मेणवली | Menvali

By Bhampak Travel Sunil Shedage 2 Min Read
मेणवली | Menvali

मेणवली –

मेणवली हे मनाला भुरळ घालणारं स्थळ आहे. इथला रम्य निसर्ग, शांत परिसर मनाला साद घालतो. कृष्णेच्या घाटावरुन मन हलत नाही. पाण्यात पाय बुडवून अगदी तास न् तास बसलं तरी उठू वाटत नाही. साताऱ्यातून आधी वाई. तिथून अगदी पंधराच मिनिटांत मेणवली.

मेणवली इतिहासप्रसिद्ध आहे. म्हणजे इथला कृष्णा नदीवरचा घाट खूप जुना, विस्तृत अन् अप्रतिमही आहे. तो चंद्रकोरीच्या आकाराचा आहे. सोबतीला हिरवाईचा साज आहे. तिथं नीरव शांतता असते. विलक्षण स्तब्धता असते. ती जागाच मोठी सुंदर आहे.

इथं मेणेश्वराचं मंदिर आहे. ते घडीव दगडांतून उभं राहिलं आहे. इथं असलेली प्रचंड आकाराची घंटाही लक्षवेधक आहे. बाजीराव पेशव्यांचे पराक्रमी बंधू चिमाजी आप्पा यांनी वसईच्या रणसंग्रामावेळी ती पोर्तुगीजांकडून हस्तगत केली होती. तिचं वजन सुमारे 650 किलो आहे.

घाटाच्या परिसरात पिंपळाचे मोठे वृक्ष आहेत. भोवताली बांधलेले पार उठून दिसतात. नानांचा वाडा हेही मेणवलीचं वैशिष्ट्य मानलं जातं. वाड्यातलं लाकडी कोरीवकाम, भव्य दरवाजा, तत्कालीन संदर्भ आजही नजरेत भरतात. अलीकडंच वाड्याची डागडुजी करण्यात आली आहे. तिथून काही अंतरावरच महाकाय आकाराचं गोरख चिंचेचं दुर्मिळ झाड आहे.

मेणवली इतिहासप्रसिद्ध आहेच. मात्र अलिकडच्या काळात इथं कित्येक चित्रपटांची चित्रीकरणं झाली आहेत. स्वदेश, मृत्यूदंड, गंगाजल, मंगल पांडे, दबंग, बोल बच्चन, जिस देशमें गंगा रहता है यासारख्या अनेक चित्रपटांचा त्यात समावेश आहे.सर्जा या गाजलेल्या मराठी चित्रपटासह काही मालिकांचं चित्रीकरणही या परिसरात झालं आहे.

शाहरुखच्या ‘स्वदेस’ चित्रपटातलं अलका याग्निकनं गायलेलं अन् गायत्री जोशीवर चित्रीत केलेलं ‘साँवरियाँ साँवरियाँ ‘ हे श्रवणीय गाणं आपल्यापैकी बहुतेकांना स्मरत असेलच. त्यातला काही भाग इथंच चित्रीत झाला आहे.

कवी वामन पंडित यांचं समाधिस्थळ असलेलं भोगाव मेणवलीतून नजीक आहे. धोम धरणाचा परिसर, तिथलं धोैमेश्वराचं प्राचीन मंदिर हा प्रवास प्रपंच एका दिवसात उरकता येतो. तुमच्या हाताशी आणखी एखादा दिवस असेल, तर रायरेश्वर, केंजळगड हे किल्ले करुन पलीकडं भोरमध्ये उतरता येतं. तिथला राजवाडा, आंबवडेचा झुलता पूल, कारी इथला कान्होजी जेधे यांचा वाडा ही स्थळं करुन पुन्हा कापूरहोळमार्गे हायवे गाठता येतो.

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment