मुक्ती भाग १०

मुक्ती भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

मुक्ती भाग १० –

तशी तिला जास्त वेळ बिलकुल वाट पहावी लागली नाही. तिला लांबूनच स्वामीजी येताना दिसले आणि तिला हायसे वाटले. पण तिने आपल्या चेहऱ्यावर किंचितही बदल दिसू दिला नाही. स्वामीजींच्या वाटेकडे अभिजीतची पाठ असल्यामुळे त्याला मात्र ते येताना दिसले नाहीत. स्वामी आता आपल्याच बाजूला येतील असे सानिकाला वाटत होते पण तसे काहीच घडले नाही. स्वामींनी त्याच्या पासून थोड्या अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या बदामाच्या झाडाखाली ठाण मांडले आणि पद्मासन घालून समाधी लावली. सानिकाला आता काय करावे हेच समजेना. तिच्या चेहऱ्यावर चलबिचल सुरु झाली. अभिजीतच्याही हे लक्षात आले आणि तो तिला त्याबद्दल विचारणार इतक्यात तिथे कालजित प्रकट झाला. कालजिताला पाहताच अभिजीत वैतागला. पण कालजित फक्त अभिजीतला दिसत असल्यामुळे त्याला काहीच बोलता येईना.

“वा! फार छान!!! कमी दिवस राहिले म्हणून बायकोबरोबर मजा करतोय का? हाहाहा…” हसत हसत कालजिताने विचारले.

एरवी अभिजीतने कालजिताला आपली नाराजी व्यक्त करून दाखवली असती पण इथे सानिका बरोबर होती. त्यामुळे त्याला गप्प बसणे भाग होते. तो गप्प बसला आहे हे पाहताच कालजित परत मिश्कीलपणे म्हणाला.

“हाहाहा… बायको बरोबर असल्यावर मी मी म्हणणाऱ्या लोकांची बोलती बंद होते असे ऐकले होते बुवा मी. आज प्रत्यक्ष अनुभव घेतो आहे. हाहाहा…”

खरं तर कालजिताच्या या वागण्याचा अभिजीतला चांगलाच राग आला, पण तो व्यक्त करणे त्याला शक्य नव्हते. तसेच त्याच्या रागाने कालजिताचा उद्देश सफल होणार होता म्हणून त्याने परत आपला चेहरा सौम्य केला.

“अभि??? अरे कसला विचार करतो आहेस इतका? तुझ्या चेहऱ्यावर सगळ्या भावना उमटत आहेत. असा कोणाचा विचार मनात आला तुझ्या, की तुझा चेहरा काही वेळ रागीट झाल्यासारखा दिसला?” इतका वेळ त्याच्या चेहऱ्याचे बारकाईने निरीक्षण केल्यावर शेवटी न राहवून सानिकाने त्याला विचारलेच.

“मी? नाही. नाही गं. कुणाचा नाही. मी कशाला रागावू कुणावर?” काहीसे स्वतःला सावरत अभिजीत म्हणाला खरा पण त्याचा तो उडालेला गोंधळ पाहून कालजित पुन्हा मोठ्याने हसला.

“हाहाहा… पहा या मानव जन्मात किती वेगवेगळ्या समस्या असतात ते. म्हणून मी तुला आमच्यात घेऊन जाणार. त्याने तू या सगळ्या समस्यांतून कायमचा मुक्त होशील. हाहाहा…”

“तू कशाला आलास इथे?” शेवटी वैतागून अभिजीत म्हणाला.

“अरे काय बोलतोयस तू? तब्बेत तर ठीक आहे ना तुझी?” सानिकाने अभिजीतचा हात हातात घेत विचारले.

“अरे यार, अगं… आपण इथे कशाला आलो आहोत? मस्त मजा करायलाच ना? हेच बोलायचे होते मला…” परत सावरून घेत अभिजीत म्हणाला.

“हाहाहा… तू तिथे मी. तुला माहिती आहे ना? आता आपण वेगळे कुठे आहोत? पण इथे मी तुला सावध करायला आलो आहे. तुझ्या पाठीमागे काही अंतरावर जे झाड आहे ना त्याच्या सावलीत तो गोसावडा बसला आहे बघ. तो बहुतेक तुला काही उपदेश करेल पण त्याच्याशी तू सभ्यपणे बोलला तरी माझा रोष ओढवून घेशील. समजलं?” कालजिताने सुरुवात जरी हसण्याने केली होती तरी त्याचा शेवट मात्र धमकी देत केला.

कालजितच्या बोलण्यात कितपत तथ्य आहे हे पाहण्यासाठी अभिजीतने मागे वळून पाहिले तर खरंचच काही अंतरावर स्वामी ध्यान लावून बसलेले त्याला दिसले. आता यांना कसे टाळायचे हा विचार करत अभिजीत उठून उभा राहिला.

“सानिका… माझं डोकं जाम दुखतंय. चल आपण खाली जाऊ. डॉक्टरकडे जावून येतो मी.”

अभिजीतचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच मागून आवाज आला.

“बेटा, धर्म कर. फक्त दोन वर्ष राहिलेत. वेळ गेलेली नाही. धर्म कर.”

अभिजीतने मागे वळून पाहिले. स्वामी मागेच उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज झळकत होते. स्वामींपासून थोड्याच अंतरावर कालजित उभा होता. त्याचे डोळे आता लालभडक बनले होते. त्याचा चेहरा काळा पडला होता आणि तो प्रत्येक श्वासागणिक आग ओकतोय असा त्याला भास झाला.

“ए गोसावड्या, चल हट. मला धर्माच्या गोष्टी शिकवू नकोस. मला माहिती आहे धर्म काय आहे तो…” अभिजीत स्वामींच्या अंगावर जवळजवळ ओरडलाच. सानिका अभिजीतचे हे रूप पहिल्यांदाच पहात होती. याआधी इतरांच्या खूप मोठमोठ्या चुकांना अभिजीतने क्षमा केली होती. त्यामुळे एका छोट्याशा गोष्टीबद्दल अभिजीतने इतके चिडावे हे तिला पटले नाही. अर्थात त्यावेळेसचा अभिजीतचा तो चेहरा पाहून तिची त्याच्यापुढे काही बोलायची हिंमतही झाली नाही. तिने स्वामींकडेही एक कटाक्ष टाकला, अभिजीतच्या बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला हे पाहण्यासाठी पण त्यांचा चेहरा अजूनही शांतच होता. एक सौम्याशी स्मितरेषा मात्र त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली तिला दिसली.

“बेटा… किती दिवस इतरांच्या ओंजळीने पाणी पिणार? आता तरी स्वतःचे निर्णय स्वतः घे.”

“तू… तू मला शिकवणार कसे वागायचे ते?” अभिजीत पुन्हा स्वामींच्या अंगावर ओरडला.

“हो… मीच शिकवणार. प्रत्येकाला सन्मार्ग दाखवणे हेच तर माझे कर्म आहे. ऐक माझं, त्यातच तुझं कल्याण आहे.” अजूनही स्वामी शांतपणे आपले म्हणणे पुढे चालवत होते.

आता काय बोलावे हे अभिजीतला सुचेना. त्याने एकदा कालजिताकडे पाहिले. तो आता स्वामींच्या अगदी शेजारी येऊन उभा राहिला होता आणि अगदी रागाने स्वामींकडे पहात होता.

“अरे ए गोसाव्या, कशाला उगाच स्वतःचे अहित करून घेतोस? मी माझे पाहून घेईन. चल निघ इथून आधी. चालता हो माझ्या समोरून…” कालजिताने स्वामीना काही अपाय करू नये यासाठीच अभिजीत स्वामींना तिथून निघून जाण्यासाठी सांगत होता.

“बेटा, तू माझी चिंता नको करूस. हा ब्रम्हराक्षस माझे काहीही अहित करू शकणार नाही.” स्वामी ब्रम्हराक्षसाकडे पाहून म्हणाले आणि अभिजीतला आश्चर्य वाटले. त्याच्या तोंडून पहिल्यांदाच स्वामींबद्दल आदरार्थी शब्द बाहेर पडले.

“तुम्हाला दिसतोय तो?” त्याने काहीशा आश्चर्याने विचारले.

“हो. गुरुकृपेने मी सगळ्या गोष्टी पाहू शकतो. ब्रम्हराक्षसाला सुद्धा…!!!” हे ऐकून तर ब्रम्हराक्षस चांगलाच खवळला.

“ए जोगड्या, गुमान चालू लाग. माझ्या वाटेत आडवा येऊ नकोस. फुका मरशील… चल निघ इथून.” स्वामीच्या अंगावर धावून जात ब्रम्हराक्षस म्हणाला.

“ब्रम्हराक्षसा, मी फक्त माझे काम करतो आहे. हाच मला गुरु आदेश आहे. त्यामुळे याचे परिणाम काय होतील याची चिंता मला करण्याची काहीच गरज वाटत नाही. तुला हवे ते तू कर.” अगदी शांत आवाजात स्वामी म्हणाले.

सानिकाला मात्र ब्रम्हराक्षस कुठेच दिसत नव्हता की त्याचा आवाजही ऐकू येत नव्हता. पण ज्या पद्धतीने अभिजीत आणि स्वामी बोलत होते त्यावरून इथेच जवळ ब्रम्हराक्षस हजर आहे हे लक्षात येऊन ती अगदीच घाबरून गेली.

“तू तसा ऐकायचा नाहीस तर.” असे म्हणत कालजिताने स्वामीजींच्या डोक्याकडे हात नेला आणि एखादा विजेचा झटका बसावा त्याप्रमाणे तो बाजूला फेकला गेला. हे सगळे अभिजीत पाहतच होता. कालजिताची अशी गत करणारा साधू हा सामान्य म्हणताच येणार नाही याची त्याला जाणीव झाली. या धक्क्यातून सावरायला कालजितालाही काही वेळ लागला. एक साधारण दिसणारा जोगी आपली अशी गत करेल असे त्याने मनातही आणले नव्हते. या आधी अनेक तांत्रिक, मांत्रिक, योगी यांच्याशी कालजिताने टक्कर घेतली होती, पण त्यातील एकानेही पहिल्याच फटक्यात त्याची अशी गत कधी केली नव्हती. मी मी म्हणणाऱ्या मांत्रिकांनाही कालजिताने पळवून लावले होते. हा साधू मात्र त्यांच्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली आहे हे त्याने ताडले. पण अभिजीत देखत झालेला आपला अपमान कालजिताला सहन झाला नाही आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

“जोगड्या, तुझी ही हिंमत? तू तुझ्या जीवनातील ही सगळ्यात मोठी आणि शेवटची चूक केलीस. आता मात्र तुझा नाश अटळ आहे.” असे बोलत त्याने अजस्त्र देह धारण केला.

जवळपास ३५ फुट उंचीचा तो देह तितकाच बलदंड दिसत होता. त्याच्या डोळ्यातून आता ठिणग्या उडत होत्या. डोळे लाल होवून त्यातील बाहुल्या पूर्ण पांढऱ्या रंगाच्या दिसत होत्या. डोक्यावर दोन मोठे शिंग उगवले होते. संपूर्ण अंगावर काळे केस उगवले होते. तोंडातून दोन भयंकर सुळे बाहेर आलेले होते आणि तोंडातून बाहेर पडणारा त्याचा प्रत्येक हुंकार आग ओकत होता. इतक्या वर्षात अभिजीतने कालजिताचे असले भयंकर रूप कधीही पाहिले नव्हते. कित्येक वेळेस तर त्याला कालजित मित्र वाटला होता. कालजिताच्या कित्येक गोष्टी त्याने अव्हेरल्याही होत्या पण तरीही कालजिताने त्याला असले भयंकर रूप कधीच दाखवले नव्हते. आता कालजितापुढे ते दोघेही अगदीच किरकोळ वाटत होते. असले रूप पाहून अभिजीतची तर वाचाच बसली. पण स्वामीजी? त्यांच्यावर मात्र कालजिताच्या या रूपाचा कसलाही परिणाम झालेला दिसत नव्हता. काही वेळापूर्वी ते जितके शांत आणि स्थितप्रज्ञ होते तितकेच अजूनही होते.

क्रमशःमुक्ती भाग १०.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ९ लिंक

Leave a comment