडे सगळे रेकॉर्ड करून घेत होते. त्यांच्या घरचा पत्ता, आणि काही इतर प्रश्न विचारल्यावर बोराडे तिथून बाजूला झाले. प्रियाने दिलेल्या माहितीवरून त्यांनी लगेच एक टीम प्रिया आणि रवी रहात असलेल्या ठिकाणी अजून काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी रवाना केली.

“साहेब… आरोपीने जबाव नोंदवला आहे.” एक हवलदार त्यांच्या जवळ येत म्हणाला.

“काय म्हणतोय तो?”

“साहेब… मुर्खासारखे बोलतोय… तो म्हणतोय… मी काहीच केलं नाही… सगळं त्या बाईच्या भुतानं केलं…”

“भुतानं? काय वेडबीड लागलंय काय त्याला? साला अपराध करताना करून जातात आणि नंतर शिक्षेपासून वाचण्यासाठी काहीच्या काही गोष्टी रचतात हे लोकं.” बोराडे भडकलेच.

“आणू का त्याला इकडे?” हवलदाराने विचारले.

“नको… थांब… हे भुताचं काय प्रकरण आहे त्याबद्दलही काही चौकशी करून घेवू.” असे म्हणत बोराडे रिसेप्शनच्या इमारतीकडे वळले.

“काय रे? इथे काही भुताचा प्रकार आहे?” त्यांनी रिसेप्शनवर बसलेल्या माणसाला प्रश्न केला.

“भुताचा प्रकार? आणि इथं? नाही साहेब… इतके लोकं इथं राहून गेलेत. त्यातील कुणीच कधी तसं बोललं नाही.” आपला आवाज शक्यतो संयत ठेवत त्या व्यक्तीने उत्तर दिले.

“साहेब… ४/५ वर्षांपूर्वी इथं त्याच खोलीत एका बाईची बॉडी सापडली होती.” तेवढ्यात एक हवलदार म्हणाला. हे ऐकले आणि बोराडेंनी आवाज चढवला.

“काय रे? सगळे खुन तुमच्या त्याच खोलीत कसे होतात मग?”

“साहेब… मला काय माहित? त्या गोष्टीला आता बरीच वर्ष झालीत. त्यानंतर कित्येक जण तिथं राहून गेले. पण त्याबद्दल कुणी कधीच तक्रार केली नाही. पाहिजे तर त्या ठिकाणी राहिलेल्या लोकांचे अभिप्राय पहा म्हणजे तुमची खात्री पटेल.” काहीचे घाबरत त्याने बोराडेंच्या समोर अभिप्रायाची वही ठेवली. जे जे लोक त्या खोलीत उतरले होते त्याचे सगळ्यांचे अभिप्राय त्यांनी वाचून काढले. कोणत्याच अभिप्रायावरून तिथे असा काही प्रकार असू शकतो असे वाटत नव्हते.

“साला बनाव करतोय…” ते स्वतःशीच पुटपुटले.

“चल आरोपी आणि त्याच्या बायकोला समोरासमोर आणू. मी तिथे खोलीवर जातो. तू आरोपीला घेवून ये.” असे म्हणत बोराडे परत घटनास्थळी दाखल झाले. इतक्यात हलवदार रवीला घेवून आला. रवीला पाहताच प्रियाने धावत जावून रवीला मिठीच मारली.

“रवी… रवी… काय झाले? आणि तुझे हे कपडे रक्ताने कसे काय माखले?” तिने घाईत पण काळजीच्या स्वरात म्हटले. बोराडेंचे त्यांच्याकडे अगदी बारीक लक्ष होते.

“म्हणजे तू… तू रागाच्या भरात काही अघोरी काम तर नाहीस ना केले?” त्याच्यापासून वेगळे होत प्रिया म्हणाली. पण आता रवीला प्रिया नाही तर प्रियाच्या ठिकाणी त्या स्त्रीचा भास झाला. त्या स्त्रीच्या चेहऱ्यावर छद्मीहास्य होते. हे पाहिले आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

“नीच… हलकट बाई… असा घात केलास माझा? आता तुलाच आधी संपवतो…” असे म्हणत त्याने प्रियाचा गळा धरला आणि दाबायला सुरुवात केली. असे काही होईल हे बोराडेंना बिलकुल अपेक्षित नव्हते, पण त्याचा तो अवतार पाहून ते तत्काळ हरकतीत आले. त्यांनी लगेच पुढे होऊन त्याच्यापासून प्रियाची सुटका केली.

“रवी… काय करतोस हे? भानावर ये… माणसात ये…” त्याच्यापासून बाजूला होत ती म्हणाली. प्रिया सुटल्या बरोबर बोराडेंची सणसणीत चपराक रवीच्या गालावर पडली.

“xxx, xxx साला जी बायको तुझ्यावर इतकं प्रेम करते तिचाच जीव घ्यायला निघालास? जो बायकोला रागाच्या भरात संपवण्याचा प्रयत्न करतो तो उद्या काहीही करेल. हवलदार… या हरामखोराला ताब्यात घ्या आणि आपला पोलिसी हिसका दाखवा.” आपण काय चूक केली हे आता कुठे रवीच्या लक्षात आले आणि तो गयावया करू लागला.

“साहेब… साहेब… माझं ऐका… मी कुणालाच मारलं नाही… मी निर्दोष आहे…” त्याची नजर प्रियाकडे गेली आणि त्याला तिथे परत ती स्त्री मोठ्याने हसते आहे असा भास झाला.

“बाई… तुम्हालाही आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावे लागेल. अजून काही जबाब नोंदवण्यासाठी. आणि घाबरू नका. हा माणूस तुमच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही.”

“साहेब… साहेब त्याला सोडा हो… त्याचा राग लगेच उतरेल… तो नाही असे काही करणार…” प्रिया बोराडेंना विनंती करू लागली.

“नाही बाई… तो कायद्याने दोषी तर आहेच पण रागाच्या भरात तो काय करू शकतो हे आम्ही सगळ्यांनीच प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे. याला सोडणे समाजाच्या आणि तुमच्याही दृष्टीने घातक आहे. त्यामुळे आता याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल याचाच आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही समजू शकतो तुमच्या मनाला किती वेदना होत असतील ते. पण आता तुम्हाला धीराने घ्यावे लागेल.” आपल्या बोलण्यात काहीसे मार्दव आणत बोराडेंनी प्रियाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

“साळवे… सगळ्या बॉड्या पीएमला पाठवल्या का? हत्यार आणि इतर पुरावे गोळा करून तेही लॅबला पाठवा. आणि सगळे झाल्यावर खोली सील करा.” हवलदाराला निर्देश देत बोराडे तिथून निघाले.

“बाई… तुम्हालाही पुढचे सोपस्कार होईस्तोवर पोलीस स्टेशनला यावे लागेल. चला आमच्या बरोबर…” असे म्हणत त्यांनी प्रियाला बरोबर घेतले. प्रिया जशी त्या खोलीतून बाहेर पडली तसे तिने मागे वळून पाहिले. रुमच्या दारात रेवाची अस्पष्टशी आकृती तिच्याकडे समाधानाने पहात असेलेली तिला दिसली आणि तिच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव उमटले.

“रेवा… काळजी करू नकोस… लवकरात लवकर तुझी या बंदिवासातून मी मुक्तता करेन. मला खात्री आहे मी त्यात नक्की यशस्वी होईल.” मनातल्या मनात हा निश्चय करून ती सब. इन्स्पेक्टर बोराडेंबरोबर चालू लागली.

क्रमशः कर्मभोग भाग ५,कर्मभोग भाग ५.

मिलिंद जोशी, नाशिक…

कर्मभोग भाग ४

Leave a comment