मुक्ती भाग १

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग १ –

डोंगराच्या माळरानावर कड्याच्या दिशेने झपझप पावले टाकत अभिजीत चालत होता. तशी त्याला घाई करणे बिलकुल गरजेचे नव्हते, पण निराशेने भरलेले मन आणि जीवनात असलेल्या चिंतांचा बोजा कधी एकदा डोक्यावरून उतरवतो असे त्याला झाले होते. हे ओझं उतरवण्याचा आता त्याच्याकडे फक्त एकच पर्याय होता… आत्महत्या…(मुक्ती भाग १)

त्याच्या मनातील वेगवेगळ्या भावभावनांचा कल्लोळ त्याच्या चेहऱ्यावरही ठळकपणे दिसून येत होता. एक मन त्याला या सगळ्या विरुद्ध लढायला सांगत होते, तर दुसरे मन त्याला जीवनाचा शेवट करून यापासून कायमची मुक्ती करून घ्यायला सांगत होते. आणि यात त्याच्या निराशावादी मनाचा विजय होत असल्याचे चिन्ह त्याच्या कृतीवरून दिसून येत होते. माळरानावरील काट्याकुट्यांची, खाचखळग्यांची कोणताही पर्वा त्याला वाटत नव्हती. काही अंतर चालून आल्यावर तो डोंगराच्या एका अत्यंत खोल आणि पाहता क्षणी भीती वाटेल अशा कड्यावर आला. कड्यावरून समोरचे दृश्य खरं तर खूपच विलोभनीय दिसत होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळीकडे हिरवेगार डोंगर, मध्येच काही ठिकाणी डोंगराला आलेली ओल आणि त्यावर सूर्यकिरणे पडून त्याचे चकचकत्या धबधब्यासारखे भास मनाला आनंद देत होते. पण निसर्गाच्या या मनोहारी सौंदर्याकडे अभिजीतचे बिलकुल लक्ष नव्हते. त्याला डोळ्यासमोर दिसत होते ते फक्त कर्जाचे डोंगर आणि निराशेची दरी.

परत एकदा त्याच्या एका मनाने त्याला असा आत्मघाती निर्णय घेऊ नये असे सांगितले. तो काहीसा घोटाळला, पण परत त्याचे दुसरे मन प्रबळ ठरले. उडी मारण्यासाठी त्याने आपला पाय उचलला, इतक्यात त्याला पाठीमागून आवाज आला.

“अरे दुर्दैवी माणसा… जरा थांब…”

आपल्याला आवाज देणारा कोण असेल हे तरी पहावे असे वाटून त्याने एकवार मागे वळून पाहिले. एक सहा साडेसहा फुट उंच, अंगकाठीने चांगलाच मजबूत आणि रंगाने जरा सावळा माणूस त्याच्याकडे पहात असलेला त्याला दिसला. त्याचे कपडे काळ्या रंगाचे होते. अगदी एखाद्या नाटकातील ऐतिहासिक पात्रासारखे. त्याचे डोळे काळेभोर असून त्यात एक वेगळ्याच प्रकारचे तेज दिसून येत होते. पायात मोजडी आणि कानात भिकबाळी घातलेला एखादा सरदार आपल्यापुढे उभा आहे असा त्याला क्षणभर भास झाला.

“स्वतःचा जीव देणे मूर्खपणाचे आणि भ्याडपणाचे लक्षण आहे असे नाही तुला वाटत?” त्या सरदाराने सुरुवात केली.

“हो. वाटते ना. पण माझ्याकडे आता हाच एक पर्याय उरला आहे.” अगदी निराशेच्या स्वरात अभिजीत उद्गारला.

“माझा हक्क तर नाही पण तरीही विचारतो. अशी कोणती मोठी समस्या आली ज्यामुळे तुझ्यावर ही पाळी आली?”

“तुला सांगून काय उपयोग?”

“सांगून पहा. एखाद्या वेळेस उपयोग होईलही.” अगदी निर्विकार चेहऱ्याने सरदार म्हणाला.

“नाही… आता मला कुणीच मदत करू शकणार नाही. अगदी देव सुद्धा नाही.” अगदीच निराशेने स्वगत बोलल्यासारखे शब्द अभिजीतच्या मुखातून बाहेर पडले.

“देव???? हाहाहाहा… देव कधीच मदत करत नाही. आपणच आपली मदत करायची असते. तो फक्त गंमत पाहतो. तुम्ही खुळे लोकं देवदेव करत बसतात आणि मग त्यामुळे तुझ्यासारख्या अभाग्यांवर हीच वेळ येते.” एक अट्टाहास करत तो सरदार उद्गारला.

आपण इतके देवधर्म केले आणि त्याचा उपयोग काय? कर्जबाजारी पणा? बरे जिथेही हात घालावा पदरी पडते फक्त निराशा. खरंच हा सरदार जे बोलतोय त्यात गैर ते काय? अभिजीतच्या मनात विचार आला आणि त्याच्या मनाची चलबिचल चालू झाली.

“मी तुला नक्कीच मदत करू शकतो. अर्थात तुझी इच्छा असेल तरच. पण एकदा माझी मदत तू स्विकारली तर तुला माझे प्रभुत्व मान्य करावे लागेल… पहा आहे कबूल?” त्या सरदाराच्या चेहऱ्यावर आता असुरी तेज असल्या सारखे अभिजीतला वाटले.

“पण कोण आहेस तू? आणि तू माझी मदत का करणार?” किंचित संशयाने अभिजीतने विचारले.

“मी कोण? हाहाहा… मी या जागेचा स्वामी. इथे माझी सत्ता चालते. माझे नाव कालजित. सगळ्या सिद्धी माझ्या दासी आहेत. मी ठरवले तर सगळे अनुकूल आणि मी ठरवले तर सगळे प्रतिकूल. जो माझे प्रभुत्व स्विकारतो त्याच्यासाठी सर्वदाता आणि जो नाकारतो त्याच्यासाठी काळपुरुष…” एकेका शब्दावर जोर देत कालजित म्हणाला. हे बोलताना त्याच्या आवाजात एक प्रकारची जरब होती. तो आता अभिजीतला एखाद्या काळपुरुषासारखा भासला.

“तू आत्महत्या करतो आहेस कारण तुला प्रेमात अपयश आले, धंद्यात अपयश आले आणि असंख्य सावकारांचे कर्ज आता तुझ्या डोक्यावर आहे. बरोबर ना?” कालजित अभिजीतकडे हसत पहात म्हणाला आणि आभिजीतला आपण एका सिद्ध पुरुषासमोर उभे आहोत असे वाटू लागले.

“तुम्ही माझी मदत करू शकता?” अभिजीतने काहीशा आशावादी स्वरात विचारले.

“हो तर. आता तुझी मदत फक्त आणि फक्त मीच करू शकतो. तुझा देव तुझी मदत करेल ही आशा मात्र पूर्णतः व्यर्थ आहे. बोल. आहेस तयार माझी मदत घेण्यास?”

“हो. हो. तुम्ही माझ्यासाठी अगदी देवदूत आहात…” जीव देण्यासाठी दरीच्या दिशेने उचललेले पाऊल मागे घेत अभिजीतच्या तोंडून उद्गार निघाले.

“अरे चल हट!!! मी देवदूत नाही. तुझ्या देवाला तर मी मानतही नाही. मी स्वयंपूर्ण आहे. माझी मदत पाहिजे तर मात्र तुला तुझे हे देव पुराण बंद करावे लागेल. तसेच माझ्या काही अटीही मान्य कराव्या लागतील.” एक तुच्छ कटाक्ष अभिजीतकडे टाकत आढ्यतेने कालजित म्हणाला.

“पण तुम्ही मला मदत करू शकतात याची खात्री काय?”

“हाहाहा… ठीक आहे. तुला माझी शक्ती पहायची आहे तर. नाहीतरी तू आत्महत्या करण्यासाठीच या कड्यावर आला आहेस ना? मग मार उडी या कड्यावरून. तुला लगेच खात्री पटेल.”

क्षणभर अभिजीतने विचार केला. तसेही आपण जीव देण्यासाठीच आलेलो आहोत. वाचलो तर त्याची शक्ती कळेल आणि मेलो तर सगळ्या व्यापातून मुक्ती मिळेल. हा विचार मनात आल्याबरोबर अभिजीतने कड्यावरून खाली खोल दरीत उडी मारली. त्याने उडी मारली आणि त्याला त्याचे शरीर अगदी पिसासारखे हलके हलके वाटू लागले. आपल्यावर कोणतेच गुरुत्वाकर्षण परिणाम करू शकत नाही याची जाणीव त्याला क्षणार्धात झाली. हवेच्या झोताने तो परत ज्या ठिकाणी उभा होता तिथे आला आणि हलके वाटणारे त्याचे शरीर परत एकदा पहिल्याप्रमाणे वाटू लागले. आपण आताच घेतलेला अनुभव खरा आहे की आपण स्वप्न पहात आहोत याचा नीट अंदाज न आल्याने त्याने आपल्या हाताला चिमटा घेतला आणि त्याला वेदनेची जाणीव झाली. त्याच्यापासून थोड्या अंतरावर कालजित मात्र हसत उभा होता.

“काय? झाली खात्री? पाहिलीस माझी शक्ती?” कालजित छद्मीपणे हसत उद्गारला.

“हो… हो… पाहिली… तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. पण मला मदत करा.” काहीशा उतावीळपणाने अभिजीतने कालजिताकडे याचना केली.

“ठीक आहे… आजपासून १२ वर्ष तुला पाहिजे ते करता येईल. अशी कोणतीच गोष्ट नसेल जी तुला अशक्य असेल. पण १२ वर्षानंतर मात्र तुला माझ्याबरोबर यावे लागेल. आहेस कबूल?”

“हो… कबूल…”

“या १२ वर्षात मात्र तुला कोणत्याही देवतेचे पूजन करता येणार नाही. पोथी पारायणे करता येणार नाहीत. इतकेच काय तर तुला कोणत्याही मंदिरातही जाता येणार नाही. आणि जर तू यापैकी काहीही केले तर मी त्याच क्षणी तुझे भयंकर हाल करून तुला यातनामय मरण देईल. आहेस कबूल?”

“हो हो… कबूल…”

“ठिक आहे… आता तू माझे प्रभुत्व मान्य केले आहेस. १२ वर्ष तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी करण्यास बांधील आहे. हवे तर १२ वर्षे मी तुझा गुलाम आहे असे समज. पण त्यानंतर मात्र तुला माझ्या बरोबर यावे लागेल. हाहाहाहा!!!!” प्रचंड गडगडाटी हास्य करत कालजित दिसेनासा झाला.

क्रमशः- मुक्ती भाग १.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment