निष्ठा

By Bhampak Lifestyle Entertainment Laxman Asbe 3 Min Read
पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

निष्ठा –

आपल्या जीवनामध्ये निष्ठा, ही आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देत असते. अस्थिर आणि चंचल असलेले मन आपल्याला एकनिष्ठ होऊ देत नाही आणि राहू देत नाही. जीवनातील अनेक प्रकारची प्रलोभने आणि अतृप्त मन ही आपल्या एकनिष्ठतेला बाधक असतात.

आपल्या अंतःकरणातील भाव, प्रेमाच्या आणि विश्वासाच्या कसोटीवर एकनिष्ठतेवर पोहोचत असतो. जेथे प्रेम आणि विश्वास आहे, तेथे आदर निर्माण होतो आणि हा आदरच आपल्याला एकनिष्ठ रहायला भाग पाडतो. शुद्ध प्रेम आणि विश्वास या शब्दांचा भावार्थ न समजल्यामुळे आज आपल्या मनातील आणि जीवनातील आदर्श आणि आदरस्थाने रिक्त आहेत*. त्यामुळे जो आपल्या कामाचा तोच आपल्या निष्ठेचा, हे समीकरण दृढ होत चालले आहे.

काम बदलले की गरज बदलते, गरज बदलली की निष्ठा बदलते. ही बदलत असलेली निष्ठा गाढवाच्या शिंगरासारखी असते.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

गाढवाचे ताने पालटते क्षणोक्षणे l ऐसे अधमाचे गुण l एकविध नाही मन ll

आदर वाटावी अशी निर्मळ, पवित्र आणि प्रेमळ माणसे समाजातून खूप कमी झाली आहेत. त्यामुळे मनातील एकनिष्ठतेची भूक वाढतच चाललेली आहे. सार्वजनिक जीवनात निष्ठेचा अभाव असला, तरी फारसे काही बिघडत नाही , परंतु पती-पत्नीमध्ये एकनिष्ठ भाव नसला, तर मात्र जीवनात त्याच्यासारखी उणीव नाही.

दाम्पत्यामध्ये एकनिष्ठ भाव हा समर्पण, त्याग, प्रेम आणि विश्वास यातून निर्माण होत असतो.

काया, वाचा, मने आपण एखाद्याचा स्वीकार केला किंवा एखाद्यावर विश्वास टाकला, तर त्यातून एकनिष्ठ भाव तयार होत असतो. माणूस हा जन्मतः परिपूर्ण आहे, परंतु आत्म स्वरूपाचे ज्ञान नसल्याने, तो स्वतःला कायम अपूर्ण समजत असतो. ही अपूर्णता, पूर्ण करण्याची हाव त्याला आयुष्यभर असते.

त्याच्या जीवनातील बहिर्मुखतेचा हा प्रवास कधीच संपत नाही. बहिर्मुखता ही , चांगले वाटेल त्या गोष्टीचा आस्वाद घ्यायला भाग पडते आणि ही भूक कधीच संपत नाही. याच ठिकाणी एकनिष्ठतेला तडा जातो.

अंतर्मुख झालेले जीवन परिपूर्णतेच्या वाटेवर जात असते आणि आत्म स्वरुपाचे ज्ञान होतच, देहाची नश्वरता खात्रीने समजते. मग नश्वर देहाचा वीट येतो आणि माणूस विदेही अवस्थेत जाऊन मुक्त होतो. अशा मुक्त अवस्थेत देहाची भूक शून्य झालेली असते आणि अध्यात्मिक भूक आत्मिक पातळीवर स्थिर होत असते. अशा आत्मिक पातळीवरील प्रत्येक संबंध हा शुद्ध प्रेम, विश्वास आणि आदर या भावनिक बंधाने बांधलेला असतो, हीच जीवनातील खरी एकनिष्ठता आहे. अशा एकनिष्ठ असलेल्या पती-पत्नीच्या संसारात कितीही मोठी संकटे आली, दुःख आले, तरी त्यांच्या संसारातील सुख आणि समाधान याच्यावर कोणताही परिणाम होत नाही.

माझे कोणी तरी आहे आणि मला कोणी तरी आहे, हा अंतःकरणातील भाव माणसाला सनाथ करत असतो. माझे कोणीच नाही आणि मलाही कोणी नाही, हा भाव माणसाला अनाथ करत असतो. आपल्या जीवनातील एकनिष्ठ भाव आपल्याला सनाथ बनवत असतो आणि निराधार असलेल्या मानसिकतेला एक भक्कम आधार देत असतो. यावरच आपल्या जीवनातील स्थिरता अवलंबून आहे.

एकनिष्ठ भाव भक्तांचा स्वधर्म l निर्धार हे वर्म चुकू नये ll
निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास l पाहू नये आस अनेकांची ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment