मल्हारगड | Malhargad –
महाराष्ट्रातील बऱ्याच किल्ल्यांची स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे. काही किल्ले पुराणपुरुष म्हणुन प्रसिद्ध आहेत तर काही किल्ले त्याच्या बांधकामासाठी प्रसिध्द आहेत. काही किल्ले शिवस्पर्शाने पावन झाले म्हणुन प्रसिध्द आहेत तर काही किल्ले त्यावर घडलेल्या इतिहासाने प्रसिध्द आहेत. पण मल्हारगड मात्र वेगळ्याच कारणासाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांत सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून मल्हारगड (Malhargad) प्रसिद्ध आहे. सातवाहन काळापासून गुंफलेल्या किल्ल्यांच्या माळेत स्वराज्यातील मल्हारगड हे शेवटचे पुष्प गुंफले.
भौगोलिक स्थान (Location) –
पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेले सोनोरी हे गड पायथ्याचे गाव पुण्याहुन ३० कि.मी.वर तर सासवडहुन हे अंतर ६ कि.मी.असुन या मार्गाने गाडी थेट गडाच्या पायथ्याशी जाते.
पहाण्यासारखी ठिकाणे (Places to see) –
गड तसा छोटा असून त्रिकोणी आकाराचा आहे, पण छोटा असुनही गडाला बालेकिल्ला आहे. गडाचा महादरवाजा पुर्व टोकाला असलेल्या बुरुजात बांधलेला असुन या दरवाजाशेजारी दुसऱ्या बुरुजाची रचना आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर समोरच पहारेकऱ्यांच्या देवड्या व दोन तटबंदीमधुन गडात शिरणाऱ्या पायऱ्या दिसुन येतात. या पायऱ्या चढुन वर आल्यावर समोरच एक मध्यम आकाराचा चौथरा व त्यासमोर बालेकिल्ल्याची तटबंदी दिसुन येते. या तटबंदीच्या उजव्या बाजूस बालेकिल्ल्याचा दरवाजा असुन तिथे न जाता सर्वप्रथम डाव्या बाजुने किल्ल्याची माची फिरण्यास सुरवात करावी. चौथऱ्याच्या पुढे काही अंतरावर एक कोरडी पडलेली विहीर आहे.
विहिरीकडून तटाच्या बाजूने पुढे आल्यावर समोरच पायऱ्या असलेले बांधीव तळे लागते. बालेकिल्ल्याच्या दक्षिण तटाला लागून असलेल्या या तलावाकडे येण्यास बालेकिल्ल्याच्या तटात एक लहान मार्ग ठेवलेला आहे. तलावातील पाणी शेवाळलेले असुन पिण्यायोग्य नाही. तलावाच्या पुढील भागात बुरुजाकडे जाणाऱ्या वाटेवर दुसरी विहीर आहे. या विहिरीत काही प्रमाणात पाणी असुन ते पिण्यायोग्य वाटते पण ते काढण्यासाठी दोरीची गरज भासते. विहिरीच्या पुढील बाजूस किल्ल्याचा काळेवाडीच्या दिशेने असलेल्या सोंडेवरील बुरुज असुन या बुरुजातुन खाली उतरण्यास लहान दरवाजा चोरदरवाजा आहे.
काळेवाडी अथवा झेंडेवाडी गावातून आल्यास आपण या चोर दरवाजाने गडावर प्रवेश करतो. येथुन बालेकिल्ल्याची तटबंदी उजव्या हाताला ठेवत पुढे जाताना वाटेत आपल्याला काही वास्तुंचे अवशेष दिसुन येतात. अवशेष पाहुन आपण गडाच्या उत्तर दिशेला झेंडेवाडीच्या दिशेने असलेल्या सोंडेवरील बुरुजावर पोहोचतो. या बुरुजाच्या खालील बाजूस तटात गडाचा तिसरा दरवाजा आहे. झेंडेवाडीतुन येणारी एक वाट या दरवाजातून गडावर येते. येथुन बालेकिल्ल्याच्या तटबंदीखालुन मुख्य दरवाजाच्या दिशेने जाताना उजवीकडे बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसतो. या दरवाजातून आत आल्यावर संपुर्ण बालेकिल्ल्याचा परीसर दिसतो.
बालेकिल्ला –
बालेकिल्ल्यात एक लहान व एक मोठे अशी दोन मंदिरे असुन मोठे मंदिर महादेवाचे तर लहान मंदीर ज्यावरून गडाला मल्हारगड असे नाव पडले त्या मल्हारीचे म्हणजे खंडोबाचे आहे. शिवमंदिराला दगडी प्राकार असुन या प्राकारात एक समाधी चौथरा दिसुन येतो. खंडोबाच्या मंदिरात मल्हारीची म्हाळसासोबत अश्वारूढ मुर्ती असुन या मुर्ती शेजारी काही लहान मुर्ती ठेवलेल्या आहेत. याशिवाय बालेकिल्ल्यात मोठया प्रमाणात घराचे व वाड्यांच्या जोत्याचे अवशेष दिसुन येतात. बालेकिल्ल्यातुन बाहेर पडण्यासाठी उत्तर दिशेच्या तटबंदीत एक लहान दरवाजा असुन एके ठिकाणी खोदीव टाके दिसुन येते.
गड छोटासा असला तरी संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो.
भेटीची सर्वोत्तम वेळ (best time to visit) –
आपण कधीही भेट देऊ शकता.
कसे पोहोचाल (How to reach) –
मल्हारगड (Malhargad) हे पुण्यापासून सुमारे २० कि. मी. अंतरावर आहे.
कसे जाल (How to go) –
खाजगी गाडीने थेट गडाच्या पायथ्याशी जाऊ शकता.
जाण्यासाठी लागणारा वेळ (Timing) –
पुण्यापासून आपल्याला अंदाजे १ तास लागतात.
राहण्याची सोय (Accommodation) –
सासवड परिसरात आपल्याला राहण्याची सोय उपलब्ध आहे.
जेवणाची सोय (Dining)-
गडावर जेवणाची सोय उपलब्ध नाही. परिसरात आपल्याला जेवणासाठी अनेक हॉटेलची सोय उपलब्ध आहे.
पिण्याचे पाणी (Drinking water)-
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्वतःची पाण्याची बाटली घेऊन जावे.
इतिहास (History) –
मल्हारगडाचे बांधकाम कृष्णराव महादेव पानसे व भिवराव यशवंत पानसे यांनी सन १७५७ ते १७६० या कालावधीत पूर्ण केले. इ.स.१७७१-७२ दरम्यान थोरले माधवराव पेशवे या किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख पेशवे दफ्तरात आढळतात. तसेच किल्ल्याच्या खर्चासाठी पेशव्यांनी पानसेंना ३००० रुपयाचे वर्षासन मंजूर केल्याचे कागदोपत्री दिसुन येते.पेशवाईच्या अस्तानंतर स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरूद्ध बंड पुकारून काहीकाळ या गडावर वास्तव्य केलं होतं. त्यांच्याचप्रमाणे आद्य क्रातिकारी वासुदेव बळवंत फडके यांनीही इंग्रजांविरूद्ध बंड पुकारून या गडावर आसरा घेतला होता, पण फंदफितूरीच्या शापामुळे इंग्रजांनी अचानक मल्हारगडावर हल्ला करून वासुदेव बळवंत फडक्यांचे अनेक साथीदार ठार केले. त्यावेळी फडके निसटण्यात यशस्वी झाले. याव्यतिरिक्त या गडावर लढाई अशी झालीच नाही. कारण हा गड लढण्यासाठी व संरक्षणासाठी बांधलेला नसून टेहळणीसाठी व तोफांचा कारखाना काढण्यासाठी मल्हारगड | Malhargad या गडाची निर्मिती केलेली होती.
प्रवेश फी (Entry Fee) – मोफत.
व्हिडिओ (Video) –
गुगल नकाशा (Google Map) –
आवश्यक वस्तू – (Necessary belongings) –
पाणी आणि जेवण घेऊन जाणे.
हे सुद्धा पहा (Nearby attractions) –
मस्तानी तलाव , दिवेघाट आणि सासवड मधील घाट व मंदिरे
संदर्भ – https://www.discovermh.com/